#5मोठ्याबातम्या : 'संजयचं युद्ध वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा'

बिप्लब देब

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

पाहूयात विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवरील आजच्या पाच ठळक बातम्या.

1. संजयनं केलेलं युद्धाचं वर्णन हाच इंटरनेटचा पुरावा - बिप्लब देब

50 किलोमीटर दूरवरील युद्धक्षेत्राचं वर्णन जर एखादी व्यक्ती करू शकत असेल तर त्यावेळी काहीतरी तंत्रज्ञान उपलब्ध होतं, हे सिद्ध होतं. सर्वसाधारण डोळ्यांनी ते शक्य नाही. संजय या नावाने हे तंत्रज्ञान होतं. जे की आजचं इंटरनेट आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री देब बिप्लब यांनी त्यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला.

द हिंदूला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी महाभारत, रामायण आणि उपनिषदं हे प्रयोगसिद्ध लिखाण असल्याचं म्हटलं. महाभारत काळात इंटरनेट होतं, या त्यांच्या वक्तव्यावर ते ठाम राहीले.

जर काही मित्र पुराव्याविषयी प्रश्न उपस्थित करत असतील तर आजच्या इंटरनेट तंत्रज्ञानात तो पुरावा दडला आहे, असं मी म्हणेन, असं त्यांनी स्पष्ट केलं.

ज्यांचा रामावर विश्वास नाही ते भगवान रामाच्या असण्याविषयीही प्रश्न उपस्थित करतील. पण त्याकाळातील शरयू नदी अद्यापही आहेच ना? हाच पुरावा आहे.

2. सुरत बलात्कार प्रकरण : पीडित आणि आईला 35000मध्ये विकले

सुरत बलात्कार प्रकरणातील मृत मुलगी आणि तिची आई यांना राजस्थानमधील गंगापूर इथून 35000 रुपयांमध्ये आरोपींनी विकत घेतलं होतं.

द टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, अहमदाबाद पोलिसांनी या प्रकरणातील धागेदोरे शोधल्याचा दावा केला आहे. राजस्थानमधून मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे.

बलात्कार

गंगापूर इथून हरसायी गुर्जर (35) यासा लवाई माधवपूर जिल्ह्यातील गंगापूर इथून अटक करण्यात आली असून त्याच्या दोन भावांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

प्राथमिक माहितीनुसार, अकरा वर्षीय मुलीला आणि तीच्या विधवा आईला 35000 रुपयांमध्ये मजूर म्हणून गुजरातमध्ये आणण्यात आलं होतं.

सुरत इथं आणण्यात आल्यावर आई आणि मुलीवर सातत्यानं अत्याचार करण्यात आल्याचंही उघडकीस आलं आहे.

3. इंजिनिअरिंगच्या 1.36 लाख जागा कमी करा

गेल्यावर्षीच्या प्रवेशादरम्यान रिक्त राहिलेल्या जागांचा अनुभव बघता यावर्षीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांनी तब्बल 1.36 लाख जागा कमी करण्याची विनंती ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशनकडे (AICTE) केली आहे.

इंजिनिअरिंग

फोटो स्रोत, NOAH SEELAM

द इंडियन एक्सप्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, 24,000 प्रवेश क्षमता असलेल्या एकूण 83 महाविद्यालयांनी AICTEकडे महाविद्यालय बंद करण्याचा अर्ज दिला आहे. 494 महाविद्यालयांनी पदवी आणि पदव्यूत्तरचे काही अभ्यासक्रम बंद करत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे एकूण 42000 जागा कमी होतील. तसंच, 639 महाविद्यालयांनी त्यांच्याकडील 62000 जागा कमी करण्याचीही विनंती केली आहे.

4. महिला पत्रकारांविषयी भाजप नेत्याची वादग्रस्त पोस्ट

तामिळनाडूतील भाजप नेता एस व्ही शेखर यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर महिला पत्रकारांविषयी अवमानकारक कमेंट पोस्ट केली आहे. 'मोठ्या लोकांसोबत अनैतिक संबंध ठेवल्याशिवाय कोणीतीही महिला न्यूज अँकर किंवा पत्रकार होऊ शकत नाही,' असं या पोस्ट म्हटलं आहे.

भाजपा समर्थक

फोटो स्रोत, Reuters

एबीपी माझाच्या वृत्तात इंडियन एक्सप्रेसच्या वृत्ताचा हवाला देण्यात आला आहे. "ज्या सीनिअर महिलेचे गाल राज्यपालांनी थोपटले ती महिला राज्यपालांवर चुकीचे आरोप करत आहे. भाजप सरकारला बदनाम करणं या हेतूनंच तिनं हे आरोप केले आहेत," असं शेखर यांनी लिहिलं आहे.

5. बालिकांवरील बलात्कारप्रकरणात फाशीचा प्रस्ताव

केंद्र सरकारनं 12 वर्षांखालील मुलींवरील बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉक्सो कायद्यात बदल करणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं आहे.

बलात्कार

फोटो स्रोत, Reuters

लोकमतच्या वृत्तानुसार, देशात अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉक्सो कायद्यात बदल करण्याचं ठरवलं आहे

अल्पवयीन मुलींवरील बलात्कारासंदर्भातील याचिका सुनावणीला आली असता, केंद्र सरकारनं कायद्यात बदल करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)