#5मोठ्याबातम्या : विहिरीत पोहल्यामुळे दलित मुलांची नग्न धिंड

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजच्या विविध दैनिकांतील आणि वेबसाइट्सवरील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे.

1. विहिरीत पोहल्यानं दलित मुलांची नग्न धिंड

विहिरीत पोहले म्हणून 3 अल्पवयीन दलित मुलांना अमानुषपणे मारहाण करत त्यांची विवस्त्र धिंड काढल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्र टाईम्सनं ही बातमी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या वाकडी गावात ही घटना घडली आहे. रविवारी घडलेल्या या अत्याचाराचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

गावातील सचिन चांदणे आणि राहुल चांदणे दोघे चुलत भाऊ ईश्वर जोशी यांच्या मालकीच्या विहिरीत पोहण्यासाठी गेले होते. आपल्या विहीरीत पोहल्याचा राग आल्यानं ईश्वर जोशी आणि प्रल्हाद यांनी या दोघा चुलत भावांना नग्न करून पट्टयानं मारहाण केली. त्यानंतर त्यांची विवस्त्र धिंड काढली.

दरम्यान, अत्याचार करणाऱ्यांवर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2. अपहरण केलेल्या जवानाची हत्या

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामानमधून कट्टरवाद्यांनी अपहरण केलेल्या जवानाची हत्या केल्याचं समोर आले आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

औरंगजेब असं या जवानाचं नाव आहे. पुलवामातल्या गुसो परिसरात गुरुवारी त्याचा मृतहेद आढळून आला आहे.

औरंगजेब पुंछ जिल्ह्यातला रहिवाशी होता. काही दिवसांपूर्वी त्यााचं अपहरण झालं होतं.

जवान

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रतिनिधीक फोटो

माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार, हिजबुल्ला कमांडर समीर टायगरला मारण्यात आलेल्या कमांडो पथकाचा औरंगजेब सदस्य होता. तो 44 राष्ट्रीय रायफल्स बटालियनमध्ये रायफलमॅन म्हणून शोपियन जिल्ह्यात तैनात होता.

ईदच्या सुट्टीसाठी तो घरी जात असताना कट्टरवाद्यांनी अपहरण करून त्याची हत्या केली. औरंगजेब दहशतवादी विरोधी पथकाचा देखील सदस्यही होता.

3. एसटी भाडेवाढ आजपासून

सर्व प्रकारच्या एसटीच्या तिकीट दरात 18 टक्के दरवाढीच्या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी होत आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली आहे.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

दरवाढीच्या योग्य अंमलबजावणीसाठी 15 ते 18 जून या कालावधीत एसटीच्या अधिकाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

डिझेलचे वाढते दर तसंच एसटी कामगारांची करण्यात आलेली वेतनवाढ यामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचं एसटी महामंडळानं म्हटलं आहे.

तिकीट दरवाढीबरोबरच यापुढे तिकीटाची भाडे आकारणी ही पाच रुपयांच्या पटीनं करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

4. भारतात आतापर्यंतचं सर्वांत मोठं पाणी संकट - नीती आयोग

भारताच्या इतिहासात आतापर्यंतचं सर्वांत मोठं पाणी संकट निर्माण झालं असल्याचं नीती आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

पाणी संकट

फोटो स्रोत, PRASHANT KAMBLE

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

नीती आयोगानं Composite Water Management Indexचा अहवाल गुरुवारी जाहीर केला.

सध्या जेवढं काही पाणी उपलब्ध आहे त्यापेक्षा दुप्पट पाण्याची गरज 2030 पर्यंत भासेल, असं या अहवालात स्पष्ट करण्यात आलं आहे.

या अहवालात पाणी नियोजनाच्या बाबतीत गुजरात प्रथम क्रमांकावर असून झारखंड शेवटच्या स्थानावर आहे. गुजरातपाठोपाठ मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.

जलसंधारण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या 175 पानांचा हा अहवाल प्रकाशित करण्यात आला. झारखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांची पाणी नियोजनाच्या बाबतीत निकृष्ट कामगिरी केल्याचं अहवालातून समोर आलं आहे.

5. उपचारानंतर मनोहर पर्रिकर भारतात परतले

तीन महिन्यांच्या उपचारानंतर गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गुरुवारी दुपारी 2 वाजता मुंबई विमानतळावर उतरले. मुंबईत काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर ते गोव्याकडे रवाना झाले. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.

मनोहर पर्रीकर

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मनोहर पर्रिकर

स्वादुपिंडाच्या गंभीर आजारामुळे पर्रिकर 8 मार्चपासून न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत होते.

अमेरिकेत जाण्यापूर्वी गोव्यात कामकाज पाहण्यासाठी त्यांनी सुदिन ढवळीकर, विजय सरदेसाई आणि फ्रान्सिस डिसुझा या तीन मंत्र्यांची समिती स्थापन केली होती.

दरम्यान आज पर्रिकरांनी मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)