दिल्लीत लागलेल्या आगीत 17 जणांचा मृत्यू, पण महापौरांना चिंता राजकारणाची

फोटो स्रोत, Sajjad husain
दिल्लीतील बवाना येथील औद्योगिक परिसरातल्या एका इमारतीला शनिवारी आग लागली. या आगीमध्ये 17 जण होरपळून मृत्युमुखी पडले. आता या आगीला जबाबदार कोण यावरून दिल्ली सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे.
दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं सरकार आहे पण महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये सातत्यानं संघर्ष पाहायला मिळतो.
ही आग लागल्यानंतर एक वृत्तसंस्थेनी एक व्हीडिओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ही आग कशी लागली याबद्दल दिल्लीच्या महापौरांना विचारले असता त्या म्हणाल्या याबाबत "आम्ही काही बोलू शकत नाही कारण या कारखान्यांना लायसन्सिग देण्याचं काम आमच्याकडेच आहे." या व्हीडिओची सत्यता अद्याप पडताळून पाहण्यात आलेली नाही.
या इमारतीमध्ये एका मजल्यावर फटाके ठेवण्यात आलेले होते. फटाक्यांना आग लागली आणि झपाट्याने ही आग पसरत दुसऱ्या मजल्याला लागली. दुसऱ्या मजल्यावर रबराचा कारखाना होता. असं अग्निशमन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

फोटो स्रोत, Anurag dhanda/twitter
हा व्हीडिओ समोर आल्यानंतर दिल्ली सरकार आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण सुरू आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं सरकार आहे पण महानगर पालिकेवर भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. त्यामध्ये दोन्ही पक्षांमध्ये सातत्यानं संघर्ष पाहायला मिळतो.

फोटो स्रोत, Sajjad husain
व्हीडिओ समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी एक ट्वीट करून आपली बाजू मांडली आहे. ते म्हणतात "या कारखान्यांना लायसन्स देण्याचं काम आमच्याकडे नाही तर दिल्ली सरकार आणि त्यांच्या औद्योगिक विभागाकडं आहे."
त्यानंतर आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी महापौरांचा कथित व्हीडिओ रिट्वीट केला आणि म्हटलं, "बेकायदा पद्धतीनं लायसन्स दिल्याचा हा घ्या पुरावा."
मनोज तिवारी यांच्या ट्वीटनंतर अनेकांना तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पत्रकार पूनम पांडे लिहितात, "हा राजकारणाचा कुठला चेहरा आहे. हे अत्यंत लज्जास्पद आणि घृणास्पद आहे. आम्ही काही बोलू शकत नाही...पण राजकारणासमोर कुणाच्या जीवाची देखील किंमत गौण ठरत आहे."
"शहरातील इमारतीचा नकाशा पास करण्याचे अधिकार असो दुकान किंवा फॅक्टरी असो सर्व गोष्टींसाठी महानगरपालिकेची परवानगी आवश्यक असते," असं पत्रकार आशुतोष मिश्रा यांनी म्हटलं आहे.
सोशल मीडियावर नदीम राम अली यांनी लिहिलं आहे, "तिवारीजी म्हणतात एएनआयने प्रसिद्ध केलेला व्हीडिओ खोटा आहे. हे तर अतीच झालं."
प्रीतम कोठाडिया म्हणतात, "तिवारी साहेब तुम्ही नेमके कोणत्या प्रकारचे नेते आहात. तुम्ही म्हणता की, हा व्हीडिओ खोटा आहे. खोट्याला खोटं आणि खऱ्याला खरं, म्हणणारं राजकारण हवं. चुका करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. मी केजरीवाल समर्थक नाही पण अशी खोटी घोषणाबाजी करून किमान थट्टेचा विषय तरी बनू नका. प्रदेशाध्यक्ष या नात्याने काही तरी करा."

फोटो स्रोत, Manoj tiwari
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी रात्री रुग्णालयाला भेट दिली आणि पीडितांची विचारपूस केली. दिल्ली सरकारने मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 5 लाखांची आणि जखमींना 1 लाख रुपयाची मदत जाहीर केली आहे.
या फॅक्टरीला लायसन्स कुणी दिलं आणि आगीचं कारण काय होतं याची चौकशी करण्यात यावी असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















