#5मोठ्याबातम्या : षटकार ठोकून ऋषभ पंतचे कसोटी पदार्पण

ऋषभ पंत

फोटो स्रोत, BCCI/Twitter

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आजच्या वृत्तपत्रांतील आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे :

1. षटकार ठोकून ऋषभ पंतचे कसोटी पदार्पण

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यातून कसोटीमध्ये पदार्पण करणारा भारतीय फलंदाज ऋषभ पंतने षटकार ठोकून धावाचं खातं उघडलं. कसोटीत षटकार खेचत पदार्पण करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. द क्विंटनं ही बातमी दिली आहे.

तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवशी ऋषभने अदिल रशिदच्या बॉलिंगवर षटकार लगावला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 6 गडी गमावत 307 धावा केल्या आहेत. ऋषभ 22 धावा करून नाबाद राहिला आहे. विराट कोहलीचं शतक तीन धावांनी हुकलं.

2. जीमेलचे नवे फीचर - पाठवलेला मेल डिलिट करता येणार

गूगलने जीमेलमध्ये नवे बदल केले असून यामुळे युजरला नवे नियंत्रण मिळाले आहेत. कॉन्फिडन्शिअस मोड या नावाच्या या फीचरमुळे पाठवलेला मेल ठराविक कालावधीमध्ये डिलिट होणार आहे. इमेल पाठवताना 1 दिवस, 1 आठवडा किंवा 5 वर्ष असा त्यासाठीचा कालावधी निवडता येणार आहे. त्यामुळे मिळालेला इमेल फॉरवर्ड, डाऊनलोड, प्रिंट किंवा कॉपी पेस्ट करणे यावर नियंत्रण येणार आहे. हे बदल सर्व्हरवर होत असल्याने जीमेल अपडेट करण्याची गरज नाही. एप्रिल महिन्यात झालेले हे बदल अँड्रॉईड आणि आयओएसवर उपलब्ध झाले आहेत. एनडीटीव्हीने ही बातमी दिली आहे.

3. मणिशंकर अय्यर यांचं निलंबन रद्द

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेले नेते मणिशंकर अय्यर यांचं निलंबन काँग्रेस पक्षानं मागे घेतलं आहे. काँग्रेसचे संघटन सचिव अशोक गेहलोत यांनी ही माहिती दिली. डिसेंबर 2016मध्ये एका कार्यक्रमात बोलताना अय्यर यांनी मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.

मणिशंकर अय्यर

फोटो स्रोत, Getty Images

यावर मोठा वाद झाला होता. त्यानंतर अय्यर याचं पक्ष सदस्यत्व रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर पक्षाच्या शिस्तपालन समितीनं त्यांचे निलंबन रद्द करण्याची सूचना केली होती, ती पक्षाने स्वीकारली आहे. द हिंदूने ही बातमी दिली आहे.

4. 16 दिवसांत लोकल अपघातात 137 प्रवाशांचा बळी

मुंबई लोकल प्रवासात अपघात होऊन ऑगस्ट महिन्याच्या 16 दिवसांत 137 प्रवाशांनी जीव गमावला आहे. तर जखमी प्रवाशांची संख्या 157 इतकी आहे. यातील काहींना कायमचे अपंगत्व आलं आहे. न्यूज 18 लोकमतने ही बातमी दिली आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या तुलनेत मध्य रेल्वेवर मृतांची आणि जखमींची संख्या खूप जास्त आहे, असं बातमीत म्हटलं आहे.

5. पाकिस्तान लष्कर प्रमुखांशी गळाभेट : सिद्धू वादात

सिद्धू

फोटो स्रोत, Getty Images

पंजाबचे मंत्री, काँग्रेसचे नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर बाजवा यांची गळाभेट घेतल्याने त्यांच्यावर टीका होत आहे. इम्रान खान यांनी शुक्रवारी पाकिस्तानाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमाला सिद्धू उपस्थित होते. द टाइम्स ऑफ इंडियाने ही बातमी दिली आहे. भारतीय जनता पक्षानं काँग्रेसकडे सिद्धू यांच्यावर कारवाईची मागणी केली असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)