#5मोठ्याबातम्या : अमर्त्य सेन म्हणतात भारतातली लोकशाही धोक्यात

फोटो स्रोत, Getty Images
आजची वृत्तपत्रं आणि वेबसाईटवरील 5 महत्त्वाच्या बातम्या पुढील प्रमाणे :
1. देशातली लोकशाही धोक्यात - अमर्त्य सेन
नोबेल पुरस्कार विजेत अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी केंद्रातील भाजप सरकारवर थेट हल्ला करत देशातील लोकशाही धोक्यात आली आहे, असं वक्तव्य केलं आहे.
तसंच आगामी लोकसभा निवडणुकीत सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र यावं असं आवाहनही केलं आहे.
महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे. कोलकता इथं केंद्र सरकार, राजकीय-सामाजिक वातावरण या विषयवर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
"सध्या देशातील लोकशाही धोक्यात आहे. पण आपण परिस्थितीत सुधारणा करू शकतो. आपल्यावर प्रहार होतील, तरीही जनताच ही स्थिती बदलू शकते. बुडणारी बोट सोडून पळ काढणे हा उपाय नव्हे," असंही सेन म्हणाले असल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images/Sean Gallup
तर दुसरीकडे देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वारसा आणि योगदान पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असल्याची टीका केली आहे.
त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. दिल्लीतील नेहरू स्मृती संग्रहालय आणि वाचनालय (एनएमएमएल) आणि तीन मूर्ती स्मारक यांच्यात केल्या जाणाऱ्या प्रस्तावित बदलांबद्दल त्यांनी या पत्रातून चिंता व्यक्त केली आहे.
नेहरूंचे योगदान पुसून टाकण्याचं कारस्थान रचलं जात असल्याचा आरोप त्यांनी या पत्रात केला आहे. ही बातमी लोकसत्तानं दिली आहे.
2. अहमदाबादमध्ये इमारत पडली; 7 अडकले
अहमदाबाद इथं रविवारी रात्री इमारत कोसळली असून त्यात 7 जण अडकले आहेत. ही बातमी हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे.
ही इमारत आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी सरकारनं बांधली होती. ही इमारत चार मजली असून त्याचे दोन मजले कोसळलेत. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांपैकी 3 जणांना बाहेर काढण्यात आलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.
3. 1984च्या शिख दंगलींना काँग्रेस जबाबदार नाही - कॅ. अमरिंदर सिंग
1984ला झालेल्या शिखविरोधी दंगलींना काँग्रेसला पक्ष म्हणून जबाबदार धरता येणार नाही, अशी प्रतिक्रिया पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेत अमरिंदर सिंग यांनी दिली आहे.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी या आशयाचं मत व्यक्त केलं होतं.

फोटो स्रोत, AFP
त्यावर शिरोमणी अखाली दलानं टीका केली होती. यावर अमरिंदर सिंग यांनी गांधी यांची बाजू घेतली आहे.
या कत्तलींमध्ये काँग्रेसचा पक्ष म्हणून कोणताही सहभाग नव्हता, काही लोकांनी केलेल्या गुन्ह्याला पक्षाचं कृत्य म्हणणं अपरिपक्वपणाचं लक्षण आहे, असं ते म्हणाले. द हिंदूनं ही बातमी दिली आहे.
4. राहुल गांधीवर देशाची बदनामी केल्याचा गुन्हा
राहुल गांधी यांनी युरोप दौऱ्यात केलेल्या वक्तव्यांमुळे देशाची बदनामी झाली असल्याची, अशी केस बिहारमधल्या मुझ्झफरपूर इथल्या न्यायालयात दाखल झाली आहे.
व्यवसायानं वकील असलेल्या सुधीर कुमार ओझा यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांकडे ही केस दाखल केली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बेरोजगारी आणि दहशतावाद वाढीच्या संबंधांबाबात राहुल गांधी यांनी वक्तव्य केलं होतं.
त्यामुळे भारताची बदनामी झाली आहे, असं ओझा यांचं म्हणणं आहे. द न्यू इंडियन नं ही बातमी दिली आहे.
5. सरोळेकडून जप्त केलेल्या पिस्तुलातून लंकेश यांची हत्या : सीबीआय
सचिन अंदुरे याचा मेव्हणा शुभम सरोळे याच्याकडून जप्त केलेल्या पिस्तुलातून पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या झाल्याचा दावा सीबीआयनं न्यायालयात केला आहे.
सचिन अंदुरे याला डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अंदुरे याची पोलीस कोठडी 30 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
हे वाचलं का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















