पामेला हॅरिमन : दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेला हाताळण्यासाठीचं चर्चिल यांचं 'गुप्त आणि मोहक शस्त्र'

फोटो स्रोत, Penguin Random House
- Author, क्लेअर मिकहू
- Role, बीबीसी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 12 मिनिटे
सत्तेच्या वर्तुळात वावरणाऱ्या महत्त्वाच्या आणि सुंदर महिलांविषयी नेहमीच एक प्रकारचं गूढ वलय असतं. त्यांच्याबद्दल अनेक अफवा देखील चर्चेत असतात.
ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांची सून पामेला हॅरिसन यांच्याबाबतीत ही गोष्ट तंतोतंत लागू पडते.
पामेला यांचं आयुष्यं एकाबाजूला दुसऱ्या महायुद्धातील ब्रिटन आणि अमेरिकेतील राजकारणावर प्रकाश टाकतं, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या वरच्या वर्तुळात वावरणाऱ्या महिलांबदद्लचा पुरुषी समाजाचा दृष्टीकोन उलगडून दाखवतं.
एका अल्पशिक्षित महिलेची सत्तेच्या सर्वोच्च वर्तुळात झेप घेण्याची ही अद्भूत कहाणी आहे.
पामेला हॅरिमन या विन्स्टन चर्चिल यांच्या सून होत्या. त्याचबरोबर त्या बड्या उमराव, सत्तेच्या वरच्या वर्तुळात वावरणाऱ्या महिला होत्या. पामेला यांना 'त्यांच्या काळातील सर्वात महान गणिका' मानलं जातं.
पामेला यांच्याबद्दल फक्त वेगवेगळी मतंच नाहीत, तर अफवा देखील आहेत. पामेला यांच्या मृत्यूला काही दशकं होऊन गेल्यानंतर देखील त्यांच्याविषयी दोन वेगवेगळी मतं आहेत.
एक मत असं आहे की, त्या एक अत्यंत हुशार पॉवर प्लेअर म्हणजे सत्तेच्या वर्तुळात वावरणाऱ्या हुशार महिला होत्या का? आणि दुसरं मत आहे की, त्या 'तिरस्करणीय व्यक्ती' होत्या का?
तुम्ही त्यांना त्यांच्या सहा नावांनी हाक मारू शकता : पामेला, बेरील, डिग्बी, चर्चिल, हेवर्ड, हॅरिमन.
त्या ब्रिटिश उमराव होत्या, ज्या नंतरच्या काळात अमेरिकेतील सत्ताकारणातील महत्त्वाच्या व्यक्ती बनल्या होत्या आणि अमेरिकेच्या फ्रान्समधील राजदूत झाल्या होत्या.
20 व्या शतकातील राजकारण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या जीवनाशी त्यांचा संबंध होता.
पामेला यांच्यावरील नव्यानं प्रकाशित झालेल्या चरित्रानुसार, पामेला 20 वर्षांच्या असताना त्यांचे सासरे आणि ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या "त्या सर्वात समर्पित गुप्त शस्त्र होत्या"
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात नाझीविरोधातील युद्ध जिंकण्यासाठीच्या ब्रिटनच्या संघर्षात पामेला यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. महत्त्वाच्या अमेरिकन व्यक्तींना मद्यपान करवणं, त्यांच्याबरोबर जेवण करणं आणि त्यांना भुरळ घालण्याचं काम केलं होतं.
नंतरच्या त्यांचा संबंध केनेडी, बिल क्लिंटन, नेल्सन मंडेला आणि ट्रुमन कॅपोटेसारख्या अती महत्त्वाच्या व्यक्तींशी येत गेल्यावर त्यांच्या कामाचा प्रभाव आणखी वाढत गेला.

फोटो स्रोत, Getty Images
ट्रुमन कॅपोटे हे अमेरिकन लेखक होते. त्यांनी नंतर त्यांच्या कादंबऱ्यांमध्ये त्यांच्या इतर पात्रांबरोबरच पामेला यांचंही पात्र रेखाटलं होतं.
पामेला हॅरिमन यांच्या मेंदूतून जीवघेणा रक्तस्त्राव (ब्रेन हॅमरेज) होण्याच्या घटनेला आता 27 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्या पॅरिसच्या रिट्झ हॉटेलमधील स्विमिंग पूलमध्ये पोहत असताना हे घडलं होतं.
आजही त्यांच्याबद्दल विविध मतं मांडली जातात. सोनिया पर्नेल यांनी 'किंगमेकर : पामेला हॅरिमन्स अॅस्टोनिशिंग लाईफ ऑफ पॉवर, सिडक्शन आणि इन्ट्रिग' हे त्यांचं नवं चरित्र लिहिलं आहे.
त्याच्यासंदर्भात वेगवेगळी मतं उमटत आहेत. काहींना या पुस्तकातील चरित्र म्हणजे ब्रिटन, युरोप आणि अमेरिकेत अतिशय बिनधास्तपणे, धाडसीपणे, उदारपणे आणमि महत्त्वाकांक्षा बाळगत जगलेलं एक प्रभावशाली आयुष्य वाटतं.
तर इतरांना ते अशा महिलेचं चित्रण वाटतं आणि अवाजवी प्रशंसा वाटते, जिनं आयुष्यात पुढे जाण्यासाठी सेक्सचा वापर केला आणि जिचा प्रत्यक्षात जितका राजकीय प्रभाव आहे, त्यापेक्षा अधिक रंगवला जातो.


विन्स्टन चर्चिल यांच्या मुलाशी लग्न
पामेला यांचा जन्म 1920 मध्ये आर्थिक चणचण असलेल्या घरात झाला. त्यांनी पैशांसाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी लग्न केलं होतं. 1938 मध्ये त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या लग्नसराईत लग्न जमलं नाही.
मिटफोर्ड बहिणींपैकी बोलायला सर्वात रोखठोक आणि तिखट असणाऱ्या नॅन्सी मिटफोर्डनं किशोरवयीन पामेलाचं वर्णन 'लाल रंगाच्या केसांची उसळणारी छोटी गोष्ट' असं केलं होतं.
पुढच्याच वर्षी ब्रिटनचे माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्या एकुलत्या एक मुलानं रँडॉल्फ चर्चिल यानं पामेलाला फोन करून डेटवर येण्याविषयी विचारलं. त्यावेळेस दुसरं महायुद्ध नुकतंच सुरू झालं होतं.
लंडनमध्ये काम करत असताना पामेला यांचा रँडॉल्फ चर्चिल यांच्याशी परिचय झाला होता.
या युद्धात आपण मारले जाऊ अशी रँडॉल्फ चर्चिल यांना भीती होती. त्यामुळेच आपल्याला मुलगा व्हावा अशी त्यांची इच्छा होती. पामेलाबरोबर जेवताना ते चटकन या मुद्द्यावर आले. त्यांनी पामेला यांना लग्नाबद्दल विचारलं.

फोटो स्रोत, Getty Images
पर्नेल लिहितात, "रँडॉल्फ यांचं पामेलावर प्रेम नव्हतं. मात्र, त्यांच्या बाळाला जन्म देण्याइतक्या पामेला सुदृढ दिसत होत्या."
इंग्लंडच्या नैऋत्येला असणाऱ्या डोरसेट या प्रांतात आपल्या पालकांबरोबर जगत असलेल्या अत्यंत निरस, त्रासदायक आयुष्यातून बाहेर पडण्यासाठी पामेला अत्यंत आतूर होत्या. त्यांनी रँडॉल्फ यांचा प्रस्ताव स्वीकारला.
जरी विवाहाचा आनंद मिळाला नाही तरी पामेला यांचा हा जुगार यशस्वी ठरला. रँडॉल्फ हा दारुड्या आणि त्रासदायक व्यक्ती होता. बाळाला जन्म देण्याआधी आणि नंतर देखील रँडॉल्फ यांनी पामेलाला अतिशय तुच्छतेचीच वागणूक दिली.

या बातम्याही वाचा:

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनसाठी केलेलं काम
मात्र, मे 1940 मध्ये रँडॉल्फ यांचे वडील आणि पामेला यांचे सासरे विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान झाले. त्यानंतर मात्र पामेला यांनी मागे वळून पाहिलं नाही. कारण आता पामेला सत्तेच्या सर्वात वरच्या वर्तुळात होत्या. राजकारणाच्या केंद्रस्थानाच्या जवळ होत्या. सत्तेचं राजकारण आणि सर्व घडामोडी पामेला यांना अत्यंत जवळून पाहण्याची संधी मिळाली.
यासंदर्भात नंतर त्यांनी म्हटलं होतं की, "राजकारण आतून पाहण्याची जितकी संधी मला मिळाली तितकी इतर कोणालाच मिळाली नसेल."
त्यावेळेस युद्धासाठी सज्ज असलेल्या नाझी जर्मनीविरुद्ध ब्रिटन हे एकच राष्ट्र हिंमतीनं उभं होतं. हिटलरच्या शक्तीशाली जर्मनीशी लढण्यासाठी चर्चिल यांना अटलांटिक पार असणाऱ्या अमेरिकेकडून तातडीची मदत हवी होती. मात्र ती लगेच मिळत नव्हती.
जर्मनीनं युद्धात फ्रान्सचा पाडाव केल्यानंतर अमेरिकेत झालेल्या मतदानातून असं दिसून आलं की, अमेरिकेतील मतदार दोस्त राष्ट्रांच्या मदतकार्यात सहभागी होण्यासाठी पूर्वीपेक्षा फारच कमी उत्सुक होता.
कनेक्टिकट विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक फ्रँक कॉस्टिग्लिओला म्हणतात, "युद्धकाळात माहिती मिळण्याचं महत्त्व लक्षात घेता पामेला या चर्चिलसाठी खूप महत्त्वाच्या होत्या."
पामेला यांना परिस्थितीची जाणीव होती. युद्धात अमेरिकेची मदत किती महत्त्वाची आहे, हे त्यांना माहित होतं.
"जेव्हा अमेरिका युद्धात उतरेल, तेव्हाच हे युद्ध दोस्त राष्ट्रांसाठी सुरक्षित होईल. जोपर्यंत अमेरिका युद्धात उतरली नव्हती, तोपर्यंत युद्ध अनिश्चित होतं," असं पामेला यांनी नंतर म्हटलं होतं.
चर्चिल यांची त्यांच्या उत्साही सुनेला महत्त्व देत होते. पामेला त्यांची लाडकी होती.
पामेला यांचा त्यांच्या तान्ह्या मुलासोबतचा फोटो 'लाईफ' या त्यावेळच्या अमेरिकेत सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या मासिकाच्या मुखपृष्ठावर यावा यासाठी चर्चिल यांनी प्रयत्न केले. पामेला यांचा फोटो सेसिल बीटन या राजघराण्यांच्या आवडत्या फोटोग्राफरनं घेतला होता.
त्याचबरोबर चर्चिल यांनी त्यांचा सहकारी लॉर्ड बिवरब्रूक यांना पामेला यांच्या उंची पोशाखांसाठी निधी उपलब्ध करून देण्यास सांगितलं.

फोटो स्रोत, Alamy
रूझवेल्ट यांनी ब्रिटनला पाठवलेले पहिले दूत, हॅरी हॉपकिन्स यांची जास्तीची स्तुती करून
पामेला यांनी त्यांना भुरळ घातली. हॅरी हॉपकिन्स यांनादेखील पामेला खूपच मोहक वाटल्या.
नंतर मार्च 1941 ला जेव्हा दोस्त राष्ट्रांना मदत पुरवण्याच्या योजनेवर देखरेख करण्यासाठी श्रीमंत अॅवेरेल हॅरीमन लंडनला आले तेव्हा पामेला यांनी त्यांच्याशी परिचय करून घेतला. चर्चिल यांच्यासाठी अमेरिकेकडून मिळणारी ही मदत अत्यंत महत्त्वाची आणि गरजेची होती.
त्यानंतर 21 वर्षांच्या पामेला यांचं 49 वर्षांच्या विवाहीत हॅरीमन यांच्याशी प्रेमप्रकरण सुरू केलं.
ब्रिटनचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल, त्यावेळेस हॅरीमन काय म्हणतात, ते काय करतात हे जाणून घेण्यास उत्सुक होते. ते रात्री उशिरा पामेला यांच्याबरोबर पत्ते खेळताना त्यांच्याकडून यासंदर्भातील माहिती घ्यायचे.
पामेला यांच्या आयुष्याचं 'द टाईम्स'साठी पुनरावलोकन करताना रॉजर लुईस यांनी ही कल्पना फेटाळली की पामेला यांनी त्यांच्या सासऱ्यांसाठी म्हणजे विन्स्टन चर्चिल यांच्यासाठी महत्त्वाची हेरगिरी केली.
त्यांनी पामेला यांचं वर्णन "लैंगिकतेचं वेड असलेली आणि पैशांसाठी काम करणारी एक भाडोत्री व्यक्ती" असं केलं.
फ्रँक कॉस्टिग्लिओला कनेक्टिकट विद्यापीठात इतिहासाचे प्राध्यापक आहेत. त्यांनी 'रूझवेल्ट्स लॉस्ट अलायन्सेस : हाऊ पर्सनल पॉलिटिक्स हेल्प्ड स्टार्ट द कोल्ड वॉर' हे पुस्तक लिहिलं आहे.
फ्रॅंक यांनी बीबीसीला सांगितलं की, "युद्धकाळातील माहितीचं महत्त्व लक्षात घेता पामेला या चर्चिल यांच्यासाठी खूप मोठी मालमत्ता, खूप महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. या गोष्टीबद्दल दुसऱ्या अंगांनी विचार करणं म्हणजे इतिहासाविषयी अनभिज्ञ असणं आणि महिलांविषयीच्या द्वेषात रममाण होणं."
हॅरिमन यांचं लैंगिक शोषण झाल्याची बाब, पर्नेल नाकारत नाहीत किंवा त्याबद्दल दुमत व्यक्त करत नाहीत.
'किंगमेकर : पामेला हॅरिमन्स अॅस्टोनिशिंग लाईफ ऑफ पॉवर, सिडक्शन आणि इन्ट्रिग' या पुस्तकात त्या पामेला या कशा त्याकाळच्या सर्वात महान गणिका म्हणून ओळखल्या गेल्या याचं वर्णन करतात.
हॅरिसन सॅलिसबरी हे अमेरिकन पत्रकार होते. त्यांचं एक वाक्य प्रसिद्ध आहे. ते म्हणाले होते की, दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लंडनमध्ये "सेक्स धुक्सासारखं हवेत तरंगतं आहे."
त्यामुळे एखाद्या नवीन जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवणं हे पामेला यांच्यासाठी फारसं अवघड नव्हतं. अर्थात ज्या गतीनं या गोष्टी वारंवार घडत होत्या त्यासाठी मात्र त्या बहुधा त्यांच्यासाठी नवीन आणि चाकोरी बाहेरच्या होत्या.
त्यांच्या प्रियकरांच्या यादीमध्ये एडवर्ड आर मरो हे सीबीएस मधील सादरकर्ते (धिस इज लंडन), अमेरिकेच्या बॉम्बिंग फोर्सचे कमांडर मेजर जनरल फ्रेड अँडरसन, ओएसएसचे गुप्तहेर अधिकारी कर्नल जॉक व्हिटनी आणि मरोचे सीबीएस मधील बॉस बिल पॅले ज्यांचा समावेश जनरल ड्वाईट डी आयसेनहॉवर यांच्या स्टाफमध्ये होता, अशा बड्या व्यक्तींचा समावेश होता. अर्थात ही काही संपूर्ण यादी नव्हे.
पामेला यांनी चर्चिल यांना कोणती माहिती पुरवली किंवा ज्या शक्तीशाली अमेरिकन व्यक्तींबरोबर पामेला यांचे संबंध होते, त्यांना काय सांगण्याच्या सूचना चर्चिल यांनी पामेला यांना दिल्या होत्या, ही गोष्ट अज्ञात आहे.
पामेला यांच्या प्रेमप्रकरणांबद्दल आणि त्याचा तत्कालीन राजकारणावर होत असलेल्या परिणामाबद्दल पर्नेल लिहितात, "अंथरुणातील तिचं बोलणं दोन्ही बाजूच्या बड्या नेत्यांपर्यंत पोहोचत होतं. अमेरिका आणि ब्रिटनमधील उच्चस्तरीय धोरणावर त्याचा प्रभाव पडत होता."
आपल्या पुनरावलोकनात लुईस याचं वर्णन "अतिशयोक्तीपूर्ण" असं करतात. मात्र ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की जेव्हा रॅंडॉल्फ चर्चिल यांना पामेला यांच्या हॅरिमन यांच्याबरोबरच्या संबंधांविषयी कळालं तेव्हा त्यांनी त्यांच्या पालकांना यातील त्यांच्या सहभागाबद्दल फटकारलं होतं.
पॅरिसमधील दुसरी इनिंग
दुसऱ्या महायुद्धानंतर पामेला यांचा घटस्फोट झाला आणि त्या पॅरिसमध्ये वास्तव्यास गेल्या. त्या तिथल्या उच्चवर्गीय, श्रीमंत लोकांच्या वर्तुळाचा भाग बनल्या.
तिथल्या श्रीमंतांबरोबर त्यांची प्रेमप्रकरणं होती. यामध्ये प्रिन्स अली खान, गिआनी अॅग्नेली आणि एली द रॉथचाईल्ड यांचा समावेश होता.
साहजिकच यामुळे पामेला यांना अतिशय आलिशान जीवनशैली जगता येत होती. मात्र यातील कोणीही पामेला यांच्याशी लग्न केलं नाही.
वयाच्या 40 व्या वर्षी पामेला यांचं लेलँड हेवर्ड या ब्रॉडवे आणि हॉलिवूडच्या यशस्वी निर्मात्याबरोबर प्रेमप्रकरण झालं. लेलॅंड यांना नॅन्सी (तिचं टोपणनाव स्लिम होतं) ही मोहक पत्नी होती. मात्र पामेला यांनी पत्नीला घटस्फोट देण्याविषयी लेलँड यांचं मन वळवलं.
"श्रीमंत, सुंदर आणि मोहक अशा या महिला कॅपोटेवर प्रेम करत होत्या. एक एस्कॉर्ट म्हणून आणि एक विश्वासू साथीदार म्हणून त्या त्यांच्यावर अवलंबून होत्या."
लेलँड यांच्या घटस्फोटानंतर पामेला या पामेला हेवर्ड म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. तर स्लिम या लेडी स्लिम कीथ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. त्यांनी आता ब्रिटिश बॅंकर आणि उमराव केनेथ कीथ यांच्याशी लग्न केलं होतं.
या सर्वांचा समावेश "हंसांची आंतरखंडीय गुहा" असं म्हणवल्या जाणाऱ्या कंपूत केला जात होता. या संकल्पनेचा उल्लेख सर्वात आधी ट्र्युम कॅपोटे यांनी ऑक्टोबर 1959 मध्ये हार्पर बझारच्या आवृत्तीत केला होता.

फोटो स्रोत, Getty Images
श्रीमंत, सुंदर आणि मोहक अशा या महिला कॅपोटेवर प्रेम करत होत्या. एक एस्कॉर्ट म्हणून आणि एक विश्वासू साथीदार म्हणून त्या त्यांच्यावर अवलंबून होत्या. अर्थात जोपर्यंत कॅपोटे यांनी या महिलांची गुपितं लोकांसमोर उघड केली नव्हती तोपर्यंतच.
लॉरेन्स लीमर यांनी 'कॅपोटेज वूमन: अ ट्रू स्टोरी ऑफ लव, बिट्रायल अँड अ स्वान सॉंग फॉर अ एरा' हे पुस्तक लिहिलं आहे.
एफएक्स टीव्हीवरील 'फ्युएड: कॅपोटे व्हर्सेस द स्वान्स' हा टीव्ही शो या पुस्तकावर आधारित आहे. लॉरेन्स लीमर पामेला यांचा उल्लेख "काळा हंस" असं करतात. पामेला या एक संशयास्पद व्यक्ती होत्या, त्यामुळे काही अंशी असा उल्लेख करण्यात आला आहे.
लीमर बीबीसीला सांगतात की, "त्यांना माहित होतं की एखाद्या माणसाला मिळवण्यासाठी आणि जोडून ठेवण्यासाठी ती निर्लज्ज होऊ शकते. मात्र त्याचबरोबर ती मनोरंजक, मोहक सुद्धा होती. ती एक उत्कृष्ट पत्नी देखील झाली."
पामेला यांच्या लग्न केल्यानंतर साधारण एका दशकभरात हेवर्ड यांच्या करियर आणि आरोग्यात झपाट्यात घसरण झाली. मात्र तरीदेखील पामेला हेवर्ड यांच्याशी एकनिष्ठ राहिल्या.
पामेला यांची सावत्र मुलगी ब्रूक हेवर्ड यांनी हेवायर (Heywire) या त्यांच्या प्रसिद्ध पुस्तकात पामेला यांच्यावर काही इतर गैरकृत्ये करण्याबरोबरच हेवर्ड कुटुंबातील दागिने घेऊन फरार झाल्याचा आरोप केला आहे. त्या ब्रूक हेवर्ड यांनी देखील ही गोष्ट मान्य केली आहे.
ब्रूक हेवर्ड यांनी लिहिलं आहे की "पामेला ही एक उत्तम भेट होती. त्यांनी ज्या पुरुषांवर प्रेम केलं होतं त्यांना त्या समजून घेऊ शकल्या. तिथूनच त्यांची सुरूवात आणि शेवट झाला. त्यांचं आयुष्य असंच होतं."
जुन्या प्रियकराशी लग्न
1971 साली लेलॅंड यांचा मृत्यू झाल्यानंतर पामेला यांच्या शेजारी आणि पत्रकार लॅली वेयमाऊथ यांनी पाहिलं की पामेला "खूपच दु:खी" झाल्या होत्या.
लॅली यांची आई आणि वॉशिंग्टन पोस्टच्या प्रकाशक कॅथरिन ग्रॅहम यांनी एक पार्टी दिली होती. वेमाऊथ यांनी या पार्टीसाठी पामेला यांना त्यांच्या घरी येण्याचा आग्रह केला.
तिथे पामेला यांची भेट पुन्हा अॅवरेल हॅरिमन यांच्याशी झाली. त्यावेळेस हॅरिमन यांच्या पत्नीचा एक वर्षाआधीच मृत्यू झालेला होता.
साहजिकच हे दोघे जुने प्रेमी आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्या जोडीदाराशिवाय एकांतातच आयुष्य जगत होते. परिणामी ते दोघेही लवकरच एकमेकांच्या जवळ आले आणि काही महिन्यांनी त्यांनी लग्न केलं.

फोटो स्रोत, Getty Images
पामेला यांच्या या नव्या विवाहाबद्दल अनेक चर्चा झाल्या. याबद्दल पर्नेल यांनी लिहिलं आहे की, "पामेला यांनी अॅव्हेरल यांना भेटण्यासाठी त्या पार्टीचं आमंत्रण मिळावं म्हणून लॉबिंग केलं होतं ही गोष्ट वॉशिंग्टनमध्ये लोककथा बनली आहे."
पर्नेल पुढे लिहितात,"अनेकदा पामेला यांच्याबद्दलच्या अफवा या सेक्सच्या विषयीच्या माहितीनं इतक्या भरलेल्या असत की अनेकजण त्या खऱ्या आहेत की नाही याची चिंता करत नसत."
पामेला यांच्या आयुष्यातील नाट्य एवढ्यावर थांबलं नव्हतं. कॅपोटे यांची ल कोटे बास्क 1965 (La Côte Basque 1965) ही लघुकथा एस्क्वायर या मासिकात 1975 मध्ये आली.
त्यात एक संवेदना नसलेली महिला लेडी इना कूलबर्थ यांचं पात्र होतं. ही महिला त्या कथेच्या केंद्रस्थानी होती आणि तिची व्यक्तिरेखा श्रीमती हॅरिमन यांच्याशी साम्य असलेलं होती. यामुळे नव्या श्रीमती हॅरिमन यांना अपमान सहन करावा लागला.
अमेरिकेच्या राजकारणातील प्रभाव
मात्र आपल्या आयुष्याच्या अखेरच्या दोन दशकांमध्ये पामेला या वॉशिंग्टनमधील सत्ताकारणातील एक महत्त्वाच्या व्यक्ती बनल्या होत्या. त्यांच्यामागे हॅरिमन यांच्या संपत्तीची ताकद होती.
1980 मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या रोनाल्ड रेगन यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रचंड विजय मिळाल्यानंतर हॅरिमन यांच्या संपत्तीच्या त्या जोरावर पामेला यांनी डेमोक्रॅटिक पार्टीच्या उमेदवारांना निधी पुरवायला सुरूवात केली. या उमेदवारांसाठी प्रचार मोहिमा आखण्यास सुरूवात केली.
डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन आणि बिल क्लिंटन हे पामेला यांचे लाडके उमेदवार होते. बायडन डेलवेअर इथून, तर बिल क्लिंटन अरकान्सासमधून उमेदवार होते. हे दोघेही पुढे जाऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले.
पामेला यांच्या या भक्कम आणि नियोजनपूर्वक करण्यात आलेल्या कृतीची परिणती अमेरिकेच्या सत्ताकेंद्रातील त्यांचं स्थान भक्कम होण्यामध्ये झाली.
त्यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून बिल क्लिंटन यांनी त्यांची नियुक्ती फ्रान्समधील अमेरिकेच्या राजदूत म्हणून केली.
त्या काळात पामेला या हॅरिमन यांच्या अत्यंत विश्वासू आणि त्यांची काळजी घेणाऱ्या पत्नी असताना देखील वॉशिंग्टन पोस्टचे प्रदीर्घ काळ संपादक असलेले बेन ब्रॅडली यांनी पामेला यांच्यावर सडकून टीका केली होती.

फोटो स्रोत, Penguin Random House
त्या टीकेला पामेला यांच्या प्रेमप्रकरणांचा संदर्भ होता. त्यांनी पामेला यांचं वर्णन "अशी व्यक्ती जिचं राजकारण दोन पायांच्या मध्ये आहे" असं केलं होतं, असं पर्नेल यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.
थॉमस मॅलन एक ऐतिहासिक कादंबरीकार आणि निबंधकार आहेत.
'द वॉशिंग्टन पोस्टसाठी किंगमेकर' या पुस्तकाची समीक्षा करताना त्यांनी लिहिलं आहे की, "इतक्या महत्त्वाच्या विषयातील विचित्र आणि विशिष्ट अशा घातकपणाची, थंडपणाची मांडणी या पुस्तकात झालेली नाही. त्यांच्यात अजूनही असणारा पश्चातापरहित, यांत्रिक स्वभाव जो इतक्या प्रदीर्घ काळानंतरदेखील आकर्षक वाटण्याऐवजी अधिक तिरस्करणीय आहे. त्याचा पुरेसा अंतर्भाव या पुस्तकात झालेला नाही."
पर्नेल बीबीसीला सांगतात की त्यांना वाटतं की त्यांच्या पुस्तकाला मिळालेल्या प्रतिकूल प्रतिसादाचा त्यांच्यासाठीचा अर्थ म्हणजे पामेला ज्या गोष्टींमधून गेल्या, त्यांनी ज्या गोष्टींचा सामना केला त्याचा एक छोटासा अंश अनुभवण्यासारखंच आहे.
पामेला यांची कागदपत्रे आणि पत्रे आता अमेरिकन काँग्रेसच्या ग्रंथालयात ठेवण्यात आली आहेत. ही कागदपत्रे आणि पत्रे वाचल्यानंतर पर्नेल यांना त्यांच्या लेखनाचा हा विषय अधिकाधिक आवडू लागला.
कदाचित पामेला यांचं आयुष्य हे एकप्रकारे रोरस्कॅच चाचणी (Rorschach test)आहे. (एखाद्या माणसाच्या व्यक्तिमत्वातील पैलू आणि भावनिक कलाचं विश्लेषण करण्यासाठी ही चाचणी केली जाते.) महिलांविषयी कायमस्वरुपी असलेला हा दुहेरी मापदंड तुम्हाला कसा भासतो?
लीमर नमूद करतात त्याप्रमाणे, "हे अजूनही खरं आहे. जर तुम्ही महिला असाल आणि तुम्ही अनेक पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवलेत, तर तुम्ही 'बदफैली, व्यभिचारी' ठरता. मात्र जर तुम्ही पुरुष असाल आणि तुम्ही अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेवलेत तर तुम्ही एक 'ताकदवान, प्रभावशाली व्यक्ती' ठरता."
एखाद्या काळातील महिलेबद्दल तुम्ही कोणत्या अटींवर मत ठरवावं? अगदी लहान वयापासूनच पामेला सत्ता, ताकद याकडे आकर्षित झाल्या होत्या.
त्यातच त्या अल्पशिक्षित असल्यानं ते मिळवण्यासाठी स्वत:च्याच हिंमतीनं, ताकदीनं त्याचा पाठपुरावा करण्याची त्यांच्याकडे फारशी संधी नव्हती.
याबाबतीत पामेला यांनी स्वत:चंच केलेलं मूल्यमापन डोळे उघडणारं आहे. 1992 मध्ये न्यूयॉर्क मासिकात मायकल ग्रॉस यांच्याशी बोलताना पामेला यांनी त्यांचं मत मांडलं होतं आणि नंतर न्यूयॉर्क टाइम्समध्ये त्यांचं वक्तव्यं छापण्यात आलं होतं.
त्यात पामेला म्हणाल्या होत्या, "मुळात मी एक बॅकरूम गर्ल आहे. (म्हणजेच अशी महिला जी एखाद्या संस्थेत महत्त्वाचं काम करते मात्र लोकांना त्याबद्दल फारसं माहित नसतं) हे मी नेहमीच सांगितलं आहे आणि मी त्यावर नेहमीच विश्वास ठेवला आहे. इतर लोकांना पुढे आणण्यात आणि त्यांना समोर आणण्यास मी प्राधान्य देते. मला स्वत:ला पुढे करणं मला अजिबात आवडत नाही. मी ज्यांच्यावर प्रेम केलं, त्या माझ्या दोन पतींची पत्नी म्हणून जगण्यातच मला प्रचंड आनंद मिळत होता."
सोनिया पर्नेल यांचं 'किंगमेकर' हे पुस्तक पेंग्विन रॅंडम हाऊसनं प्रकाशित केलं आहे. क्लेअर मिकहू हे 'द रोमानोव ब्राई़ड्स' या कादंबरीच्या लेखिका आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)





















