#5 मोठ्या बातम्या: गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे पुण्यात

फोटो स्रोत, facebook
पाहूया आज विविधं वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.
1. गौरी लंकेश हत्याप्रकरण: चिंचवडमधून संशयित ताब्यात
बंगळुरूतील लंकेश पत्रिका या साप्ताहिकाच्या संपादक गौरी लंकेश यांच्या हत्येचे धागेदोरे पिंपरी-चिंचवडपर्यंत असल्याचं स्पष्ट झालं आहे. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
लंकेश हत्याप्रकरणाच्या तपासासाठी नेमण्यात आलेल्या कर्नाटक पोलिसांच्या विशेष पथकाने चिंचवड येथील माणिक कॉलनी भागातून अमोल काळे या संशयिताला ताब्यात घेतलं आहे. आठवड्यापूर्वी कर्नाटक पोलिसांनी काळे याच्या घराची झडती घेतली होती. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
काळे मूळचे आंबेगाव तालुक्यातील घोडेगावचे रहिवासी आहेत. माणिक कॉलनी, चिंचवड येथील अक्षय प्लाझाच्या बी विंगमध्ये काळे कुटुंबीयांसमवेत गेल्या दहा वर्षांपासून राहतात. त्यांचे कुटुंब एका हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याचं बोललं जात आहे. काळे कुटुंबीय गेल्या महिनाभरापासून तणावात असल्याचं आजूबाजूच्या रहिवाशांनी सांगितलं.
2. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा बंगला बेकायदा
सोलापूरात होटगी रस्त्यावर आरक्षित भूखंडावर केलेलं आलिशान बंगल्याचं बांधकाम बेकायदा असल्याची माहिती समोर आल्याने सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत आले आहेत. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. त्यांचा बंगला बेकायदा असल्याचा अहवाल सोलापूर महापालिकेच्या आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयाला सादर केला. यामुळे देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.
देशमुख यांनी होटगी रस्त्यावर काही वर्षांपूर्वी 22 हजार 243 चौरस फूट क्षेत्रफळावर दिमाखदार बंगला बांधला. बंगल्यासाठी वापरलेला भूखंड महापालिकेच्या अग्निशमन दल आणि व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे. देशमुख यांनी आरक्षित असलेला हा भूखंड 18 वर्षांपूर्वी खरेदी केला होता. 2001 साली या आरक्षित जागेवर निवास बांधकामसाठीचा परवाना महापालिका प्रशासनाने नाकारला.
3. जे बोलायचं ते नागपूरातच-प्रणब मुखर्जी
जे बोलायचं आहे ते नागपूरात बोलेन अशा शब्दांत माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने निर्माण झालेल्या उलटसुलट चर्चेसंदर्भात म्हटलं आहे. 'एबीपी माझा'ने याबाबत बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला मुखर्जी उपस्थित राहणार असल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. या कार्यक्रमाचं निमंत्रण स्वीकारल्यानंतर मला अनेक फोन तसंच पत्र आली मात्र मी कुणालाही उत्तर दिलं नाही, असं मुखर्जी यांनी स्पष्ट केलं. काँग्रेसचे नेते जयराम रमेश, सी.के. जाफर शरीफ, रमेश चेन्निथ यांनी प्रणब मुखर्जी यांना कार्यक्रमाला न जाण्याचा सल्ला दिला होता.
नागपूरात RSSच्या तृतीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला मुखर्जी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या वर्गात 800 तरूण स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षण वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर 7 जून रोजी सायंकाळी साहेसहा वाजता होणार आहे.
4. मुंबईत पावसाचे तीन बळी
वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या पूर्वमोसमी पावसाने मुंबई आणि ठाण्याला झोडपलं. भांडुपमध्ये साचलेल्या पाण्यात वीजप्रवाह पसरून दोन लहान मुलांसह तिघांना प्राण गमवावे लागले. या दुर्घटनेत तीनजण जखमी झाले. मालवणी येथे दोन लहान मुलं नाल्यात पडली. यातील एकाला वाचवण्यात यश आलं. दुसऱ्या मुलाचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. 'महाराष्ट्र टाइम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पावसाच्या तडाख्याने मध्य आणि पश्चिम रेल्वे सेवा खंडित झाली. जोरदार वारा आणि पावसामुळे 40 विमानांचं उड्डाण लांबलं. दरम्यान पुढील तीन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वळवाच्या मुसळधार सरी कोसळण्याचा अंदाज आहे. नैऋत्य मोसमी पावसाने देशाच्या ईशान्य भागाला व्यापले असून सहा जूननंतर तो राज्यात सक्रिय होऊन सर्व भागात त्याचा जोर वाढेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
5. सट्टा लावल्याची अभिनेता अरबाज खानची कबुली
IPL अर्थात इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेवर सट्टा लावल्याची कबुली अभिनेता अरबाज खानने दिली आहे. याप्रकरणी 2.83 कोटी रुपये गमावल्याचंही त्याने सांगितलं. याप्रकरणी ठाणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने बुकी सोनू जालानसह पाच जणांना अटक केली. त्याच्या चौकशीत अरबाजचं नाव पुढे आलं. 'हिंदुस्तान टाइम्स'नं यासंदर्भात बातमी दिली आहे.
अरबाज शनिवारी पोलिसांसमोर चौकशीसाठी आला. या प्रकरणी पराग संघवी आणि मुराद खेतानी या चित्रपट निर्मात्यांची नावंही पुढे आली आहेत. गेली अनेक वर्ष बेटिंग करत असल्याचं अरबाजनं सांगितलं, अशी माहिती पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी दिली.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















