'दिल्लीला मोर्चात येण्यासाठी मला मुलीला बदली कामगार ठेवावं लागलं'

फोटो स्रोत, Rujuta Luktuke/BBC
- Author, अभिजीत कांबळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 3 मिनिटे
"मला मोर्चासाठी दिल्लीला यायचं होतं, पण कामाचा खाडा कसा करणार? ज्यांच्याकडे काम करते त्यांचंही म्हणणं होतं की इतके दिवस कशाला जातेस? जेवढे दिवस सुट्टी तेवढ्या दिवसाचा पगार कापला जाणार होता. पण मोर्चात तर यायचंच होतं. मग शेवटी माझ्या मुलीला माझ्या जागेवर काम करायला पाठवलं. तेव्हा कुठं मोर्चाला येऊ शकले," असं 55 वर्षांच्या पुष्पा हांडे सांगत होत्या.
घरकाम कामगारांच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी त्या मुंबईजवळच्या मीरा भाईंदरहून दिल्लीला आल्या होत्या.
कामगार कायद्यातील प्रस्तावित बदलांना विरोध करण्यासाठी देशभरातील विविध घरकाम कामगार संघटनांनी दिल्लीत निदर्शनं आयोजित केली होती. त्यासाठी पुष्पा हांडेंसारख्या शेकडो महिला दिल्लीतील संसद मार्गावर पोहोचल्या होत्या.
घरकाम करणाऱ्या महिलांना पेन्शन मिळावी, हक्काची साप्ताहिक सुट्टी आणि इतर सुट्ट्या मिळाव्यात, किमान वेतनाची हमी मिळावी, सामाजिक सुरक्षा कायदा करावा, या घरकामगार करणाऱ्या महिलांच्या मागण्या आहेत.
'45 वर्षं काबाडकष्ट करूनही मुलांना शिकवू शकले नाही'
पुष्पा यांना एक मोठी खंत आहे, की गेली 45 वर्षं काबाडकष्ट करूनही आपल्या मुलांना शिकवू शकल्या नाहीत, कारण त्यासाठी आवश्यक असलेली कमाई त्या करू शकल्या नाही.

फोटो स्रोत, RUJUTA LUKTUKE/BBC
"मी गेली 45 वर्षं लोकांकडे घरकाम करत आहे. माझ्या मुलांच्या शिक्षणासाठी मी खूप प्रयत्न केला. पण माझा नवरा काम करू शकत नव्हता आणि मी एवढं कमवू शकले नाही की मुलांना खूप शिकवू शकेन. मुलाला आठवीपर्यंत तर मुलीला सातवीपर्यंत शिकवू शकले. आता माझी मुलगीही माझ्यासारखंच घरकाम करतेय," पुष्पा सांगतात.
मीरा भाईंदरच्या कमला पार्क भागातल्या आठ घरांमध्ये पुष्पा सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत, म्हणजे जवळपास 10 तास दररोज काम करतात.
त्यांना महिन्यातून जेमतेम दोन सुट्ट्या मिळतात. या सर्व कामांचे मिळून त्यांना महिन्याला 4,500 रुपये मिळतात. त्यामुळे एक दिवसाचा खाडा करणं त्यांना परवडत नाही. कारण खाडा केला की कामाचे पैसे कापले जातात.
त्यामुळे मोर्चासाठी दिल्लीला येणं त्यांच्यासाठी सोपं नव्हतं.
'पेन्शनचं तरी काही होईल...'
"मी जिथं-जिथं काम करते त्यांना सांगितलं की मी दिल्लीला चालले आहे मोर्चाला. तर त्या म्हणाल्या की 'नको जाऊ, तू गेल्यावर आमच्या घरातलं काम कोण करणार?' मुलीला बदली कामगार म्हणून पाठवते म्हटल्यावर त्या लोकांनी ऐकलं."

फोटो स्रोत, RUJUTA LUKTUKE/BBC
एकही सुट्टी घेणं अवघड असताना मुंबईहून दिल्लीपर्यंत येण्याचा खटाटोप का केला, यावर त्या सांगतात, "मला कसंही करून इकडं यायचं होतं. माझी अख्खी जिंदगानी काम करता-करता गेली आणि गाठीशी एक पैसासुद्धा उरला नाही. मोर्चात आलो, सरकार पुढे आमचं गाऱ्हाणं मांडलं तर काहीतरी होईल. माझ्या पेन्शनचं तरी काही होईल, अशी आशा आहे. माझं म्हातारपण तरी सुखात जाईल."
पुष्पाताईंसारख्या शेकडो महिला अशा छोट्या छोट्या आशा-अपेक्षा घेऊन दिल्लीत आल्या होत्या.
National Sample Survey नुसार देशभरात घरकाम करणाऱ्या व्यक्तींची संख्या 40 लाखांपेक्षा जास्त आहे. पण हे क्षेत्र असंघटित कामगारांचं असल्यानं या घरकाम कामगारांना छोट्या-छोट्या सोयी-सुविधांसाठी, किमान वेतन मिळण्यासाठी, सुट्ट्यांसाठी प्रचंड संघर्ष करावा लागतो.

फोटो स्रोत, RUJUTA LUKTUKE/BBC
केंद्र सरकारनं 2010 मध्ये घरकाम कामगारांसाठी राष्ट्रीय धोरण जाहीर केलं. मात्र कायदा नसल्यानं पुष्पा यांच्यासारख्या घरकाम कामगारांना त्याचा फायदा मिळत नाही. म्हणून घरकाम कामगारांसाठी व्यापक कायदा बनवावा या मागणीसाठी देशभरातील हजारो घरकामगार महिलांच्या सह्यांचं निवेदन संसदीय स्थायी समितीला देण्यासाठी या महिला दिल्लीत पोहचल्या होत्या.
संसदेपासून अगदी काही मिनिटांच्या अंतरावर त्यांनी निदर्शनं करत आपल्या व्यथा मांडल्या. त्यांचं हे गाऱ्हाणं आता कुठपर्यंत पोहचतंय हे पाहूयात.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















