500 वर्षं जुन्या चंद्रपूरच्या किल्ल्याने असा घेतला मोकळा श्वास

किल्ला स्वच्छता

फोटो स्रोत, Bandu Dhotre

    • Author, जयदीप हर्डीकर
    • Role, बीबीसी मराठीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 5 मिनिटे

"काम सुरू केलं, होत गेलं," चाळीशीतले बंडू धोत्रे सांगत होते.

आपल्या कामाविषयी त्यांच्या आवाजात जराही अहंकार जाणवत नव्हता. विषय होता, चंद्रपूर शहराभोवती असलेल्या गोंडकालीन चांदागढ-परकोट किल्ल्याचा.

सकाळची वेळ होती. गजबजलेल्या वस्तीत रामाळा तलावालगतच्या बुरुजावर बंडू आणि सहकारी आम्हाला त्यांच्या कामाविषयी माहिती सांगत होते.

"चकचकीत बुरुजावर आपल्याला आज बसता-चालता येतं. पण दोन वर्षांपूर्वी तसं नव्हतं, इतकी घाण चोहोबाजूला होती."

या मोहिमेची सुरुवात कशी झाली, असं आम्ही विचाल्यावर बंडू सांगू लागले, "जास्त काही विचार केला नाही. या किल्ल्यासाठी काहीतरी केलं पाहिजे असं मनात ठरवलं. माझं बालपण या भिंतींच्या आसपास गेलं. त्यामुळे किल्ल्याची मोठी ओढ होती. वर्षांनुवर्षे आम्ही हा बकाल झालेला किल्ला बघत होतो. किल्ल्यावरचा कचरा, वाढलेलं जंगल हे सर्व आम्ही बघत होतो. त्यामुळे मग काम करायचं ठरवलं आणि काम सुरू केलं."

"हातात फावडे, घमेले घेतले आणि आमचा प्रवास सुरू झाला. दररोज पहाटे पाचला किल्ला गाठायचा. संस्थेचा युनिफॉर्म म्हणजे पांढरा टी-शर्ट आणि कुठल्याही रंगाची पॅंट घालायची हा तेव्हाचा नियम आणि डोक्यावर हेल्मेट चढवायचं. मग किल्ल्यावर साठलेला वर्षानुवर्षांचा कचरा, वाढलेलं जंगल, फेकलेला राडरोडा सावडायचा आणि किल्ल्याचा प्राण मोकळा करायचा. न चुकता, दररोज आम्ही हे काम करतो."

1 मार्च 2017ला स्वच्छता मोहीम सुरू झाली ती अजून सुरूच आहे. आता किल्याच्या भिंतींवरून चालता येते कारण आम्ही ट्रक भरून कचरा साफ केला.

"एका बुरुजावर आम्हाला 10 ट्रॅक्टर माती काढावी लागली," बंडू सांगतात.

किल्ल्याच्या भिंतीचा श्वास मोकळा

या मोहिमेत चंद्रपूरचे व्यापारी सहभागी झाले. महिलांनी सहभाग घेतला. शिक्षक विद्यार्थी आणि अगदी वृद्धसुद्धा आले. कोणी या स्वयंस्फूर्त कार्यकर्त्यांना झाडू घेऊन दिले तर काहींनी चांगले चप्पल विकत घेऊन दिले. काहींनी हेल्मेटचा खर्च उचलला. लोकसहभागातून, लोकवर्गणीतून हे अभियान एका मोठ्या कामात बदललं.

"आमच्यापैकी कुणालाही या कामाचा अनुभव नव्हता," बंडू पुढे सांगतात.

मोहीम जसजसी व्यापक होत गेली तसतसं तिचं स्वरूप कठीण होत गेलं. या किल्लाच्या भिंतीचा श्वास मोकळा करायला बरेच श्रम घ्यावे लागले.

किल्ला स्वच्छतेचा दुसरा टप्पा झाल्याचं बंडू सांगतात.

फोटो स्रोत, Bandu Dhotre

गेल्या उन्हाळ्यापासून दर रविवारी चंद्रपूरकर 'हेरिटेज वॉक'ला येतात, किल्ला समजून घेतात, गोंडकालीन इतिहासात रमतात. मग त्यातील काही लोक मोहिमेत सहभागी होतात.

"आधी मी आणि माझे पाच-सहा सहकारी मित्रच गोळा व्हायचो. एका महिन्यानंतर गावातील मंडळी उत्साहानं आमच्यासोबत यायला लागली. नंतरनंतर तर होडच लागली."

बंडू म्हणाले जस-जसा किल्ला मोकळा होत गेला, लोकांना आपोआप त्यांचे वैभव कळले. दीड वर्षांहून जास्त काळ लोटला. सफाईचे काम रोज सुरूच आहे. तेही अव्याहतपणे. आत्ता कुठे एक टप्पा संपला आहे.

'दुसरा टप्पा सुरू'

"दुसरा आणि महत्वाचा टप्पा सुरू झाला आहे. या टप्यात जीर्णावस्थेत असलेल्या भिंती, किल्ल्याचे दरवाजे, बुरुजांची डागडुजी होणार आहे. सोबतच शहराभोवती किल्ल्यालगत असलेले असंख्य अतिक्रमणे तोडून किल्ला-परलकोटच्या दोन्ही बाजूने संरक्षण भिंतीचे बांधकाम पुरातत्व विभागाने सुरू केलं आहे," बंडू मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याबद्दल सांगतात.

किल्ला स्वच्छता

फोटो स्रोत, Bandu Dhotre

ही संरक्षण भिंत किल्ल्याच्या भिंतीपासून साधारण 10 ते 12 फूट अंतरावर असणार आहे. यामधून पाथ वे आणि सायकल ट्रॅक तयार करण्याचं नियोजन आहे.

काही रहिवाशांनी स्वत: त्यांच्या घराच्या ज्या भिंती किल्ल्याला लागून आहेत, त्या हटवण्याची तयारी दाखवली. काहींना बंडू आणि त्यांचे सहकारी घरी जाऊन समजावून सांगत आहेत.

"किल्ला आपला आहे, त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे," असं बंडू लोकांना सांगतात.

बंडू यांनी सुरू केलेली स्वयंसेवी संस्था इको-प्रोसोबत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने अलीकडेच एक करार केला आहे. देशातील स्वछ भारत मिशनअंतर्गत अशापद्धतीचा हा पहिलाच करार आहे. याचा गौरव 'मन की बात' या कार्यक्रमात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीसुद्धा केला आहे.

चंद्रपूर जिल्हा गोंडकालीन इतिहासाकरिता प्रसिद्ध

देशातल्या गड-किल्ल्यांचं संरक्षण आणि जतन करण्याचा अधिकार भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचा आहे. मात्र लोकसहभागाशिवाय एवढं मोठं काम होणं कठीण आहे, हे इको-प्रोच्या कामानं दाखवून दिलं आहे.

चंद्रपूर जिल्हा गोंडकालीन इतिहासासाठी प्रसिद्ध आहे. चांदागड परकोट किल्ला, अनेक ऐतिहासिक वास्तू, मंदिरे आणि समाधी आता 'राष्ट्रीय संरक्षित स्मारके' म्हणून घोषित आहेत. संपूर्ण विदर्भात अशा प्रकारची साधारण 90 संरक्षित स्मारके (हेरिटेज साईट्स) आहेत.

बंडू धोत्रे चांदागढ-परकोट किल्ल्याचं संवर्धन करत आहेत.

फोटो स्रोत, Bandu Dhotre

फोटो कॅप्शन, बंडू धोत्रे चांदागढ-परकोट किल्ल्याचं संवर्धन करत आहेत.

नागपूर विभागाचे पुरातत्व विभागतील तज्ज्ञ आलम हाश्मी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "गोंडांचे ऐतिहासिक किल्ले असो अथवा त्यांची मंदिरे अथवा आणखी काही वास्तू यांबद्दल फारसा अभ्यास झालेला नाही. एकेकाळी मध्य भारतात दबदबा असलेले गोंड राज्य मानवशास्त्रीय अभ्यासानुसार निसर्गाशी एकरूप होते. ह्या वास्तूंवरून त्याचा अंदाज बांधता येतो."

"चंद्रपूर जिल्ह्यातील पुरातन वास्तूंच्या जतनाचं काम आम्ही बंडू धोत्रेंच्या संस्थेसोबत मिळून करू," हाश्मी पुढे सांगतात.

विशेष म्हणजे चंद्रपूरनजीक असलेल्या बल्लारपूर येथील नगरपालिकासुद्धा तिथल्या वास्तूंच्या संवर्धनासाठी पुरातन विभागाची मदत करणार आहे.

किल्ल्यानं चंद्रपूरचं रक्षण केलं

चंद्रपूर येथे गोंड राज्याची राजधानी स्थापन होण्यापूर्वी 'बल्लारपूर'वरून राजकारभार चालायचा. त्यापूर्वी 'शिरपूर' येथून गोंडराज्याची धुरा सांभाळली जायची. पंधराव्या शतकाच्या अगदी शेवटी गोंडराजे खांडक्या बल्लाळशहा यांनी चंद्रपूर येथे राजधानी वसवण्याच्या दृष्टीने किल्ला परकोटाच्या बांधकामास सुरुवात केली.

पुढे 6व्या पिढीतल्या गोंडराज्याने 16व्या शतकाच्या सुरुवातीस या किल्ल्याचे बांधकाम पूर्ण केले, म्हणजे साधारण 125 वर्षाअंती.

किल्ला स्वच्छता

फोटो स्रोत, Bandu Dhotre

चंद्रपूर किल्लापरकोटाच्या पूर्वेकडून आणि पच्छिमेकडून वाहणाऱ्या झरपट आणि इरई नदी पठाणपुरा गेट समोरील भागात म्हणजे दक्षिणेकडे एकमेकास मिळतात.

चंद्रपूर शहरात दरवर्षी छोटे-मोठे पूर येत असतात. 2-4 वर्षांत मोठे पूर येऊन शहरात पाणी घुसते. यामुळे प्रत्येक वर्षी किल्ल्याला पुराचा वेढा पडतो.

पुराच्या लाटांच्या माऱ्यापासून हा किल्ला चंद्रपूर शहराचं रक्षण करत आला आहे.

मुळात या किल्याची निर्मितीच भौगोलिकदृष्टया पुरापासून शहराचे रक्षण व्हावे या उद्देशाने गोंड राजवटीनं केली आहे. ब्रिटिश काळात या किल्ल्यावर पुराच्या आणि महापुराच्या अनेक नोंदी कोरल्या आहेत.

या किल्याची भिंत 11 किमी लांब आहे. त्याला 4 प्रशस्त दरवाजे, 5 खिडक्या आणि 39 बुरूज आहेत. या पूर्ण परकोटाच्या अवती-भोवती गोंडराज्यकर्त्यांनी चंद्रपूरहून 250 वर्षांहून अधिक काळ राज्य केलं. बल्लारपूर इथून हे राज्य 175 वर्षं आणि शिरपूर इथून 125 वर्षं चाललं, असा ऐतिहासिक दाखला मिळतो.

आदिवासींचं राज्य

देशात आणि जगात एखादया आदिवासी समुहाने जे कायम वनात, दुर्गम भागात राहतात त्यांनी संघटित होत आपले स्वतंत्र राज्य निर्माण केले आणि जवळपास 550 वर्षं सतत या संपूर्ण प्रदेशावर राज्य केले असे हे कदाचित एकमेव उदाहरण असेल, असं पुरातत्व शास्त्रज्ञ सांगतात.

या वैभवशाली गोंडराज्याचा अस्त 1751मध्ये नागपूरच्या भोसल्यांकडून झाला. यानंतर चंद्रपूर हे मराठ्यांच्या ताब्यात होते.

या काळात चंद्रपूरमधून भोसल्यांनी 1751 ते 1818 असं 70 वर्षं राज्य केलं. 1818मध्ये ब्रिटिशांनी आक्रमण करत चंद्रपूर जिंकून घेतलं. त्यानंतर चंद्रपूरवर स्वातंत्र्यापर्यंत ब्रिटिशांचा अंमल होता.

किल्ल्यावरून फिरताना बंडू सांगत होते की, "परकोटावर वाढलेल्या झाडांमुळे याला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. काही ठिकाणी किल्ल्याच्या भिंती ढासळू लागल्या."

या किल्लाच्या जटपुरा गेटला शहरात विशेष दिवशी रोषणाई अथवा मिरवणुकीचे स्वागत करण्याच्या दृष्टीने कधी कधी वापरात येत असल्यानं त्याची किमान स्वच्छता करावी लागत असे. त्यामुळे या ठिकाणी जाण्यासारखी परीस्थिती होती. मात्र परकोटाचा भाग म्हणजे दृर्लक्षित आणि उपेक्षितच होता.

"पुरातत्व सर्वेक्षण विभाग त्यावर खर्च करून या किल्ल्याच्या जतनाचं काम पूर्ण करणार आहे. याच्या दोन्ही बाजूनं संरक्षणभिंती तर तयार होतीलच. पण काही ठिकाणी म्हणजे राजा बिरशाह आणि त्यांची राणी हिरई यांची जिथं समाधी आहे तिथं बागा तयार करण्यात येईल. या सगळ्या कामाला सुरुवात झाली आहे, पण टप्याटप्यानी होणाऱ्या या प्रकल्पाला पूर्णत्वास यायला थोडा वेळ लागेल," असं हाश्मी सांगतात.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)