#5मोठ्याबातम्या : 'वाजपेयींच्या अंत्यसंस्काराला डेव्हिड हेडलीचा भाऊ'

vajpayee

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आजची विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या पाच मोठ्या बातम्या अशा.

1. 'वाजपेयींच्या अंत्यसंस्काराला डेव्हिड हेडलीचा भाऊ'

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानहून आलेल्या शिष्टमंडळात 26/11च्या मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडलीचा भाऊ दानयाल गिलानीही सहभागी झाले होते, असं लोकसत्तामध्ये आलेल्या बातमीत म्हटलं आहे. वाजपेयींच्या अंत्यसंस्कारात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानचे कायदा मंत्री अली जाफर १७ ऑगस्टला भारतात आले होते.

यावेळी त्यांच्यासोबत तीन अधिकारी होते. त्यात दानयाल गिलानी होते. गिलानी हे 26/11च्या मुंबई हल्ल्यात प्रमुख भूमिका निभावणाऱ्या डेव्हिड हेडलीचे सावत्र भाऊ आहेत. दोघांचे वडील एकच आहेत, मात्र आई वेगळी आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.

2. 'सनातनवर बंदीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला'

सनातन संस्थेवर बंदीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती गृहमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. न्यूज १८ लोकमतही बातमी दिली आहे. केसरकर यांनी केंद्राकडे याबद्दल नवा प्रस्ताव पाठवला असल्याचं म्हटलं आहे.

आधीच्या प्रस्तावात त्रुटी असल्यानं नवा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्याचं या बातमीमध्ये म्हटलं आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आलं आहे याबद्दल त्यांनी एटीएसच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं.

3. आशियाई स्पर्धेत विनेश फोगाटला सुवर्ण पदक

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट हिनं आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० किलो वजनी गटातील फ्रीस्टाईल कुस्तीत सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं असं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

महिला कुस्तीपटू विनेश फोगट

फोटो स्रोत, VINESH PHOGAT/TWITTER

ऐतिहासिक कामगिरीची नोंद करत विनेश आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारी पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे. सुवर्णपदकासाठी झालेल्या लढतीत विनेशनं जपानच्या की इरी युकीला ६-२ अशी मात केली.

भारतानं आशियाई क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत दोन सुवर्णपदकं मिळवली आहेत. भारताला ही दोन्ही पदकं कुस्तीतच मिळालेली आहेत. रविवारी बजरंग पुनियानं या स्पर्धेतील सुवर्णपदक पटकावलं होतं.

4. 'केंद्रानं डोकलाम प्रकरणी आम्हाला अंधारात ठेवलं'

भारत आणि चीनदरम्यान डोकलाम इथे घडत असलेल्या घडामोडींमुळे सिक्कीमची जनता भीतीच्या सावटाखाली जगत आहे. केंद्र सरकार आणि लष्करानं डोकलाममध्ये सुरू असलेल्या घडामोडींबाबत आम्हाला अंधारात ठेवलं आहे, असं वक्तव्य सिक्कीमचे मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी केलं आहे.

द हिंदू वृत्तपत्रातील बातमीनुसार, चामलिंग कोलकाता इथून आलेल्या काही पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "आम्हाला अजून कोणीही संपर्क साधलेला नाही. केंद्र सरकार किंवा लष्करानेही या विषयावर काही कळवलेलं नाही. डोकलामबद्दलची सगळी माहिती फक्त वृत्तपत्रातून मिळते."

5. 'प्रक्षोभक भाषणांसाठी योगी आदित्यनाथांवर का कारवाई करू नये?'

२००७मधल्या गोरखपूर दंगलीप्रकरणी प्रक्षोक्षक भाषण केल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर का कारवाई करण्यात येऊ नये, असा सवाल सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारला केला आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, २००७मधल्या गोरखपूर दंगलीप्रकरणी प्रक्षोक्षक भाषण केल्याबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर का कारवाई करण्यात येऊ नये? असा सवाल सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश सरकारला केला आहे.

द हिंदूस्तान टाइम्समधल्या या बातमीप्रमाणे, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश दिपक मिश्रा, न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचू़ड यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणी सुनावणी सुरू आहे. या खंडपीठानं उत्तर प्रदेश सरकार, त्यांचं गृह खातं, जिल्हा दंडाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना ही नोटीस बजावली आहे.

योगी आदित्यानाथ यांच्यावर कारवाई करण्यात येऊ नये हा निकाल फेब्रुवारी २०१८मध्ये अलाहाबाद हायकोर्टानं दिला होता. या निकालाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं आहे.

२००७मध्ये योगी आदित्यनाथ भाजपचे खासदार होते. यावेळी मोहरमनिमित्त निघालेल्या जुलूसवरून आदित्यनाथ यांनी प्रक्षोभक भाषण केल्याचा आरोप आहे. या भाषणानंतर याभागात जातीय दंगली उसळल्याची घटना घडल्याचा दावाही याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)