#5मोठ्याबातम्या : 'गणरायांवर अॅट्रॉसिटी, हे म्हणे हिंदूंचे राज्य'

फोटो स्रोत, Getty Images
पाहूयात आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या महत्वाच्या बातम्या.
1. 'गणरायांवर अॅट्रॉसिटी, हे म्हणे हिंदूंचे राज्य'
सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं हिंदू सणांवरून भाजपावर जोरदार टीका केली आहे. ममता बॅनर्जींना देशद्रोही म्हणणाऱ्यांना आता कोणती उपाधी द्यावी असा सावलही अग्रलेखात करण्यात आला आहे.
प. बंगालात दुर्गापूजा रोखू पाहणाऱ्या ममता बॅनर्जी या भाजपच्या दृष्टीने हिंदुद्रोही ठरल्या. मग गणेशोत्सव रोखू पाहणाऱ्यांना आता कोणती उपाधी द्यावी? असा सवाल सामनाच्या अग्रलेखात विचारण्यात आला आहे.
आजचा सामनातील अग्रलेख हा गणेशोत्सवासंदर्भात आहे. यात म्हटले आहे की, "पंतप्रधान मोदी हे म्हणे मुसलमानी टोपी 'पेहनत' नाहीत म्हणून ते हिंदुत्ववादी असा प्रचार सुरू आहे. पण मुसलमानी टोप्या घालणाऱ्या काँग्रेसी राजवटीतदेखील हिंदूंच्या सण-उत्सवांचे असे धिंडवडे कधी निघाले नव्हते, असं आता दुर्दैवानं म्हणावेसं वाटतं."
"ही मुस्कटदाबी हिंदूंच्या बाबतीत काँग्रेस राजवटीत व्हायची असे आरोप तेव्हा झाले. पण आता भाजप राज्यात ती जरा जास्तच होताना दिसत आहे. सांगली, जळगाव महापालिका विजयाची धुंदी उतरली असेल तर गणपती उत्सवाच्या बाबतीत सुरू असलेल्या मोगलाईची दखल राज्याच्या लाडक्या, लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागेल," असं पुढे लिहिण्यात आलं आहे.
2. काश्मीरमध्ये मेजरसह चौघांचा मृत्यू
काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातल्या गुरेज सेक्टरमध्ये घुसखोरांविरोधातल्या कारवाईत महाराष्ट्राचे मेजर कौस्तुभ प्रकाश राणे (29) यांचा मृत्यू झाला आहे.

फोटो स्रोत, GETTY IMAGES/TAUSEEF MUSTAFA
लोकमतनं दिलेल्या बातमीनुसार, मेजर राणे यांना प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते सेना पदकानं सन्मानित करण्यात आले होते.
मूळचे कोकणातल्या वैभववाडीतील सडूरे गावाचे असणारं राणे कुटुंबीय मीरा रोडच्या शीतल नगरमधील हिरलसागर इमारतीत पहिल्या मजल्यावर राहतात.
2010मध्ये कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर चेन्नई येथून मेजर राणे यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. 2011मध्ये ते सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाले. 2013मध्ये त्यांना कॅप्टनपदी तर 2018मध्ये मेजरपदी बढती मिळाली.
3. आत्महत्या चिंताजनक, आंदोलन चुकीचं - हायकोर्ट
मराठा आरक्षणाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असताना आंदोलन करणं चूक असल्याचं मत मंगळवारी मुंबई हायकोर्टानं व्यक्त केलं.

फोटो स्रोत, Hindustan Times/Getty Images
सकाळच्या बातमीनुसार, हायकोर्टानं सुनावणीवेळी आंदोलनादरम्यान झालेल्या आत्महत्यांबाबत चिंताही व्यक्त केली.
कोणतीही हिंसक पावलं उचलू नका, प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे, असं भावनिक आवाहनही हायकोर्टानं आंदोलकांना केलं आहे.
या विषयाचं गांभीर्य आणि संवेदनशीलता ओळखून तातडीनं निर्णय घ्यावा, असं खंडपीठानं म्हटलं.
मागासप्रवर्ग आयोगातर्फे साधारणतः 15 नोव्हेंबरपर्यंत यावर निष्कर्ष काढून राज्य सरकारकडे अंतिम अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे यावेळी देण्यात आली.
4. 'एक राष्ट्र, एक निवडणूक शक्य नाही'
एक राष्ट्र, एक निवडणूक हे शक्य नसल्याचं मत मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांनी व्यक्त केल्याची बातमी महाराष्ट्र टाइम्सनं दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एका कार्यक्रमानिमित्त ते नागपूरला आले असताना पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी रावत यांनी एकाच वेळी सगळ्या निवडणूका घेण्याची शक्यता फेटाळून लावली.
'एक राष्ट्र, एक निवडणूक'साठी राज्यघटनेत दुरुस्ती करावी लागेल आणि सध्याच्या EVMच्या दुप्पट अर्थात सुमारे ४५ लाख मतदान यंत्र लागतील, त्यामुळे हे होणे शक्य नाही.
तसंच, आगामी निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर हेईल असं त्यांनी स्पष्ट केलं.
तर दुसरीकडे राज्याचे निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पाच वर्षांत एकाही जागेवर निवडणूक न लढविणाऱ्या तसंच जाहीरनाम्यातील आश्वासन पूर्ततेचा अहवाल मतदारांच्या माहितीसाठी प्रसिद्ध न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात येईल असं म्हटलं आहे.
5. घोटाळ्यांमुळे बँकांचे 70 हजार कोटींचं नुकसान
गेल्या तीन वर्षांतील विविध घोटाळ्यांमुळे भारतीय बँकांचं 70 हजार कोटींच नुकसान झाल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आल्याची बातमी द हिंदूनं दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images/INDRANIL MUKHERJEE
मागील तीन आर्थिक वर्षांमध्ये 2015-16 दरम्यान 16,409 कोटी, 2016-17मध्ये 16,652 कोटी आणि गेल्या आर्थिक वर्षी 36,694 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे.
1017-18 मधला आकडा हा गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत दुप्पट आहे. संबधित व्यक्तिंना किंवा संस्थांना या आधीच्या काळात कर्ज देण्यात आलं असलं तरी त्यांनी कर्ज बुडविल्याची माहिती या मागील तीन वर्षांत समोर आली आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















