#5मोठ्याबातम्या : महिलांच्या खतनाची वैधता तपासणार - सुप्रीम कोर्ट

खतना

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आजच्या वृत्तपत्रांतील आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे

1. महिलांच्या खतानाची कादेशीर वैधता तपासणार : सुप्रीम कोर्ट

महिलांची खतना करण्याची प्रथा कायदेशीर आहे का, याचा निर्णय सुप्रीम कोर्ट घेणार आहे. दाऊदी बोहरा मुस्लीम समाजात महिलांची खतना करण्याची पद्धत आहे, या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे. सरन्यायाधिश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचुड यांच्या पीठापुढे या याचिकांवर सुनावणी सुरू झाली आहे.

या याचिकांवर जो निर्णय दिला जाईल तो फक्त दाऊदी बोहरा समाजालाच नाही तर इतरही ज्या समाजांत ही प्रथा सुरू आहे, त्यांनाही लागू होईल असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

प्राथमिक दृष्ट्या ही प्रथा मुलभूत अधिकाराचा भाग असलेल्या खासगीपणाच्या अधिकाराचा भंग करणारी आहे, असं सुप्रीम कोर्टानं म्हटलं आहे.

याचिकाकर्त्यांच्या बाजूनं ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग म्हणाल्या, "ही प्रथा Protection of Children from Sexual Offences (POSCO) आणि IPCच्या तरतुदींच्या विरोधात आहे."

2. 'मुस्लिमांतील अस्वस्थता दूर करा'

दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम बुखारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना पत्र लिहिलं आहे. टाइम्स नाऊनं ही बातमी दिली आहे.

पंतप्रधान मोदी

पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, "गोरक्षेच्या नावाखाली मुस्लिमांवर हल्ले वाढलेले आहेत. गाईच्या व्यापारात असलेल्या मुस्लिमांवर गोरक्षकांकडून सामूहिक हल्ले होत आहेत.

'सब का साथ, सब का विकास' ही घोषणा तुम्ही देत असला तरी प्रत्यक्षातील स्थिती वेगळीच आहे. दंगलमुक्त आणि भीतीमुक्त समाजाची निर्मिती करण्याचं भाजप म्हणत असला तरी प्रत्येक बाब हिंदू मुस्लीम दृष्टिकोनातून पाहिली जाते."

या पत्रात त्यांचा राज्यव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी

तर राहुल गांधी यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांवर काँग्रेसनं आपली भूमिका जाहीर करावी असं म्हटलं आहे.

"लिचिंगमध्ये आतापर्यंत 64 मुस्लीम मारले गेले आहेत. मुस्लिमांच्या बद्दल आताच्या सरकारच्या भूमिकेवर तुमचा आवाज कुठं आहे," असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.

3. बालकांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशी

12 वर्षांखालील मुलांवर बलात्कारांच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा देण्याच्या विधेयकाला लोकसभेत मंजुरी देण्यात आली आहे.

कठुआ इथं 8 वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कारानंतर देशभरातून तीव्र संताप व्यक्त झाला होता. यानंतर कायद्यात बदल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

यानुसार 12 वर्षांखालील बालकांवर लैगिंक अत्याचार करणाऱ्यांना किमान 20 वर्ष शिक्षा ते फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. हिंदुस्तान टाइम्सने ही बातमी दिली आहे.

4. मराठा आरक्षणासाठी मुस्लीम आमदारचा राजीनामा

मराठा, मुस्लीम आणि धनगर समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावर राजीनामा देणाऱ्या आमदारांची संख्या 7 झाली आहे.

अब्दुल सत्तार

फोटो स्रोत, Facebook

अब्दुल सत्तार सिल्लोडचे आमदार आहेत. सत्तार यांनी विधानसभा अध्यक्षांकडे त्यांचा राजीनामा सोपवला आहे. न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे.

5. मोदींनी केलं इम्रान खान यांचं अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे होऊ घातलेले पंतप्रधान इम्रान खान यांचं अभिनंदन केलं आहे. द वायरनं ही बातमी दिली आहे. परराष्ट्र मंत्रायलानं या संदर्भात प्रेसनोट प्रसिद्ध केली आहे.

यात म्हटलं आहे की पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ पक्षाचे अध्यक्ष इम्रान खान यांच्याशी पंतप्रधानांनी चर्चा केली आहे. दोन्ही देशांतील संबंधाबाबत एकत्रित कार्यक्रम असावा, असं मोदींनी यावेळी सुचवलं आहे, असं यात म्हटलं आहे.

हे वाचलं का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)