#5मोठ्याबातम्या - 'ओबीसींना बरोबर घेऊन मराठा आरक्षणासाठी लढू' : छगन भुजबळ

राष्ट्रवादीच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ

फोटो स्रोत, Twitter / NCPSpeaks

फोटो कॅप्शन, राष्ट्रवादीच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्वाच्या बातम्या.

1. 'ओबीसींना बरोबर घेऊन मराठा मराठा आरक्षणासाठी लढू'

"मी मंडल आयोगासाठीच (आरक्षणासाठी) शिवसेना सोडली. मी कशाला मराठा आरक्षणाला विरोध करू," असा सवाल करत छगन भूजबळ यांनी मराठा आरक्षणाला आपला पूर्ण पांठिबा दिला आहे. लोकसत्ताने हे वृत्त दिलं आहे.

आपण ओबीसींना बरोबर घेऊन मराठा आरक्षणाची लढाई लढू, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला, तसंच आपण राष्ट्रवादी सोडून कुठेही जाणार नसल्याचंही या कार्यक्रमात स्पष्ट केलं.

राष्ट्रवादीच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष आणि माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी देशातले सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आल्यास भाजपचा पराभव शक्य असल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझाच्या वृत्तानुसार या तिसऱ्या आघाडीत त्यांनी शिवसेनालाही अप्रत्यक्षपणे निमंत्रित केलं आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांना आलेल्या कथित धमक्या या केवळ सहानुभूतीसाठी पेरलेल्या बातम्या असल्याचा संशयही पवारांनी व्यक्त केला आहे.

शरद पवार यांचं वक्तव्य हे दुर्दैवी असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पवार यांनी "देशाचं राजकारण करावं, द्वेषाचं नाही", असं आवाहनही केलं.

2. UPSC शिवायही सनदी अधिकारी होता येणार

केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC) सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या पद्धतीला छेद देत आता थेट भरतीने सहसचिव नियुक्त केले जाणार असल्याचं वृत्त लोकमतने दिलं आहे.

केंद्रातील 10 महत्त्वाच्या खात्यांमध्ये सहसचिवांच्या नेमणुका 'लॅटरल एन्ट्री' पद्धतीनं थेट करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

लोकसेवा आयोगाचा कार्यालय

फोटो स्रोत, PTI

फोटो कॅप्शन, लोकसेवा आयोगाचा कार्यालय

संबधित विषयातील ज्ञान आणि अनुभव हा एकमेव निकष डोळ्यांपुढे ठेवत ही पदं खासगी उद्योगांतील व्यक्तींसाठीही खुली केली आहेत.

या जागांसाठी 15 जून ते 30 जुलै या काळात फक्त ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येतील. महसूल, वित्तीय सेवा, आर्थिक बाबी, कृषी, रस्ते वाहतूक, पर्यावरणसह दहा खात्यांमधील ही पदं आहेत.

3. चीनच्या योजनेला फक्त भारताचाच विरोध

दोन दिवस चाललेल्या शांघाय सहकार्य शिखर परिषदेत (SCO) भारताने चीनच्या 'बेल्ट अ‍ॅण्ड रोड' या महत्त्वाकांक्षी योजनेस विरोध दर्शवल्याचं वृत्त द इंडियन एक्सप्रेसनं दिलं आहे.

शी जीनपिंग आणि नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, Getty Images

या योजनेस सुरुवातीपासूनच भारताने सुरक्षेच्या दृष्टीने विरोध केला आहे. SCO परिषदेतनंतर जाहीर करण्यात आलेल्या 17 पानी निवेदनात चीनच्या 'बेल्ट अ‍ॅण्ड रोड' योजनेस भारत वगळून इतर देशांनी पाठिंबा दिल्याचं कळतं.

याच योजनेचा एक भाग असलेल्या 'चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर'चा (CPEC) महामार्ग पाकव्याप्त काश्मीरमधील वादग्रस्त गिलगिट-बालतीस्तानमधून जात असल्यानं राष्ट्रीय सार्वभौमत्वाच्या मुद्द्यावर भारताने आपला विरोध कायम ठेवला.

4. नीती आयोगातूनही स्मृती इराणींना हटवलं

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची नीती आयोगाच्या निमंत्रित सदस्य पदावरून गच्छंती झाली असल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

मोदी

फोटो स्रोत, AFP

स्मृती इराणी यांच्या जागी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर विशेष निमंत्रित सदस्य असतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार नीती आयोगाच्या सदस्य मंडळाची पुनर्रचा करण्यात आली आहे.

गेल्या महिन्यात स्मृती इराणी यांच्याकडील माहिती आणि प्रसारण खातंही काढून घेण्यात आलं होतं. त्यामुळे आता त्यांच्याकडे फक्त वस्त्रोद्योग मंत्रालयाचा पदभार आहे.

5. सुनील छेत्रीची मेस्सीशी बरोबरी

भारतीय फुटबॉल टीमचा कॅप्टन सुनील छेत्री याने रविवारी इंटरकाँटिनेंटल कपच्या अंतिम सामन्यात केनियाविरुद्ध दोन गोल करत अर्जेंटिनाचा दिग्गज खेळाडू लियोनल मेस्सीशी बरोबरी केली आहे.

सुनील छेत्री

फोटो स्रोत, FACEBOOK/SUNIL CHHETRI-BBC

फोटो कॅप्शन, सुनील छेत्री

बीबीसी हिंदीच्या वृत्तानुसार, छेत्री आणि मेस्सी हे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सक्रीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक गोल नोंदवणाऱ्या खेळांडूच्या यादीत संयुक्त रूपाने दुसऱ्या स्थानावर आहेत. दोघांच्या नावावर प्रत्येकी 64 गोल आहेत.

पोर्तुगालचा प्रसिद्ध खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो याच्या नावावर सर्वाधिक 81 गोल आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)