भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत स्फोटामुळं छत कोसळले, दुर्घटनेत 8 मृत्यू तर 5 गंभीर जखमी

भंडाऱ्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट झाला आहे.
फोटो कॅप्शन, भंडाऱ्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट झाला आहे.
    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगरमधील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये झालेल्या स्फोटामुळं छत कोसळून त्याखाली दबल्यानं 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे.

तसंच या अपघातात 5 जण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

ढिगाऱ्यातून पाच जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळालं. तर आठ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.

ऑर्डनन्स फॅक्टरी ही डिफेन्स फॅक्टरी अर्थात आयुधांची निर्मिती करणारी फॅक्टरी आहे. सुरुवातीला या दुर्घटनेमध्ये 13 जण अडकल्याची माहिती होती.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान मृत आणि जखमींच्या आकड्याबाबत माहिती दिली होती. यावेळी मृतांना श्रद्धांजलीही अर्पण करण्यात आली.

त्यावेळी या घटनेसंदर्भात माहिती देताना त्यांनी म्हटलं की, "भंडाऱ्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमधील स्फोटामध्ये आठ लोकांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे."

जिल्हा नियंत्रण कक्षानं दिलेल्या माहितीनुसार सकाळी अंदाजे दहा वाजता आयुध निर्माणी जवाहर नगरमध्ये एक स्फोट झाला. त्यात छत कोसळल्यानं त्याखाली काहीजण दबले गेले.

त्यानंतर प्रशासनाकडून अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मुख्यमंत्र्यांकडून घटनेची दखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, "भंडारा जिल्ह्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमधील स्फोटाच्या घटनेत छत कोसळून 13 ते 14 कामगार अडकल्याचे वृत्त आहे. त्यातील 5 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी असून सर्व प्रकारची मदत पुरवण्यात येत आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

बचाव कार्यासाठी एसडीआरएफ तसेच नागपूर महापालिकेची चमू सुद्धा पाचारण करण्यात आल्या. संरक्षण दलासोबत जिल्हा प्रशासन समन्वयाने मदत कार्यात सहभागी आहे. वैद्यकीय मदतीसाठी सुद्धा चमू सज्ज ठेवल्या आहेत.

भंडाऱ्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट झाला आहे.

आतापर्यंत प्राप्त प्राथमिक माहितीनुसार, या घटनेत दुर्दैवाने एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो," असं फडणवीस ट्विटमध्ये म्हणाले.

बचाव कार्य सुरु

घटनेनंतर लगेचच घटनास्थळी अग्निशमन पथक, पोलीस, तहसीलदार व इतर आवश्यक प्रशासकीय अधिकारी उपस्थित झाले. अधिकची मदत एसडीआरएफ यांना पाचरण करण्यात आल्याची माहितीही देण्यात आली.

भंडाऱ्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये स्फोट झाला आहे.

भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी संजय कोलते यांनी यासंदर्भात माहिती देताना सकाळी म्हटलं होतं की, "भंडाऱ्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये आज सकाळी साडेदहाच्या सुमारास एक स्फोट झालेला आहे. त्या स्फोटामुळे तेरा ते चौदा लोक बाधित झाल्याची माहिती मिळत आहे.

सध्या या फॅक्टरीमध्ये बचाव कार्य सुरु आहे. सध्या आम्ही सहा जणांना बाहेर काढलं असून त्यातील एक व्यक्ती मृत आहे. उर्वरित पाच जणांना उपचारांसाठी दवाखान्यात नेलं आहे. आणखी सात ते आठ व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे," असं त्यांनी सकाळी सांगितलं होतं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)