पोटनिवडणूक मतमोजणी आज : बीबीसी मराठीचा गुरुवारचा राउंड-अप
1. आज पोटनिवडणुकांची मतमोजणी

फोटो स्रोत, Getty Images
सोमवारी पार पडलेल्या पालघर आणि भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकांची मतमोजणी आज होणार आहे. काही मतदान यंत्रांमध्ये बिघाड झाल्याने अनेक ठिकाणी बुधवारी फेरमतदान घेण्यात आलं.
पालघर तसंच भंडारा-गोंदिया मतदारसंघात जवळपास 25 टक्के EVM आणि VVPAT यंत्रामध्ये बिघाड झाल्याने शेकडो मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता. पालघरमध्ये तब्बल 276 मतदानयंत्र बंद पडली तर भंडारा-गोंदियामध्ये 75 बूथवरील मतदानयंत्र काम करीत नसल्याच्या 141 तक्रारी आल्या.
उन्हामुळे आणि तापमानामुळे ही मतदानयंत्रं खराब होतात, असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आलं होतं.
पण उष्णतेमुळे मतदान यंत्रात बिघाड झाल्याचं सांगणारे गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या बदलीचे आदेश देण्यात आले आहेत. काळे हे या पोटनिवडणुकीचे रिटर्निंग ऑफिसरही होते.
खरंच मतदान यंत्र उन्हामुळे खराब होतात का? जाणून घ्या इथे
2. संभाजी भिडेंच्या 'त्या' वक्तव्याला किती महत्त्व द्यायचं?

फोटो स्रोत, Raju Sanadi
"राष्ट्रीयतेच्या कसोटीवरती हिंदू स्त्री आणि पुरुष हे नपुंसक आणि वांझ आहेत. त्यांच्या पेशीत राष्ट्रीयत्वाच्या पेशी नसतात. मी विचित्र बोलतोय, असं तुम्ही कधी ऐकलं नसेल, पण या बाबतीत हिंदू स्त्री-पुरूष हे अनुत्तीर्ण आहेत." जळगावमध्ये एका कार्यक्रमात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे वादग्रस्त नेते संभाजी भिडे यांनी हे विधान केलं.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात 80 वर्षांच्या संभाजी भिडेंविरोधात 2 जानेवारीला पिंपरीत गुन्हा दाखल झाला. त्यांच्यासोबत हिंदू एकता आघाडीच्या मिलिंद एकबोटेंच्याही विरोधात गुन्हा दाखल झाला होता. एकबोटेंना अटक झाली, पण भिडेंना अटक का झाली नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला असतानाच भिडेंचं हे वादग्रस्त विधान पुढे आलं आहे.
एका हिंदुत्ववादी संघटनेचा नेता जेव्हा हिंदूंसाठी एवढी कठोर भाषा वापरतो, तेव्हा तो हिंदूंना पेटवण्याचा प्रयत्न आहे का? त्यांच्या या विधानाला किती महत्त्व द्यावं? वाचा सविस्तर रिपोर्ट इथे
3. हिरो गगनदीप सिंग गायब?

फोटो स्रोत, FACEBOOK/GAGANDEEP SINGH
नैनितालमधल्या रामनगरच्या तुजिया मंदिराबाहेर आक्रमक हिंदू तरुणांच्या जमावापासून एका मुस्लीम युवकाला वाचवणारे पोलीस उपनिरीक्षक गगनदीप सिंह यांना आपण रातोरात चर्चेत येऊ असं वाटलं नव्हतं. तेही नोकरीला लागून केवळ सहा महिनेच झालेले असताना.
गगनदीप यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं. परंतु हिंदू, मुस्लीम, कथित लव्ह जिहाद आणि त्यांचं शीख असणं हे सगळं एकत्र आलं आणि 27 वर्षीय तरुण उपनिरीक्षकाच्या जीवनात वादळ आलं.
हे वादळ सोशल मीडियामध्ये जोरदार घोंगावलं आणि हा पोलीस अधिकारी हिरो झाला. आता मात्र त्यांना माध्यमांसमोर येणं अडचणीचं वाटत आहे.
बीबीसीची एक टीम त्यांची भेट घेण्यासाठी नैनितालला गेली असता, "गगनदीप सिंगचा ठावठिकाणा लागत नाहीये. तो त्याच्या खोलीत नाही आणि पोलीस स्टेशनमध्येही नाही. आम्ही त्याचा शोध घेत आहोत," असं उत्तर मिळालं. कुठे गेले गगनदीप सिंग?
4. ...अन् मेलेला पत्रकार परतला
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
रशियाचे पत्रकार आर्काडी बाबचेंको यांच्या हत्येची बातमी ही खोटी ठरल्याचं समोर आलं आहे. एका योजनेअंतर्गत आर्काडी यांच्या हत्येची बातमी जाणूनबुजून पसरविल्याचं युक्रेनचं म्हणणं आहे.
41 वर्षीय आर्काडी यांची युक्रेनची राजधानी कीव्हमध्ये गोळी घालून हत्या करण्यात आली आहे, अशी बातमी मंगळवारी समोर आली होती. याच बातमीनुसार, गोळीचा आवाज ऐकून आर्काडी यांची पत्नी बाहेर आली आणि तिने त्यांना रक्तबंबाळ अवस्थेत पाहिलं. आर्काडी यांच्या पाठीत गोळी लागलेली आहे आणि हॉस्पिटलमध्ये नेताना त्यांचा मृत्यू झालाय, असं त्यांच्या पत्नींने सांगितलं होतं.
त्यानंतर युक्रेननं या हत्येमागे रशियाचा हात असल्याचं सांगितलं होतं. त्यांना "या प्रकरणात एक प्रकारचा रशियन पॅटर्न दिसत होता."
पण बुधवारी आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत आर्काडी सर्वांसमोर आले. एका रशियन एजंटचा कट उधळून लावण्यासाठी आर्काडी यांच्या हत्येची बातमी आम्हाला पसरावी लागली, असं आता युक्रेन म्हणत आहे. वाचा सविस्तर बातमी बीबीसी वर्ल्डवर
5. सीरियाच्या लोकांना मायदेशी परतण्याची हूरहूर
एकेकाळी सीरियाचे नागरिक आपल्या मायदेशातल्या संघर्षातून जीव वाचवून युरोपात शिरण्याचा प्रयत्न करत होते. 2017 साली या स्थलांतरितांचं काय करावं, असा मोठा प्रश्न युरोपियन देशांसमोर उभा ठाकला होता.
पण आता सीरियाच्या बऱ्याच भागातील तणाव कमी झाल्याची चिन्हं दिसू लागल्यानं ही मंडळी स्वगृही परतण्याच्या तयारीत आहेत. आणि त्यासाठी युरोपच्या सीमेवर त्यांची गर्दी झाली आहे.
पण परत जाणंही सोपं नाही. पाहा हा व्हीडिओ
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




















