#5मोठ्याबातम्या: आंध्र प्रदेशात दगडाच्या खाणीत स्फोट, किमान 9 ठार

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. आंध्रप्रदेशात खाणीत स्फोट, किमान 9 ठार
आंध्र प्रदेशच्या कुर्नूलमध्ये दगडाच्या खाणीत झालेल्या एका स्फोटात किमान नऊ लोकांचा मृत्यू झाला आहे. इंडियन एक्सप्रेसने ही बातमी दिली आहे.
कुर्नूल भागातील बेलगाल खेड्यात श्रीनिवास चौधरी यांच्या मालकीची ही खाण आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की दगडाचे मोठे तुकडे हवेत उडाले. त्यामुळे तीन ट्रॅक्टर, एक ट्रक आणि पत्रा चिरडून उद्ध्वस्त झाले.
स्फोट झाला तेव्हा खाणीत 30 मजूर तर खाणीशेजारी 15 जण काम करत होते. पाच मजुरांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून हे सर्व मजूर ओडिशा राज्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.
घडलेल्या या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. स्फोटामुळे इथला वीज पुरवठाही तुटल्याने बचावकार्यात अडथळा येत असल्याचं या बातमीत सांगितलं आहे.
मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे आणि घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
2. SC-STना बढतीत आरक्षण द्या- केंद्र सरकार
अनुसूचित जाती आणि जमातींच्या लोकांनी अनेक वर्षं सामाजिक भेदभाव सहन केला आहे. त्या आधारावर त्यांना बढतीमध्ये आरक्षण दिलं पाहिजे, असा युक्तिवाद केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात केल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"हे प्रवर्ग हजारो वर्षं मागासलेले होते. राज्यघटनेतल्या कलम 335च्या आधारावर त्यांच्या सामाजिक उन्नतीसाठी आरक्षण देणं आवश्यक आहे. त्यांचे मागासलेपण लक्षात घेऊन सकारात्मक कार्यक्रम करावे लागतील," असं महाधिवक्ता के. के. वेणुगोपाल यांनी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या खंडपीठाला सांगितलं.
3. NRCमध्ये कुणासोबत भेदभाव नाही - राजनाथ सिंह
आसाममध्ये नॅशनल रिजिस्टर ऑफ सिटिझन्सच्या अंतिम मसुद्याचं काम आसाम करारानुसार तयार करण्यात आलं आहे. त्यात कुणाबरोबरही भेदभाव करण्यात आलेला नाही किंवा करण्यात येणार नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी राज्यसभेत स्पष्ट केल्याचं वृत्त NDTVनं दिलं आहे.
"आता प्रकाशित झाला आहे, तो NRCचा अंतिम मसुदा आहे. ते अंतिम NRC नाही, हे लक्षात ठेवावे. या मसुद्यात 24 मार्च 1971 पूर्वीपासून आसाममध्ये राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. पण काहींनी पुरावे सादर करूनही त्यांची नावं यादीत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी अवधी देण्यात आलेला आहे," असं राजनाथ सिंह म्हणाले.
4. 'आंबेनळी अपघाताची CID चौकशी व्हावी'
आंबेनळी घाटात झालेल्या दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघाताची सखोल चौकशी व्हावी, अशी विनंती मृतांच्या नातेवाइकांनी केली असल्याचं वृत्त नेटवर्क 18 लोकमतनं दिलं आहे.
गेल्या शनिवारी पोलादपूरजवळच्या दरीत बस कोसळून बसमधील 31 पैकी 30 जणांचा मृत्यू झाला होता. यातून प्रकाश सावंतदेसाई नावाचे एक कृषी अधिकारी आश्चर्यकारकरीत्या वाचले आणि या घटनेची माहिती सर्वांना कळवली.
मात्र आता हेच प्रकाश सावंतदेसाई संशयाच्या भोवऱ्यात आले आहेत. अपघातातून बचावलेल्या सावंतदेसाई यांची चौकशी करण्याची मागणी माजी आमदार सूर्यकांत दळवी आणि मृतांच्या नातेवाइकांनी केली आहे.
5. औरंगजेबचे 50 मित्र होणार सैन्यात दाखल
जम्मू काश्मीरमध्ये शहीद झालेले जवान औरंगजेब यांच्या मित्रांनी, औरंगजेब यांच्या मृत्यूचा बदला घेण्याची शपथ घेतली आहे. शहीद औरंगजेब यांच्या 50 मित्रांनी सौदी अरबमधील नोकरी सोडली असून ते भारतात परतले आहेत, असं वृत्त DNAनं दिलं आहे.
14 जून रोजी औरंगजेब यांचं दहशतवाद्यांनी अपहरण करून त्यांची हत्या केली होती. औरंगजेब यांच्या मृत्यूचा बदला घेऊन दहशतवादाचा खात्मा करावा, अशी विनंती केली होती.
औरंगजेब यांच्या सौदी अरेबियात काम करणाऱ्या मित्रांनी आपली चांगल्या पगाराची नोकरी सोडली असून ते आता लष्करात किंवा पोलीस दलात भरती होण्यासाठी तयारी करत आहेत.
"सैन्यात भरती होऊन आपण औरंगजेबच्या मृत्यूचा बदला घेऊ," असं या 50 जणांपैकी एक असलेल्या मोहम्मद किरामत यांनी सांगितलं.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)




















