#5मोठ्याबातम्या : 'पाकिस्तानने भारताच्या उच्चायुक्तांना यात्रेकरूंना भेटण्यापासून रोखले'

फोटो स्रोत, Getty Images/NARINDER NANU
पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्त्वाच्या बातम्या.
1. 'भारताच्या उच्चायुक्तांना पाकिस्तानने रोखले'
भारताच्या पाकिस्तानातल्या उच्चायुक्तांना पाकिस्तान सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वाराला भेट देण्यास मनाई केली. या कृतीचा भारताने निषेध केला आहे. 'टाइम्स ऑफ इंडिया'सह सर्वच माध्यमांनी हा बातमी ठळकपणे दिली आहे.
भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया हे त्यांच्या पत्नीसह रावळपिंडीनजीक हसन अब्दल येथे असलेल्या पंजा साहिब गुरुद्वाराला जात असताना त्यांना अडवण्यात आलं. गुरुद्वारामध्ये असलेल्या भारतीय यात्रेकरूंनाही ते भेटणार होते. मात्र पाकिस्तानने मनाई केल्याने त्यांना इस्लामाबादला परतावं लागलं.
बिसारिया यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून परवानगी घेतली असतानाही हा प्रकार घडला.
दरम्यान, भारताने पाकिस्तानच्या उपउच्चायुक्तांना पाचारण करत त्यांच्याकडे घडलेल्या प्रकाराचा तीव्र निषेध व्यक्त केला. हा राजनैतिक संबंधांबाबतच्या व्हिएन्ना कराराचा भंग असल्याचे भारताने पाकिस्तानच्या निदर्शनास आणून दिले.
2. 'दहशतवाद्यांच्या मृतदेहावर कुटुंबीयांचा हक्क नाही'
दहशतवाद्यांना मारल्यानंतर यापूर्वी त्यांचा मृतदेह अंत्यविधीसाठी त्यांच्या कुटुंबीयांकडे दिला जायचा. पण आता दहशतवाद्यांच्या मृतदेहावर त्यांच्या कुटुंबीयांचा हक्क राहणार नाही. दहशतवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे न सोपवण्याचा निर्णय भारतीय सैन्याने घेतला आहे.
सकाळच्या बातमीनुसार, दहशतवाद्यांच्या अंतयात्रेवेळी होणारा गोंधळ लाक्षात घेऊन भारतीय सैन्याने हे पाऊल उचललं आहे. यापूर्वी, दहशतवाद्यांना मारल्यानंतर आपल्या देशात गोंधळ निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचे मृतदेह हे अज्ञातस्थळी दफन करण्याचा निर्णय घेतला आहे.
3. कचरा फेकणाऱ्या अरहानची विरुष्काला कायदेशीर नोटीस
गेल्या आठवड्यात अभिनेत्री अनुष्का शर्माने रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या अरहान सिंह नावाच्या तरुणाला चांगलंच झापलं होतं. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने पत्नी अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आणि तो जोरदार व्हायरल झाला.
झी 24 तासच्या बातमीनुसार, या व्हिडिओनंतर आता अरहानने विराट कोहली आणि अनुष्का शर्माला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

फोटो स्रोत, Twitter/Virat Kohli
विराटने 16 जून रोजी आपल्या ट्विटरवर एक व्हीडिओ पोस्ट केला होता. या व्हीडिओमध्ये कारमधून रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एका तरुणावर अनुष्का संतापताना दिसत आहे. हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर व्हीडिओतील तरुण अरहान सिंहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. यात त्याने विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा समाचार घेतला.
4. हिंदूंवरील अन्यायामुळे मुफ्ती सरकारमधून बाहेर - अमित शाह
नरेंद्र मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधील विकासकामांसाठी जवळपास 80 हजार कोटींची निधी दिला होता. पण हा पैसा जम्मू आणि लडाखपर्यंत पोहचलाच नाही, असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शनिवारी जम्मूमध्ये केली.
मेहबुबा मुफ्ती सरकारच्या काळात राज्यातील हिंदूबहुल इलाख्यावर कसा अन्याय झाला, या मुद्द्यावरच 2019च्या लोकसभा निवडणुकीत प्रचार केला जाणार आहे, हे शहा यांनी आपल्या भाषणातून सूचित केल्याचं लोकमतने आपल्या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images/NurPhoto
नॅशनल कॉन्फरन्स आणि PDPच्या तीन पिढ्यांनी आतापर्यंत जम्मू काश्मीरची सत्ता सांभाळली, पण त्यांनी राज्यासाठी भरीव असं काहीही केलं नाही. आम्ही काश्मिरी पंडितांना आर्थिक पाठबळ दिलं.
पंडितांना 40 वर्षांपूर्वी राज्यातून बेदखल करण्यात आलं होतं. PDPने पंडितांसाठी काहीही केलं नाही, अशीही टीका त्यांनी केली.
5. 'दाऊद इब्राहिमजवळ नेत्यांच्या बॅंक खात्यांची कुंडली'

देशातील काळा पैसा हवालाच्या माध्यमातून दुबईमार्गे विदेशात पाठवण्यात येतो. त्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम आहे. त्याला राजकीय पुढाऱ्यांच्या खात्यांची सर्व कुंडली माहिती आहे, म्हणूनच भारतातील राजकीय पुढारी दाऊद आणि पाकिस्तानविषयी बोलणं टाळतात, असा थेट आरोप भाजप खासदार सुब्रहमण्यम स्वामी यांनी केला आहे.
लोकतंत्र सेनानी संघातर्फे शनिवारी नागपुरात चिटणवीस सेंटरमध्ये 1975च्या आणीबाणीचा स्मृतिदिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात ते प्रमुख वक्ते होते. तेव्हा त्यांनी हा आरोप केल्याची बातमी लोकसत्तानं दिली आहे.
हे पाहिलंत का?
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




















