#5मोठ्याबातम्या : शरद पवारांच्या बारामती गडाला भाजपचा सुरुंग

फोटो स्रोत, Getty Images
शरद पवारांचा गड मानला जाणाऱ्या बारामतीमध्ये भाजपने राष्ट्रवादीला नमविलं आहे.
बारामती तालुक्यातल्या सर्वांत मोठ्या माळेगाव बुद्रुक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पक्षाने ताबा मिळवला आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार, सरपंचपदाच्या निवडणुकीत भाजपचे जयदीप विलास तावरे यांनी केवळ एका मताने बाजी मारली.
सरपंचपदाच्या निवडणुकीत 17 सदस्यांपैकी 10 सदस्यांनी भाजपला मतदान केलं. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं याच ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये निवासस्थान आहे. या निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
भाजपचे जयदीप विलास तावरे यांना नऊ तर त्यांचे प्रतिस्पर्धी राजेंद्र चव्हाण यांना आठ मतं मिळाली. सरपंचपदाच्या निवडीमुळे गेली महिनाभर चाललेली राजकीय उलथापालथ आज थांबली.
या मुख्य बातमीशिवाय या आहेत आजच्या 5 मोठ्या बातम्या...
1. 'भिडेंना PMO कडून संरक्षण'
भीमा कोरेगाव प्रकरणात थेट पंतप्रधान कार्यालय हस्तक्षेप करत असल्याचा गंभीर आरोप भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
एबीपी माझाच्या वृत्तानुसार, दिल्लीत एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे आरोप केले. "महाराष्ट्र शासनाचे जे महत्त्वाचे अधिकारी आहेत त्यांच्या ग्रुपमध्ये एक असा मेसेज फिरतो आहे. त्यात म्हटलं आहे की पंतप्रधान कार्यालयातून एक संदेश आला आहे : संभाजी भिडे यांना अटक करू नका."

"मी असं समजतो की, असे मेसेज पाठवणं चुकीचं आहे. कायदा हा सर्वांना समान आहे. ज्यांनी गुन्हा केला असेल त्यांना अटक झाली पाहिजे. संभाजी भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर अजामीनपात्र कलम लावण्यात आल्या आहेत. तेव्हा त्यांना अटक होणं गरजेचं आहे," असं प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.
दरम्यान भीमा कोरेगाव प्रकरणात आणखी एक संशयित आरोपी असलेले समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलींद एकबोटे यांचा अकटपूर्व जामीन अर्ज विशेष न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आला. लोकसत्तानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
2. ''आप'ने सुनावणीची संधी घेतली नाही'
निवडणूक आयोगाला सुनावणी घेण्याची विनंती करण्याच्या दोन संधी 'आप'कडे होत्या. मात्र त्यांनी त्या दोन्ही संधी घेतल्या नाही, असं नवनियुक्त निवडणूक आयुक्त प्रकाश रावत यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, PRAKASH SINGH/GETTY IMAGES
निवडणूक आयुक्तालयानं सुनावणी न घेताच 'आप'च्या 20 आमदारांना निलंबित केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ए. के. ज्योती यांनी गेल्या आठवड्यात 'आप'च्या 20 आमदारांना लाभाचं पद घेतल्याबद्दल निलंबित करण्याचे आदेश दिले होते.
द इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, याबाबत नवीन आयुक्तांना विचारलं असता त्यांनी 'आप'ला दोनदा नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती दिली. "सुनावणी घेण्याविषयी त्यांनी तोंडी सांगितलं असतं तर आम्ही तारखा निश्चित केल्या असत्या," असं रावत म्हणाले.
दरम्यान, 'आप'च्या आमदारांचं ज्या पद्धतीनं निलंबिन झालं, त्याच धर्तीवर छत्तीसगडमध्ये 11 आमदारांचं निलंबन करावं, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे.
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, छत्तीसगडमधल्या विरोधी पक्षानं लाभाचं पद घेणाऱ्या 11 आमदारांचा निलंबित करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे नेते मोहम्म्द अकबर यांनी पत्रकार परिषदेत ही मागणी केली.
3. न्या. लोया मृत्यू प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे
न्यायाधीश बी.एच. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी मुंबई हाय कोर्टात दाखल झालेल्या याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

फोटो स्रोत, CARAVAN MAGAZINE
लोकसत्ताच्या वृत्तानुसार, या याचिकेमधील मुद्दे अतिशय गंभीर आहेत. त्यामुळे संबधित कागदपत्रांकडे गांभीर्याने पाहायला हवं, अशी टिप्पणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाने केली.
त्याच वेळी या प्रकरणाशी निगडित असलेल्या कोणावरही या टप्प्यावर शिंतोडे उडवू नयेत आणि पुराव्यांकडे वस्तुनिष्ठपणे पाहावं, असा सल्लाही खंडपीठाने दिला.
दुसरीकडे, मुंबई उच्च न्यायालय आणि त्याच्या नागपूर खंडपीठात दाखल झालेल्या दोन्ही याचिका सर्वोच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचे आदेशही खंडपीठाने दिला.
4. देशातील 73 टक्के संपत्ती एक टक्क्यांकडे
भारतात गेल्या आर्थिक वर्षांत निर्माण झालेल्या एकूण संपत्तीपैकी 73 टक्के संपत्तीचा ओघ देशातल्या एक टक्का अतिश्रीमंत व्यक्तींकडेच वळाल्याचं एका सर्वेक्षणातून पुढे आलं आहे.
'सकाळ'ने दिलेल्या PTI वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय मानवधिकार गट OXFAMने हे सर्वेक्षण केले आहे. यानुसार भारतातील 67 टक्के अतिगरीब व्यक्तींच्या संपत्तीत एक टक्क्याने वाढ झाली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
हे सर्वेक्षण जगभरातल्या श्रीमंत आणि शक्तिशाली लोकांच्या वार्षिक उत्पन्नाच्या वाढत्या आणि सामान्य लोकांच्या उत्पन्नाच्या घटत्या स्थितीला समोर आणणारं ठरलं आहे.
10 देशांमधल्या 70,000 लोकांची मतं जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. भारतातील 37 टक्के अब्जाधीशांकडे वारसा हक्कानं संपत्ती आल्याचं अहवालातून समोर आलं आहे.
जगभरात गेल्या वर्षभरात तयार झालेल्या एकूण संपत्तीपैकी 82 टक्के वाटा 1 टक्का लोकांकडे गेला आहे.
5. इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक अटकेत
अहमदाबादेत 2008 साली झालेल्या मालिकी बाँबस्फोटाचा संशयित सूत्रधार आणि इंडियन मुजाहिदीनचा सहसंस्थापक अब्दुल कुरेशी याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
द टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 2008 मध्ये झालेल्या अहमदाबाद बाँबस्फोट मालिकेत 59 लोकांना जीव गमवावा लागला होता.
या घटनेतील मुख्य सूत्रधार समजण्यात येणारा अब्दुल कुरेशी (वय 46) हा दिल्लीत आल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलिसांनी गाझीपूर भागात नाकाबंदी केली होती. या कारवाईदरम्यान कुरेशीनं पोलिसांवर गोळीबार केला, पण पोलिसांनी कुरेशीला अटक करण्यात यश मिळवलं.
2006 ते 2011 दरम्यान भारतात विविध ठिकाणी झालेल्या स्फोटांमागे अब्दुल कुरेशीचा हात असल्याचं तपासात उघड झालं होतं. संगणक अभियंता असलेल्या अब्दुल यानं नोकरी सोडून सिमी सदस्यांच्या संपर्कात आला.
अहमादाबादच्या घटनेनंतर तो नेपाळला पळाला होता. NIAनं त्याला पकडून देण्यासाठी चार लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं. नेपाळनंतर तो सौदी अरेबियाला गेल्याचंही समोर आलं आहे.
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















