#5मोठ्याबातम्या - एकनाथ खडसे : मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण...

फोटो स्रोत, Twiiter/eknath khadse
आजच्या विविध वृत्तपत्रांतील आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी मोठ्या पाच बातम्या पुढील प्रमाणे :
1. 'मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण...'- एकनाथ खडसे
"पक्षातील ज्येष्ठत्वाचा विचार केला तर मुख्यमंत्री मीच व्हायला पाहिजे पण पक्षाच्या आदेशानं चालावं लागतं," असं वक्तव्य माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केलं.
बातमी न्यूज18 लोकमतनं दिली आहे. शहरातील IMA हॉलमध्ये EESL आणि चार पालिकांशी LED पथदिव्यांसाठी झालेल्या करारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
"मी चाळीस वर्षांपासून भाजपचे काम करीत आहे. त्यातील तीस वर्षं जळगावला भ्रष्टाचाराच्या विरोधात संघर्ष केला. स्वत:ला श्रेय मिळावे म्हणून कधी लढा दिला नाही. अन्याय, भ्रष्टाचारावर प्रहार केले," असं ते म्हणाले.
2. राफेलप्रकरणी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार
राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी काँग्रेस देशव्यापी आंदोलन करणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सप्टेंबरमध्ये मध्य प्रदेशात निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणार असून, त्या वेळीच या आंदोलनाची सुरुवात होईल. मध्य प्रदेशात सुरू होणाऱ्या आंदोलनाची रूपरेषा तयार करण्यात येत आहे, असं वृत्त हिंदुस्तान टाइम्सनं दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
दरम्यान, नवी दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे शनिवारी विरोधी पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये झालेल्या बलात्कारांचा निषेध नोंदवला. JD(U) नेता तेजस्वी यादव यांच्या या आंदोलनात राहुल गांधी देखील उपस्थित होते.
3. फारूक अब्दुल्लांच्या घरात घुसलेली व्यक्ती ठार
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या घरात घुसलेल्या एका व्यक्तीला CRPFच्या जवानांनी गोळी घालून ठार केल्याचं वृत्त NDTVनं दिलं आहे.
ही व्यक्ती कार घेऊन त्यांच्या घरात घुसली होती. त्या व्यक्तीने सुरक्षा रक्षकांसोबत झटापट केल्याचंही म्हटलं जात आहे. त्या व्यक्तीचं नाव मुराद अली शाह असल्याचं पोलिसांनी सांगितलं. घटनेच्या वेळी फारूक अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला घरी नव्हते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
अशीच एक घटना दिल्लीमध्ये घडली जेव्हा केरळ हाऊसमध्ये एका व्यक्तीनं हातात तिरंगा आणि काही कागदपत्रांसह केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांना भेटण्याची विनंती केली. पण त्याला अडवण्यात आल्यावर त्याने हाती चाकू घेऊन गदारोळ केला.
अखेर सुरक्षारक्षकांनी त्याच्यावर ताबा मिळविला आणि त्याला पोलिसांकडे दिलं. त्याने आत्महत्येची धमकी देखील दिल्याचं पोलिसांनी सांगितलं.
4. देशभरात 24 लाख नोकऱ्या उपलब्ध
देशभरात 24 लाख सरकारी नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती सरकारने राज्यसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, एकट्या सर्व शिक्षा अभियानांतर्गत आठ लाख शिक्षकांच्या जागा रिकाम्या आहेत.

नोकऱ्या उपलब्ध नसल्याची ओरड सर्व स्तरातून होत असताना पोलीस, आरोग्य, शिक्षण इत्यादी क्षेत्रात इतक्या मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध असल्याची माहिती सरकारने दिली आहे.
5. जेट एअरवेज 'अडचणीत नाही'
जेट एअरवेज आर्थिक अडचणीत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून होती. पण असं काहीही नसून आमचा कंपनी विकण्याचा किंवा हस्तांतरित करण्याचा कोणताही विचार नसल्याचा खुलासा जेट एअरवेजचे मुख्याधिकारी विनय दुबे यांनी केला आहे.
"कंपनी अंशतः विकण्याची चर्चा सुरू असल्याबाबत येणाऱ्या बातम्या खोट्या तर आहेतच, तसंच त्याने कंपनीची बदनामी होते," असं देखील दुबे यांनी मिंट या व्यापार वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















