#5मोठ्याबातम्या : काँग्रेसचा फडणवीसांवर घोटाळ्याचा आरोप; भाजप ठोकणार अब्रुनुकसानीचा दावा

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE/GETTY IMAGES
आजच्या वृत्तपत्रांतील आणि वेबसाईटवरील 5 मोठ्या बातम्या पुढील प्रमाणे
1. फडणवीसांवर 1700 कोटींच्या घोटाळ्याचा काँग्रेसचा आरोप; भाजपचा ही हल्लाबोल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वरदहस्तानं नवी मुंबईतील 1767 कोटी रुपयांची जागा 3 कोटी रुपयांना बिल्डरला दिल्याचा आरोप संजय निरुपम, पृथ्वीराज चव्हाण, रणदीप सुरजेवाला, प्रियंका चतुर्वेदी यांनी केल्यानंतर त्याला भाजपनं या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे.
सिडकोच्या 24 एकर जागेत हा भ्रष्टाचार झाला असून कोयनाच्या 8 प्रकल्पग्रस्तांची 24 एकर जमीन प्रति एकर 15 लाख दरानं बिल्डरनं विकत घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे.
यामध्ये मुख्यमंत्र्यांचे जवळचे मित्र आमदार प्रसाद लाड भागीदार असण्याची शक्यता आहे, असा आरोप काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता. 14 मे रोजी या जमिनीचं हस्तांतरण झालं, त्याच दिवशी जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी बिल्डरला कशी मिळाली, असा सवालही या नेत्यांनी केला होता.
काँग्रेसच्या या आरोपानंतर भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी आणि आमदार प्रसाद लाड यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर खुलासा केला. काँग्रेसच्या नेत्यांवर 500 कोटी रुपयांचा दावा दाखल करणार असल्याचं लाड यांनी म्हटलं आहे.
सध्याच्या रेडीरेकनर नुसार सिडकोच्या जागेची किंमत 5 कोटी 69 लाख इतकी आहे, त्यामुळे सतराशे कोटीचा घोटाळ्याचा आरोप करणं हस्यास्पद आहे, असं भाजपनं म्हटलं आहे.
एबीपी माझाने ही बातमी दिलेली आहे.
2. मालेगावमध्ये मुस्लीम तरुणाने वाचवले 5 हिंदूंचे प्राण

फोटो स्रोत, Praveen Thakare/BBC
राज्यभरात मुलं चोरण्याच्या अफवांमुळे मारहाणीच्या घटना होत असताना मालेगावात एका मुस्लीम तरुणानं संतप्त जमावाच्या तावडीत सापडलेल्या 5 हिंदूचे प्राण वाचवले आहेत. लोकमत न्यूज 18ने ही बातमी दिली आहे.
रविवारी रात्री शहरातील आझादनगर भागात 3 पुरुष, एक महिला आणि एक 3 वर्षांचा मुलगा फिरत होते. त्यांना मुलं पळवणारी टोळी समजून काही तरुणांनी घेराव घातला आणि मारहाण सुरू केली. त्यावेळी तिथं राहणारा तरूण वसिम या युवकानं मध्ये पडून त्यांची सुटका केली, असं या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान गेल्या 25 दिवसांत महाराष्ट्रांत या अफवांमुळे झालेल्या मारहाणीत 9 जणांचा बळी गेला असून एकूण 14 गुन्हे नोंद झाले आहेत. ही बातमी इंडियन एक्स्प्रेसनं दिली आहे. औरंगाबाद ग्रामीण आणि शहर, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, बीड, परभणी, नांदेड, लातूर, गोंदिया आणि चंद्रपूर या ठिकाणी या घटना घडल्या आहेत.
तर सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसांनी दिला आहे, अशी बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.
3. फेकन्यूजला आळा घाला, केंद्राचे राज्य सरकारला आवाहन
फेकन्यूजला आळा घालण्यासाठी राज्य सरकारांनी कठोर पावलं उचलावीत असं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे, असं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.
केंद्रीय गृह राज्यमंत्री किरन रिजिजू यांनी फेकन्यूजला आळा घालण्यासाठी राज्य सरकार, सरकारी विभाग आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येऊन जनजागृती करावी असं आवाहन रिजिजू यांनी केलं आहे.
फेकन्यूज आणि अफवांमुळे निरागस लोकांचे बळी जात असल्याबाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
मुलं पळवून नेणारी टोळी राज्यात सक्रीय झाल्याच्या अफवा देशभरात व्हॉट्सअॅपनं पसरवल्या जात आहेत. या अफवांमुळे आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
4. मोदींच्या व्हिडिओवर केंद्राचा खुलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिटनेस व्हिडिओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ बनवण्यासाठी सरकारनं 35 लाख रुपये खर्च केले होते असा आरोप शशी थरुर यांनी केला होता. हा आरोप केंद्र सरकारनं फेटाळून लावला असल्याचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियानं दिलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
Instagram पोस्ट समाप्त
माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन राठोड यांनी याबाबत खुलासा केला आहे.
"पंतप्रधान कार्यालयाच्या व्हिडिओग्राफरनं हा व्हिडिओ शूट केला असल्यामुळे त्याला खर्च आला नाही," असं स्पष्टीकरण राठोड यांनी दिलं आहे.
5. इटालियन महिलेचा विनयभंग, मुंबईत दोघांना अटक
मुंबईत फिरायला आलेल्या 37 वर्षीय इटालियन महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे. ही महिला 11 जूनला बंगळुरूहून मुंबईत फिरण्यासाठी आली होती.
संशयित हा गाईड म्हणून या महिलेच्या संपर्कात आला होता. कुलाब्याहून जुहूला जाताना हा प्रकार घडला असं या बातमीत म्हटलं आहे.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















