#5मोठ्याबातम्या : वाजपेयींना युरिन इन्फेक्शन, तज्ज्ञांकडून उपचार सुरू

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या पाच मोठ्या बातम्या खालीलप्रमाणे:
1. अटलबिहारी वाजपेयी रुग्णालयात
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल संध्याकाळी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भेट घेण्यासाठी AIIMS मध्ये धाव घेतली. नियमित तपासणीसाठी वाजपेयी यांना काल दुपारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.
वाजपेयी यांना युरिन इन्फेक्शन झालं असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. तसंच तज्ज्ञ डॉक्टरांची टीम त्यांच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे असं AIIMS ने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये सांगितलं आहे.
दरम्यान वाजपेयी यांना भेटायला डॉक्टरांनी मनाई केली असल्याचं वृत्त काल दुपारी प्रसिद्ध झालं होतं. त्यामुळे पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांना वाजपेयी यांची प्रत्यक्ष भेट घेता आली की नाही, हे अजून स्पष्ट झालेलं नाही.
भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनीही संध्याकाळी AIIMS ला भेट दिली. वाजपेयी यांचे दीर्घकाळचे सहकारी आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांनी देखील AIIMS ला भेट दिली.
2. खासगी शिकवण्यांवर अंकूश
दहावी, बारावी, तसंच विविध स्पर्धा परीक्षांच्या निकालानंतर यशस्वी विद्यार्थ्यांना आपणच मार्गदर्शन केल्याच्या शिकवणी चालकांच्या दाव्यांना आता चाप बसणार असल्याचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.
खासगी शिकवण्यांचे नियमन करण्यासाठी शासनानं केलेल्या प्रस्तावित मसुद्यात शिकवण्यांच्या जाहिरातीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.
त्यामुळे खासगी शिकवण्यावर अंकूश बसणार आहे. शिकवणीमध्ये शिकवणाऱ्या व्यक्तींना शिक्षक म्हणता येणार नाही, त्यांना मार्गदर्शक म्हणावं लागेल. तसंच शिकवणीच्या प्रत्येक शाखेसाठी स्वतंत्र नोंदणी करावी लागेल अशा अनेक तरतुदी या कायद्याच्या मसुद्यात आहेत.
3. आंबा खाल्ल्यानंतर अपत्यप्राप्ती होते - संभाजी भिडे
"माझ्या शेतातील आंबा खाल्ला तर जोडप्यांना अपत्यप्राप्ती होते," असा दावा श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी केल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे. नाशिकमध्ये झालेल्या एका सभेत त्यांनी हे विधान केलं.

फोटो स्रोत, Raju Sanadi
भिडेंनी सभेत शिवकालीन इतिहासाचे दाखले देत सध्याच्या सामाजिक, राजकीय व्यवस्थेवर टीका केली, पण आपल्या शेतातल्या आंब्याचे दाखलेही दिले. हे आंबे खाल्ल्याने जवळपास 150 जोडप्यांना अपत्यप्राप्ती झाल्याचा दावा त्यांनी केला.
4. प्रसूती योजनेमुळे 23.6 लोकांना फायदा
द हिंदू नं दिलेल्या बातमीनुसार 'प्रधानमंत्री मातृ वंदना योजने'मुळे 23.6 लाख लोकांना फायदा झाला आहे. आधी ही योजना मंद गतीनं सुरू झाली होती. पण आता या योजनेचा लाभ 23.6 लाख लोकांना झाला आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं मे 2017 मध्ये या योजनेला मंजूरी दिली होती. जानेवारी 2018 पर्यंत या योजनेअंतर्गत 90,000 स्त्रियांना फायदा झाला होता.

फोटो स्रोत, Getty Images
हा आकडा मूळ उद्दिष्टाच्या फक्त 2 टक्के होता. पहिल्या मुलाच्या जन्माच्या वेळी आईला 6000 रोख रक्कम देण्याची मुख्य तरतूद या योजनेत आहे. बालमृत्यू दर रोखण्याच्या दृष्टीनं ही योजना अत्यंत महत्त्वाची आहे.
5. पीडितांची नुकसानभरपाई परत घेता येणार
अॅसिड हल्ला, बलात्कार या प्रकरणातील पीडितांसाठी महाराष्ट्र सरकारची मनोधैर्य योजना आहे. मात्र चौकशीदरम्यान एखादी बाब खोटी निघाली तर या योजनेअंतर्गत मिळणारी नुकसानभरपाई परत घेण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची बातमी इंडियन दिली आहे.
जर न्यायालयासमोर पीडित मुद्दाम फितूर झाले तरी त्यांना दिलेली भरपाई परत घेतली जाणार आहे. डिसेंबर 2017 पासून या योजनेत सतत बदल झाले आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पीडितांनी जी कागदपत्रं द्यायची असतात त्यांची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. ही नुकसानभरपाई परत देऊ असं घोषणापत्रसुदधा आता पीडितांना द्यावं लागणार आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















