'सुंता केल्यानंतर माझ्या मुलानं स्वतःचं जीवन संपवलं'

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
- Author, कॅरोलिन लोब्रिज
- Role, बीबीसी न्यूज
- Published
"नुकतंच जे काही घडलं होतं, ती एक मोठी आपत्ती होती हे लगेचच माझ्या लक्षात आलं होतं... माझा मृत्यू 2015 मध्येच झाला होता, आता नव्हे."
लेस्ली रॉबर्ट्स यांना त्यांच्या लाडक्या मुलाचा म्हणजे अॅलेक्स हार्डीचा अखेरचा ई मेल मिळाला होता. तो ई मेल वाचून त्यांना सगळं काही उध्वस्त झाल्याची भावना निर्माण झाली होती.
25 नोव्हेंबर 2017 रोजी अॅलेक्सनं आत्महत्या केली त्यानंतर 12 तासांनी लेस्ली यांना हा ई मेल मिळेल, अशाप्रकारे त्याचा वेळ सेट करण्यात आला होता. पण ई मेल मिळण्याच्या तासाभरापूर्वीच त्यांच्या दाराची बेल वाजली. त्यांनी दार उघडले तर समोर पोलीस उभे होते. त्यांनी लेस्ली यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूबाबत माहिती दिली.
अॅलेक्स हा अत्यंत हुशार आणि सर्वांमध्ये सुपरिचित असा 23 वर्षांचा उमदा तरुण होता. पण त्याला मानसिक आजार किंवा तशी काही समस्या नव्हती. त्यामुळं त्यानं स्वतःला का संपवलं हेच लेस्ली यांना कळत नव्हतं.

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
पण त्यानं ई मेलमध्ये एक गोष्ट सांगितली होती. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या पेनिसचे फोरस्किन (लिंग किंवा गुप्तांगाच्या सोमरच्या भागातील कातडे) शस्त्रक्रिया करून काढल्याचं त्यानं ई मेलमध्ये लिहिलं होतं. या शस्त्रक्रियेला सुंताम्हणतात, पण हा प्रकार म्हणजे एका प्रकारची जननेंद्रियाची विकृतीच आहे, असा अॅलेक्सचा ठाम विश्वास झाला होता.
मात्र, अॅलेक्सनं तो जिवंत असताना त्याच्या कुटुंबीयांकडे अथवा मित्रांकडे कधीही याबाबतचा उल्लेख केला नव्हता. लेस्ली यांना तर त्यांच्या मुलाची अशी काही शस्त्रक्रिया झाल्याचंही माहिती नव्हतं.
त्यानंतरच्या काही महिन्यांत लेस्ली यांनी याबाबत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. अॅलेक्सवर याच एवढा गंभीर परिणाम का झाला? आणि त्याला स्वतःला संपवणे हा एकच पर्याय शिल्लक आहे, असे का वाटले असावे? याचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
अॅलेक्स हा लेस्ली यांच्या तीन मुलांपैकी सर्वात मोठा मुलगा होता. त्याच्यासाठीही त्यांना बराच काळ वाट पाहावी लागली होती. लेस्ली यांनी मातृत्वासाठीचे उपचार घेतल्यानंतर त्याचा जन्म झालेला होता.
जुलै 1994 मध्ये लेस्ली आई झाल्या, त्यावेळी कित्येक दिवसांचं स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मनात होती, असं त्या सांगतात.
"माझ्यासाठी तोच सर्वस्व होता. तो अत्यंत सुंदर, अगदी साधा आणि त्याच्या लाडक्या लहान भावाचा म्हणजे थॉमसचा सांभाळ करणारा असा मुलगा होता. थॉमसचा जन्म त्याच्यानंतर जवळपास तीन वर्षांनी आणखी काही उपचारांनंतर झाला होता," असं त्या म्हणाल्या.
अॅलेक्सचं त्याच्या लहान भावावर म्हणजे जेम्सवरही प्रचंड प्रेम होतं. अॅलेक्स 13 वर्षांचा असताना जेम्सचा जन्म झाला होता. चेशरमध्ये असलेल्या त्यांच्या घराच्या भिंती आणि खिडक्यांभोवतीची जागा त्या सर्वांच्या फोटोंनी व्यापलेली होती.

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
अॅलेक्स शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर राहत होता आणि इंग्रजीमध्ये जणू त्याला विशेष वरदान मिळालेलं होतं. त्याचं इंग्रजी एवढं चांगलं होतं की, त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ त्याच्या जुन्या शाळेनं अॅलेक्स हार्डी क्रिएटिव्ह रायटिंग या पुरस्काराची सुरुवात केली होती.
"अॅलेक्सला इतिहासाची प्रचंड आवड होती. पण त्याची इंग्रजी विषयाची शिक्षिका असल्यामुळं मी त्याच्यामध्ये लिखाणाचं खरं कौशल्य हेरलं होतं," असं जेसन लोव यांनी सांगितलं. ते आता तारपोर्ले हाय स्कूलमध्ये हेड टिचर (मुख्याध्यापक) पदावर आहेत.
अॅलेक्स 14 वर्षांचा असताना शाळेच्या स्किइंग ट्रिपसाठी म्हणून कॅनडाला गेला होता. त्यावेळी तो कॅनडा या देशाच्या अक्षरशः प्रेमात पडला होता. त्यानं एखाद्या लहान मुलाप्रमाणं त्यावेळी स्किइंगचा आनंद लुटला होता. त्यानंतर त्याचं याबाबतची आवड पुन्हा एकदा नव्यानं वाढली होती. त्यामुळं अॅलेक्स जेव्हा 18 वर्षांचा झाला तेव्हा त्यानं विद्यापीठातून एका वर्षाचा ब्रेक घेतला आणि एक वर्ष कॅनडात जाऊन राहण्याचा निर्णय त्यानं घेतला होता.

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
"तो कॅनडाच्या पूर्णपणे प्रेमात पडला होता. त्याठिकाणी त्यानं खूप मित्र केले होते आणि कामातही त्याला प्रमोशन मिळालं होतं,"असं लेस्ली म्हणाल्या.
"एक वर्षानंतर त्यानं मला फोन केला आणि म्हणाला, 'आई मी विद्यापीठ शिक्षणात पुन्हा ब्रेक घेतोय'. त्यानंतर दोन वर्षांनंतर पुन्हा तसंच घडलं."
दोन वर्षाची तीन, चार वर्षे झाली आणि अखेर त्याच्या मृत्यूपर्यंत म्हणजे पाच वर्षे अॅलेक्स कॅनडामध्येच राहिला आणि तो तिथला रहिवासीदेखील बनला होता.
"तो अत्यंत विनम्र असा 'सुपर स्मार्ट ब्रिट' म्हणून ओळखला जाऊ लागला होता," असं त्याच्या आईनं सांगितलं.
"तो युकेचा अत्यंत हुशार व्यक्ती होता, ज्यानं कॅनडियन रेसिडेन्सी अॅप्लिकेशनद्वारे तेथील लोकांची मदत केली होती."
लेस्लीनं काही वेळा अॅलेक्सची भेट घेतली होती. काही वेळा त्या एकट्या अॅलेक्सला भेटल्या होत्या. तर काही वेळा त्याच्या भाऊ आणि सावत्र वडिलांसहदेखील भेटल्या होत्या. त्या सर्वांचं अत्यंत आनंदी आणि प्रेमळ कुटुंब होतं. पण अॅलेक्सनं त्यांच्यापैकी कुणालाही तो लिंगाशी आधारित एका समस्येचा सामना करत असल्याचं सांगितलं नव्हतं.

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
त्यानं अखेरच्या ई मेलमध्ये मात्र याबाबत लिहिलं होतं. " माझ्या समोरील भागाची कातडी अत्यंत घट्ट असल्याचा त्रास होता. किशोरवयात असल्यापासूनच मला हा त्रास होत होता. माझ्या गुप्तांगावरील कातडी ताणली जात नसल्याने मला बेडरूममध्ये प्रचंड त्रास होत होता. त्यामुळं अनेकदा मला काही विचित्र क्षणांचा सामनादेखील कराला लागला होता," असं त्यानं ई मेलमध्ये लिहिलं होतं.
अॅलेक्स 2015 मध्येही शांतपणे या सर्वाला सामोरं जात होता. तेव्हा त्यानं कॅनडात एका डॉक्टरांचा सल्ला घेतला. डॉक्टरांनी त्याला स्टेरॉईड असलेला मलम दिला. त्यामुळं त्याचं फोरस्कीन म्हणजे गुप्तांगावरील कातडी सैल होऊन ताणली जाईल असं डॉक्टरांनी सांगितलं. पण काही आठवड्यांनंतरही फारसा काही फरक पडला नाही. त्यामुळं उपचार कामी येत नसल्यानं अॅलेक्स पुन्हा डॉक्टरांकडे गेला.
अॅलेक्सला जो त्रास होत होता त्याला वैद्यकीय भाषेत फायमोसिस (phimosis) म्हणतात. याचा सोपा अर्थ म्हणजे त्याच्या पेनिजची समोरची कातडी एवढी घट्ट असते की, ती पेनिजच्या टोकावरून मागे सरकूच शकत नाही. अॅलेक्सनं त्याच्या ई मेलमध्ये याचा उल्लेख केला होता. मुलांच्या जीवनात सुरुवातीच्या काळात असे होणे ही अगदी सामान्य बाब आहे. मुलं जस-जशी मोठी होत जातात, तशी त्यांची फोरस्कीन सैल होऊन पेनिजपासून वेगळी होत असते.
फायमोसिसनं शक्यतो काही समस्या निर्माण होत नाहीत. पण जर काही समस्या निर्माण झाल्याच तर त्यात लघवी करण्यास त्रास होणं किंवा शारीरिक संबंधांदरम्यान वेदना होणं, याचा समावेश असू शकतो. इंग्लंडमध्ये या समस्येसाठी NHS सुरुवातीला टॉपिकल स्टेरॉइड्सच्या वापराचा आणि कातडी सैल करण्याच्या इनतर तंत्राचा अवलंब करण्याचा सल्ला देतं. त्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून सर्कमसिजन (शस्त्रक्रिया) करण्याचा सल्ला दिला जातो.

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
कॅनडामध्ये सर्वसाधारणपणे शस्त्रक्रिया ही अधिक प्रमाणात केली जाते. अॅलेक्सला डॉक्टरांनी युरॉलॉजिस्टकडे जाण्याचा सल्ला दिला.
"त्यांनी मला थेट शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. मी स्ट्रेचिंग (कातडी ताणून सैल करणे) बाबत विचारले. पण ते माझ्याशी थेट खोटं बोलले, माझ्या बाबतीत ती प्रक्रिया किंवा पद्धत कामी येणार नाही, असं सांगितलं," असं अॅलेक्सनं पत्रात लिहिलं.
"मी त्यांच्यावर विश्वास ठेवत होतो. कारण यासंदर्भात त्यांना अधिक माहिती असेल असं मला वाटत होतं. त्यामुळं मी काहीशा साशंकपणे का होईना, पण ते मान्य केलं."
लेस्ली यांनी नंतर त्या युरॉलॉजिस्ट संदर्भात लोकांनी दिलेले ऑनलाईन रिव्ह्यू वाचले. त्यामुळं त्या डॉक्टरच्या कार्यक्षमतेबाबत किंवा पात्रतेबाबत नंतर त्यांच्या मनात काही शंका निर्माण झाल्या. या डॉक्टरच्या एका रुग्णानं लिहिलं होतं की, त्यांची मूत्रपिंडाच्या आजारामुळं शस्त्रक्रिया झाली होती. शस्त्रक्रियेनंतर तिला कामच करता येत नसून, डॉक्टरनं त्यांचं जीवन उध्वस्त करून टाकलं आहे, असं त्यांनी लिहिलं होतं.
"मी तीन लहान मुलांची आई आहे. ते आता दररोज मला अशा वेदनांमध्ये पाहतात तेव्हा मी जगेल की नाही अशी भीती त्यांना वाटत असते," असं त्यांनी लिहिलं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
"त्यांनी इतरांच्या आजाराचं कसं चुकीचं निदान केलं, कशा शस्त्रक्रिया केल्या आणि त्यांचं जीवन उध्वस्त केलं," असं आणखी एका रिव्ह्यूमध्ये म्हटलं होतं. तर एकानं तो अत्यंत धोकादायक आणि अक्षम असल्याचं लिहिलं होतं.
अॅलेक्सच्या याच युरॉलॉजिस्टसंदर्भातील एक रिव्ह्यू तर आणखी धक्कादायक होता. "त्यांनी शस्त्रक्रियेचं एक उपकरण माझ्या मुत्राशयामध्ये आतच सोडलं होतं. मला तीन महिन्यांनंतर याबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळं तुम्हाला काहीतरी होण्याआधी तिथून पळ काढा!" असं त्यात लिहिलेलं होतं.
लेस्ली अशाप्रकारच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर अत्यंत घाबरून गेल्या होत्या. त्यांनी या युरॉलॉजिस्टची चौकशी करण्याची मागणी केली. त्यावर त्यांना चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलं.
द कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन ऑफ ब्रिटिश कोलंबिया यांनी बीबीसीला सांगितलं की, "एखाद्या डॉक्टरच्या विरोधात असलेल्या तक्रारीबाबत ते माहिती जाहीर करू शकत नाहीत. जर तक्रार अधिकृत शिस्तभंगाबाबतची असेल, तरच ते तसं करू शकतात."
"माझ्या लाडक्या मुलानं तिथून पळून जायला हवं होतं. असं मला आज अगदी मनापासून वाटतं," असं लेस्ली म्हणाल्या.
त्यावेळी अॅलेक्सचा लॅपटॉप तुटला होता. त्यामुळं त्याला तेव्हा या युरॉलॉजिस्ट संदर्भात आणि या शस्त्रक्रियेबाबत अधिक माहिती घेता आली नाही, याबाबतही लेस्ली यांनी दुःख व्यक्त केलं.
अॅलेक्सनं सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कम्प्युटर्सवर याबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला, पण त्याला ते फारसं सहज किंवा सोपं वाटलं नाही. तसंच या विषयावर मित्रांबरोबर चर्चा करण्याइतपत मोकळेपणाही त्याला जाणवला नाही.
अखेर ही छोटीशी शस्त्रक्रिया आहे असं वाटल्यामुळं अॅलेक्सनं 2015 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
पण शस्त्रक्रियेनंतरही अॅलेक्सला अनेक शारीरिक त्रासांचा सामना करावा लागला. त्याबद्दल त्यानं आईला लिहिलेल्या ई मेलमध्ये तपशीलवार माहिती दिली होती.

फोटो स्रोत, Getty Images
त्याच्या पेनिजच्या समोरच्या भागावर आता पूर्वीप्रमाणं कातडी नव्हती. याभागात त्याला सातत्यानं उत्तेजना निर्माण झाल्यासारखं वाटत होतं.
"अगदी कपड्याच्या घर्षणामुळंही त्याला उत्तेजना निर्माण होऊ लागल्या होत्या आणि पुढं त्या वेदनांमध्ये रुपांतरीत झाल्या. पुढची अनेक वर्ष ते कमी किंवा पूर्वीसारखं झालं नाही," असं त्यानं लिहिलं होतं.
"कल्पना करा की जर आपल्या डोळ्याच्या वरचा भागच नसेल तर डोळ्याचं किंवा बुबुळाचं काय होईल?"
"त्याला एवढ्या वेदना होत होत्या की अगदी साधं काम करतानाही त्याला त्याची जाणीव व्हायची. त्याला स्किइंगची आवड होती. स्नोबोर्डची आवड होती, मग त्यावरूनच तुम्ही त्याच्या वेदनांची कल्पना करा," असं लेस्ली म्हणतात.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते कातडीच्या या शस्त्रक्रियेनंतर (सर्कमसिजन) गुप्तांगाचं पुढचं टोक हे अधिक संवेदनशील बनत असतं. पण नंतर हळू-हळू ही संवेदनशीलता कमी होते.
"मी नेहमी मुलांना सांगतो की, सुरुवातीला तुम्हाला अधिक संवेदना जाणवतील. कारण अचानकपणे त्या भागावर असलेलं एका प्रकारचं सुरक्षा कवच निघून जात असतं. त्यामुळं तिथं वेगळ्या संवेदना जाणवतात," असं डॉक्टर ट्रेवर डॉरकीन यांनी म्हटलं. त्यांनी अशा प्रकारच्या 1000 हून अधिक शस्त्रक्रिया केल्या आहेत.
"पण बहुतांश प्रकरणांमध्ये लोकांना त्याची सवय होते. गुप्तांगाच्या टोकापासून मेंदूपर्यंत जाणाऱ्या या संवेदनांशी जुळवून घेणं शक्य होतं."

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
अॅलेक्सनं इरेक्टाइल डिसफंक्शन आणि जळजळ तसंच खाज येणं अशा त्रासाचाही उल्लेख केला होता. विशेषतः ज्या भागातून कातडी काढण्यात आली होती, त्या भागात त्याला हा त्रास जाणवत होता. लिंगाच्या खालच्या या भागाला कातडी जोडलेली असते, त्याला फ्रेनुलम म्हणतात.
"हा सर्वाधिक उत्तेजना निर्माण करणाऱ्या भागांपैकी एक असतो, त्यामुळं लैंगिक संबंधांमध्ये तो महत्त्वाचा असतो," असंही डॉरकीन म्हणतात.
"लिंगावरील कातडे, लिंगाचे टोक आणि फ्रेनुलम हे अत्यंत संवेदनशील भाग असतात.
"पण तुम्ही जेव्हा ही शस्त्रक्रिया करता तेव्हा फ्रेनुलम पूर्वीप्रमाणे राहत नाही. पण त्यामुळं त्याचा परिणाम एकूण लैंगिक कार्यक्षमता किंवा आनंदावर होतोच, असंही नाही."
पण अॅलेक्सच्या मते, त्याच्यासाठी फ्रेनुलम हे महत्त्वाचं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
"माझ्या शरीरात ते नसल्यामुळं मी ठामपणे हे सांगू शकतो की, हा लिंगाचा आणि एकूणच मानवी शरिरातील सर्वात संवेदनशील भाग असतो," असं त्यानं लिहिलं होतं.
अॅलेक्सनं त्याच्या स्नायूंमध्ये होणाऱ्या वेदना आणि त्यामुळं होणाऱ्या त्रासाचाही उल्लेख केला होता. हा त्रास वाढत त्याच्या पोटापर्यंत पोहोचला होता.
अॅलेक्सनं या शस्त्रक्रियेनंतर कधी सेक्स केला होता की नाही, याबाबत लेस्ली यांना माहिती नव्हती.
"आधी माझ्याकडे शारीरिक संबंधांसाठी एक विशिष्ट अवयव होता. पण आता माझ्याकडे एक बिनकामाची काठीसारखी कोणती तरी गोष्ट आहे. माझी कामुकता छाटण्यात आली आहे," असं अॅलेक्सनं लिहिलं होतं.
"निसर्गाला सर्वकाही स्पष्टपणे माहिती असतं. एखाद्या अवयवाचा भागच कापल्यानंतर पुन्हा ते नैसर्गिक अवयवासारखं कसं होऊ शकतं?" असा प्रश्न अॅलेक्सनं केला होता.
अनेक लोकांप्रमाणेच लेस्ली यांनाही त्यांच्या मुलाच्या मृत्यूपूर्वी सुंथा या शस्त्रक्रियेबाबत फारशी माहिती नव्हती असं त्या मान्य करतात.
"ही अगदी सर्वसामान्य शस्त्रक्रिया आहे, या व्यतिरिक्त मला फारसं काही माहिती नव्हतं," असं त्या सांगतात.
फोरस्किनला अनेकदा त्वचा किंवा कातडीचा एक बिनकामाचा भाग म्हणून लोक त्याकडं दुर्लक्ष करतात. पण डॉक्टर डॉरकीन यांच्या मते त्याचंही एक वेगळं महत्त्व असतं.

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
"त्यामुळं लिंगाचं टोक झाकलं जातं. त्यामुळं त्याला काहीसं संरक्षण मिळतं. त्याचं काम एकप्रकारे रक्षणाचं आहे, असं समजलं जातं," असं मत डॉरकीन यांनी मांडलं.
तुम्ही जगाच्या कोणत्या भागातील आहात, किंवा कोणत्या संस्कृतीमध्ये लहानाचे मोठे झाले आहात, यावर सुंतां करण्याचं प्रमाण ठरत असतं.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार नायजेरियामध्ये सुंता करण्याचं प्रमाण हे 95% आहे. तर जगाच्या इतर भागात मात्र ते कमी जास्त होतं.
काही धर्मांमध्ये सुंता करणं याला एक वेगळं महत्त्वं आहे. विशेषतः मुस्लीम आणि यहुदी धर्मामध्ये सुंता हा प्रकार आढळतो. याला विरोध करणाऱ्यांना या धर्माच्या विरोधातील समजलं जातं.
पण लेस्ली यांचा मुलगा अॅलेक्सबाबत असं काहीही नव्हतं.
"माझ्यासाठी याचा धर्माशी काहीही संबंध नव्हता. मी सर्व धर्मांचा आदर करते आणि अॅलेक्सही करत होता," असं त्या म्हणाल्या.

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
अॅलेक्स राहत असलेल्या कॅनडामध्ये अंदाजे 32 टक्के पुरुषांची सुंता किंवा अशा प्रकारची शस्त्रक्रिया झालेली आहे.
पुरुषांची सुंता करणं याला एवढं सामान्य रुप देण्यात आलंय की आता कोणीही त्यावर प्रश्न उपस्थित करत नाही. मात्र महिलांच्या बाबतीत हा प्रकार चुकीचा ठरवण्यात आला असून अनेक देशांत आता त्यावर बंदी घालण्यात आलीय. पण पुरुषांच्या बाबतीतही सुंता हा प्रकार म्हणजे जननेंद्रियाच्या विकृतीचा प्रकार समजला जायला हवा, असं अॅलेक्सचं मत होतं.
"जर मी महिला असतो तर हे बेकायदेशीर ठरलं असतं. ही सर्जरी करणारा डॉक्टर गुन्हेगार ठरला असता. त्यामुळं त्यानं कधीही अशा पर्यायाचा विचार केला नसता," असं अॅलेक्सनं लिहिलं होतं.
"पुरुष किंवा महिला यात मला भेदभाव करायचा नाही. पण सर्वांना समान वागणूक असायला हवी, असंच मला वाटतं."
सुंता या प्रकाराच्या विरोधी मोहीम चालवणाऱ्यांच्या मते, लहान मुलांची सुंता करणं हे चुकीचं आहे. मग ते पुरुष असो की स्त्री. त्याचं कारण म्हणजे ते यासाठी परवानगी देऊ शकत नाही. तसंच या चळवळीतील लोकांच्या मते, हा मानवाधिकाराचा मुद्दा आहे.
जवळपास 21 वर्षे एका पूर्ण आकाराच्या लिंगासह जगल्यानंतर अॅलेक्सचं असं मत होतं की, ज्या मुलांची सुंता किंवा अशाप्रकारची शस्त्रक्रिया झाली आहे, त्यांना त्यांनी नेमकं काय गमावलं आहे हेच कळणार नाही. त्यांच्या लिंगाची जवळपास 75 टक्के संवेदना कमी होते, असा अंदाज अॅलेक्सनं व्यक्त केलाय.

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
मात्र, प्रौढ झाल्यानंतर ज्यांची सुंता होते त्यांचे अनुभव हे अत्यंत वेगळे असतात.
काही पुरुष सुंता झाल्यानंतरच लैंगिक संबंध ठेवायला प्राधान्य देतात. कारण घट्ट लिंगामुळं किंवा समोरच्या कातडीमुळं होणाऱ्या वेदनांची जाणीवच त्यांना होत नसते.
काहींच्या मते, संवेदना प्रचंड कमी होतात आणि त्यामुळं शारीरिक संबंधांमधील त्यांचा आनंद कमी होतो.
काहींच्या मते, संवेदना कमी झाल्या तरी त्यांच्या एकूण लैंगिक आनंदामध्ये त्यामुळं फारसा काही फरक पडत नाही.
काही जण सुंता करण्याच्या निर्णयाने अत्यंत आनंदी असतात तर अॅलेक्स सारख्या काहींना ते केल्याचं प्रचंड दुःख असतं.
अॅल्केसनं या शस्त्रक्रियेनंतर आणखी वैद्यकीय मदत घेतली. तसंच त्यानं मानसोपचारही घेतले. पण त्यानं याबाबत कधीही त्याच्या कुटुंबातील सदस्यांशी किंवा मित्रांबरोबर चर्चा केली नाही.
"मी ती दोन वर्षे त्याच्या सोबत होते. त्यावेळी काहीतरी होत आहे किंवा त्याला काहीतरी त्रास होतोय, याची जाणीव मला झालीच नाही, असं म्हणणं चुकीचं ठरेल," असं लेस्ली म्हणाल्या.
"मी त्याला विचारतं होते, तुला कशाचा त्रास होतोय का? तू ठिक आहेस का? आणि तो मला प्रत्येक वेळी सर्वकाही ठिक असल्याचं पटवून द्यायचा."
लेस्ली या शिक्षिका होत्या. त्यांना आता शाळांमध्ये जाऊन मुलांशी बोलायचं आहे. त्यांच्या अडचणी कितीही खासगी असल्या तरी त्या शेअर केल्या पाहिजे, हे त्यांना मुलांना समजवायचं आहे.
"मला वाटतं की, ज्या पद्धतीनं मुली त्यांच्या समस्यांबाबत मोकळेपणानं बोलतात, तसं पुरुष बोलत नाहीत. पण त्यातही सुंता हा एक अत्यंत वर्ज्य असा मानला गेलेला विषय आहे, असं माझं मत आहे."
"अॅलेक्स हा एक अंतर्मग्न मुलगा होता. तो त्याच्या समस्येबाबत बोलू शकला नाही, आणि मलाही त्याबाबत माहिती नव्हतं."
अॅलेक्सच्या मृत्यूच्या एका आठवड्यानंतर एका मित्रानं लेस्लीला त्याच्याबरोबरच्या अशा प्रकाराबाबत सांगितलं होतं.
डॉरकीन यांच्या मते, सुंता किंवा अशा प्रकारच्या शस्त्रक्रियांनंतर समस्या निर्माण होणं हे दुर्मिळ असलं तरी ते अगदीच कधीही न ऐकलेलं असं नाही.
"अनेकदा याबाबत अगदी गंभीर गोष्टी ऐकायला मिळत असतात. चुकीच्या पद्धतीमुळं काही जणांच्या लिंगाचं नुकसान झाल्याचंही ऐकण्यात आलं आहे," असं ते म्हणाले.
कधी कधी खूप अधिक प्रमाणात कातडी काढली जाते आणि त्याचा परिणाम म्हणजे, लिंगाचा आकार कमी होणे किंवा ते आतल्या बाजुला सरकणे असा होत असतो.

फोटो स्रोत, LESLEY ROBERTS
"शस्त्रक्रिया करणारे सर्जन हेदेखील मानवच असतात. त्यामुळं मानवी किंवा तांत्रिक चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही," असं ते म्हणाले.
काही प्रकरणांमध्ये तर सुंता किंवा ही शस्त्रक्रिया केल्यानंतर लहान मुलांचा मृत्यू झाल्याचंही समोर आलेलं आहे.
मँचेस्टरमध्ये एका नर्सनं घरीच मुलाची सुंता केल्यानंतर चार वर्षांच्या गुडलक कॉबर्गचा रक्तस्त्रावामुळं मृत्यू झाला होता. तर अवघ्या एका वर्षाच्या अँजेलो ओफोरी-मिंटाह याचाही सुंता केल्यानंतर मृत्यू झाला होता.
1995 पासून दक्षिण आफ्रिकेमध्ये विधीनुसार सुंता केल्यानंतर जवळपास 1,100 मुलांचा मृत्यू झाला आहे. का
नुकतीच इटलीतून एक बातमी समोर आली होती. त्यानुसार दोन आठवड्यांमध्ये सुंता केल्यामुळं दोन लहानग्यांनी जीव गमावल्याचं समोर आलं होतं.
"सुंता कायमच वाईट असते असं म्हण्यास मी पात्र नाही. कारण तसं नसतं," असं लेस्ली म्हणतात.
"पण माझ्या मुलाच्या बाबतीत नक्कीच तसं झालं. मला वाटतं याबाबत आणखी अभ्यास करावा लागेल. आपण याबाबतच्या धोक्यांचा विचार करायला हवा. नेमकं काय चुकत आहे, याचा विचार करावा लागेल. तसंच मुलांना याबाबत अधिक जागरूक बनवावं लागेल."
जर ही शस्त्रक्रिया करणं गरजेचंच असेल तर त्यामुळं निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत सांगायला हवं, असं डॉरकीन म्हणतात.
"खास करून जर किशोर वयाच्या अखेरच्या वर्षांमध्ये किंवा प्रौढत्वाच्या मार्गावर असलेल्या मुलांची ही शस्त्रक्रिया केली जाणार असेल, तर त्यांना याबाबतचे धोके सांगायला हवे," असं ते म्हणतात.
"अॅलेक्स म्हणाला होता की, त्याला या धोक्यांबाबत सांगण्यातच आलं नव्हतं. त्याला जर माहिती असतं तर त्यानं कधीही ही शस्त्रक्रिया केली नसती," असं लेस्ली म्हणाल्या.
"अॅलेक्स हा एकटा नव्हता. मला आता समजलं आहे की, ज्याच्याबरोबर असं घडलं असा तो एकटा नाही. आणि हे योग्यही नाही."
15 स्क्वेअर ही संस्था यासंदर्भात काम करते. त्यांच्या माहितीनुसार, अशा प्रकारानंतर आत्महत्या करणारा अॅलेक्स हा एकटाच नाही. लोकांना वाटतं त्यापेक्षा अधिक प्रमाणात हे घडतं, असं संस्थेचे अध्यक्ष डेवीड स्मिथ म्हणाले.
सुंता किंवा अशा शस्त्रक्रियेनंतर किती जणांनी आत्महत्या केली याची नेमकी आकडेवारी नाही. अॅलेक्सचं निधन काही वर्षांपूर्वी झालं असलं तरी त्याची नेमकी कहाणी समोर आली नव्हती. त्याच्या मृत्यूची चौकशी झाली पण ती माहिती कधीही समोर आलीच नाही.
लेस्ली यादेखील त्यांचा मुलगा अॅलेक्सप्रमाणंच एकट्या राहणाऱ्या किंवा फार कोणामध्ये न मिसणाऱ्या आहेत. पण त्यांनी अॅल्केसची ही गोष्ट सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला, त्यामागचं कारण म्हणजे हीच अॅलेक्सची मरण्यापूर्वीची अंतिम इच्छा होती.
"जर या माहितीमुळं एखाद्याला काही फायदा झाला, तर माझा हेतू साध्य झाला असं वाटेल," असं अॅलेक्सनं लिहिलं होतं.
"माझ्याकडे पर्याय होता तेव्हा मला हा मुद्दा उपस्थित करणं सोपं वाटलं नाही. त्यामुळं माझ्या गोष्टीमुळं जर या विषयावर चर्चा होऊन, जागरुकता निर्माण होण्यास मदत झाली तर मला नक्कीच हे सर्व सांगितल्याचा आनंद होईल."
"अॅलेक्सनं त्याच्या पत्रात म्हटलं होतं की, 'जे आमच्या आधी इथं आले आहेत, त्यांच्या खांद्यावर आम्ही उभे आहोत,'" असं लेस्ली म्हणाल्या.
"माझ्या मौल्यवान मुलासाठी मी करत असलेली ही अखेरची गोष्ट आहे."
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



















