#5मोठ्याबातम्या : 'धार्मिक जहालवादी संघटना' असं म्हटल्याने विश्व हिंदू परिषद CIAवर नाराज

फोटो स्रोत, Getty Images
पाहूयात आजच्या विविध वृत्तपत्रांतील आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.
1. विहिंप, बजरंग दल यांचा जहालवादी संघटना म्हणून उल्लेख
अमेरिकेच्या केंद्रीय गुप्तचर संस्थेने (CIA) भारतातील विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दल या संघटना धार्मिक जहालवादी संघटना असल्याचा उल्लेख केल्याचं वृत्त सकाळने दिलं आहे.
CIAतर्फे दरवर्षी वर्ल्ड फॅक्टबुक प्रसिद्ध केले जाते. यात राजकीय दबाव टाकणाऱ्या संघटना आणि नेते या शीर्षकाखाली विहिंप आणि बजरंग दलाशिवाय अन्य संघटनांचाही उल्लेख केला आहे.
यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही नाव आहे. संघ ही राष्ट्रवादी संघटना असल्याचे निरीक्षण यामध्ये नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान CIAच्या या दाव्यावर विहिंप आणि बजरंग दलाने आक्षेप घेतला आहे. CIAने चुकीची दुरुस्ती करून त्वरीत माफी मागावी, अशी मागणी या संघटनांनी केली आहे.
2. पानसरे, कलबुर्गी, लंकेश यांची हत्या एकाच शस्त्राने
अॅड. गोविंद पानसरे, प्रा. एम.एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या करण्यासाठी एकाच शस्त्राचा वापर करण्यात आला असल्याचं वृत्त एबीपी माझानं दिलं आहे.

फोटो स्रोत, facebook
गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुराम वाघमारे याने दिल्याची माहिती विशेष तपास पथकाने वृत्तसंस्थेला दिली, असं या वृत्तात म्हटलं आहे.
वाघमारे यानेच गौरी लंकेश यांना गोळी मारली. तसेच याच शस्त्राने गोविंद पानसरे आणि एम. एम. कलबुर्गी यांचीही हत्या करण्यात आली.
महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये उजव्या विचारसरणीसाठी काम करणारा एक गट कार्यरत आहे. या गटानेच लंकेश, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्या केल्या आहेत, असंही या वृत्तात म्हटलं आहे.
या गटात किमान 60 जण कार्यरत आहेत, अशी माहिती एसआयटीच्या अधिकाऱ्याने दिल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.
3. निर्लेपची मालकी बजाजकडे
नॉनस्टिक तवे आणि भांड्यांसाठी प्रसिद्ध असलेली निर्लेप कंपनी बजाज इलेक्ट्रिकल्सने 80 कोटी रुपयांना खरेदी केली आहे.

फोटो स्रोत, Facebook/Nirlep
लोकसत्तानं दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, नोटाबंदी आणि GSTमुळे व्यवसाय चालवणे अधिकच अवघड बनले होते, अशी माहिती निर्लेप संचालक राम भोगले यांनी दिली.
निर्लेप कंपनीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. शंभर कोटींची उलाढाल असलेली ही कंपनी भारतीय उद्योग समुहालाच विक्री करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला होता.
बजाज इलेक्ट्रिकल्सने 80 कोटींमध्ये ही कंपनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून येत्या सहा महिन्यांत हा व्यवहार पूर्ण होणार आहे.
4. भय्यू महाराजांच्या संपत्तीची वाटणी
भय्यू महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीची वाटणी आपापसात समझोत्याने झाली असल्याचं वृत्त लोकमतने दिले आहे.

फोटो स्रोत, Facebook/BhaiyyuMaharaj
या वृत्तानुसार, भय्यू महाराज यांची मुलगी कुहू हिला या संपत्तीत 70 टक्के तर पत्नी आयुषी यांना 30 टक्के वाटा दिला जाईल.
गुरुवारी भय्यू महाराज यांच्या निवासस्थानी हा समझोता झाला. तेव्हा दोन्ही कुटुंबांतील लोक उपस्थित होते.
पोलीस कुहू आणि सेवक विनायक यांच्या जबाबाची वाट पाहात आहेत. कुहूची मनस्थिती बरी नसल्याने पोलीस तिचे जबाब नोंदवून घेऊ शकले नसल्याचं वृत्तात म्हटलं आहे.
5. 'पाट्या मराठीत नसतील तर काळं फासा'
मुंबईतील दुकानांच्या पाट्या मराठीत नसतील तर त्या दुकानांना काळं फासा, असा आदेश शिवसेनेच्या नगरसेवकांना देण्यात आला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, गुरुवारी रात्री झालेल्या शिवसेना नगरसेवकांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे आदेश दिले.
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील प्रचारासंदर्भात शिवसेना भवन इथं बैठक झाली.
या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी दुकानांच्या पाट्या या मराठीत असल्या पाहिजे जर त्या नसतील तर या पाट्यांना काळं फासा असा आदेश दिला, असं या वृत्तात म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















