प्रेस रिव्ह्यू : भीमा कोरेगाव हिंसाचारातील मृत राहुलच्या कुटुंबीयांना सरकारची दहा लाखाची मदत

भीमा कोरेगाव, हिंसाचार, दलित, दंगल
फोटो कॅप्शन, भीमा कोरेगावमध्ये झालेल्या हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता.
Published

भीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणात प्राण गमावलेल्या राहुल फटांगळेच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत देण्यात आली आहे. राहुलच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांचा चेक सुपुर्द करण्यात आला.

पुण्यातील उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी ही मदत राहुलच्या आईकडे सुपुर्द केली. 'एबीपी माझा'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

एक जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगावमध्ये उसळलेल्या हिंसाचारात राहुल फटांगळेचा मृत्यू झाला होता. दरम्यान या हिंसाचाराप्रकरणी पोलिसांनी 12 जणांना अटक केली आहे.

यापैकी तीनजण अल्पवयीन आहेत. अटक करण्यात आलेले सर्व संशयित भीमा कोरेगाव, सणसवाडी आणि कोंढापुरी गावातील आहेत.

निवडणूक जिंकण्यासाठी कोरेगावची दंगल घडवली: पृथ्वीराज चव्हाण

विरोधी मतांमध्ये विभाजन केल्याशिवाय 2019मध्ये निवडणूक जिंकता येणार नाही याची जाणीव भाजपला झाली आहे. त्यामुळे समाजात फूट पाडण्यासाठी, वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असावा. निवडणुका जवळ येतील तशी सामाजिक समीकरणं बदलवण्यासाठी भीमा कोरेगावसारखे प्रकार वारंवार घडवले जातील, असा आरोप काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.

भीमा कोरेगाव, हिंसाचार, दलित, दंगल

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण

दंगलीमागचे सूत्रधार समोर आले पाहिजेत, अशी मागणीही त्यांनी केली. 'दिव्य मराठी'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. सत्ताधाऱ्यांचा हा डाव उधळून लावण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांना आपापसातील मतभेद विसरून एकत्र यावे लागेल, असंही चव्हाण म्हणाले. समाजात फूट पाडण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले असेल पण राज्याचे घटनात्मक प्रमुख म्हणून ते अपयशी ठरले आहेत, अशी टीका चव्हाण यांनी केली.

खासदारपुत्राची दिल्लीच्या ट्वेन्टी-20 संघात वर्णी

स्थानिक स्तरावर एकही सामना न खेळता खासदारपुत्र सार्थक रंजनची दिल्लीच्या ट्वेन्टी-20 संघात वर्णी लागली आहे, असं वृत्त 'लोकसत्ता'नं दिलं आहे. बिहारचे खासदार पप्पू यादव आणि रंजीत रंजन यांचा सार्थक हा मुलगा. पप्पू यांनी जन अधिकार पक्षाची स्थापना केली आहे तर रंजन काँग्रेस पक्षातर्फे सुपौल मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

राजकारणात प्रवेश करण्याच्या दृष्टीने सार्थकने क्रिकेटला अलविदा केल्याची चर्चा होती. यासाठी दिल्ली रणजी संघात निवड झालेली असतानाही सार्थकने माघार घेण्याचा निर्णय घेतला. नुकत्याच आटोपलेल्या रणजी स्पर्धेत सार्थक दिल्लीसाठी एकही सामना खेळलेला नाही. मात्र तरीही निवडसमितीने त्याची 23 वर्षांखालील संघात निवड केली आहे.

सार्थकची निवड करताना निवडसमितीने 23 वर्षांखालील गटात सर्वाधिक धावा करणाऱ्या हितेन दलालला वगळलं आहे.

भारतात विकासाला प्रचंड वाव: वर्ल्ड बँक

सरकारच्या आर्थिक सुधारणांमुळे यंदाच्या वर्षात देशाचा विकासदर 7.3 टक्के इतका असेल, असा अंदाज जागतिक बँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'नं यासंदर्भात बातमी दिली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था, विकास, जागतिक बँक.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताचा विकासाला प्रचंड वाव असल्याचं जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलं आहे.

चीनचा विकासदर खालावत असताना भारत मात्र हळूहळू प्रगतीपथावर आहे. पुढच्या दोन वर्षात विकासदर 7.5 टक्के असेल असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. 2018 ग्लोबल इकॉनॉमिक्स प्रॉस्पेक्ट्स अहवाल जागतिक बँकेने प्रसिद्ध केला. नोटबंदी, वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीनंतरही देशाचा विकासदर 6.3 टक्के झाला असल्याचं या अहवालात मांडण्यात आलं आहे.

कमला मिल आगप्रकरणी दोषींना आश्रय देणारा अटकेत

कमला मिल आगप्रकरणातील संशयितांना आश्रय देणाऱ्या विशाल कारियाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे. या बातमीमध्ये म्हटलं आहे की, विशाल देशभरातील बड्या सट्टेबाजांचा खबरी असून अनेक भारतीय क्रिकेटपटूशी त्यांचे चांगले संबंध आहेत.

त्याने कमला मिलमधील 'वन अबव्ह'च्या मालकांना आश्रय दिल्याचं चौकशीअंती स्पष्ट झालं आहे. जुहू येथील निवासस्थानाहून विशालला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

आग, मुंबई

फोटो स्रोत, AMOL RODE

फोटो कॅप्शन, कमला मिल आगप्रकरणी अनेकजणांनी जीव गमावला होता.

विशाल हॉटेल व्यावसायिक आहे. दरम्यान कमला मिल आग हुक्क्यातून उडालेल्या ठिणगीतून लागल्याचे उघड झाल्यानंतर मुंबई महापालिकेने हुक्का पार्लरवर कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेने इंटरनेटच्या माध्यमातून या हुक्का पार्लर्सचा शोध घेण्यास सुरूवात केली. शहरात सुरू असलेल्या एकूण 125 हुक्का पार्लरची यादी तयार केली आहे.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)