जेव्हा एका विकलांग मुलीचा विश्वासघात होतो...

लैंगिक अत्याचार
    • Author, दिव्या आर्य
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 3 मिनिटे

बलात्काराला बळी पडलेल्या एका विकलांग मुलीला जेव्हा मी पहिल्यांदा भेटले तेव्हा तिनं मला सांगितलं की, या बलात्कारापेक्षाही सगळ्यांत वाईट होतं ते म्हणजे लोकांचा अविश्वास. विकलांग मुलीवर बलात्कार होऊ शकतो यावर कुणाचाच विश्वास बसत नव्हता.

पोलीस, शेजारी इतकंच काय तिचं कुटुंबही तिला विचारत होतं, "विकलांग मुलीवर बलात्कार करून कोणाला काय मिळेल?"

तिच्यावर सामूहिक बलात्कार झाला होता. मुलीच्या मते तिच्या शेजारी राहणाऱ्या एका मुलानं आणि त्याच्या मित्रांनी कोल्डड्रिंकमध्ये काहीतरी मिसळून तिला दिलं. जेव्हा ती शुद्धीवर आली तेव्हा ती अर्धनग्न अवस्थेत होती.

शेवटी पोलिसांनी तक्रार नोंदवली आणि आता खटला सुरू आहे.

विकलांग मुलीविरुद्ध लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात बहुतेक वेळा त्यांच्या ओळखीचेच विश्वासघात करतात.

असाच प्रकार देहरादूनच्या नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर विज्युअली हँडिकॅप्ड (NIVH) मध्ये झाला. तिथल्या मॉडेल स्कूलमध्ये संगीत शिकवणाऱ्या शिक्षकावर विद्यार्थिनींनी लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले आहेत.

त्यांच्यावर आधी कोणीही विश्वास ठेवला नाही. शाळेच्या मुख्याध्यपकांनी नाही आणि संस्थेच्या संचालकांनीसुद्धा.

त्यांना दहा दिवस संप करावा लागला. मग सोशल मीडियावर त्याचा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला. स्थानिक प्रसारमाध्यमांना बातमी दिली गेली. आणि शेवटी पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाची नोंद घेतली.

विद्यार्थिनींनी दंडाधिकाऱ्यांसमोर साक्ष दिली. त्यानंतर शिक्षकांवर POCSO कायद्याअंतर्गत अपंगत्वाचा गैरफायदा घेत लैंगिक अत्याचार करण्याचा खटला दाखल केला.

तो शिक्षक सध्या फरार झाला आहे. मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकांची उचलबांगडी करण्यात आली आहे. संस्थेच्या संचालकांनी राजीनामा दिला आहे.

जागतिक आरोग्य संघटना, वर्ल्ड बँक आणि वर्ल्ड रिपोर्ट ऑन डिसअबिलिटी यांच्यानुसार सामान्य स्त्रिया आणि विकलांग पुरुषांच्या तुलनेत विकलांग स्त्रियांच्या शिक्षण आणि रोजगाराचा दर कमी आणि हिंसेला बळी पडण्याचं प्रमाण जास्त आहे.

इतर लोक जास्त संवेदनशील

अहवालानुसार विकलांग स्त्रियांना बाह्यजगात प्रचंड असुरक्षित वाटतं. त्यामुळे त्यांना शिक्षण आणि रोजगारापासून दूर ठेवण्यात येतं.

त्यांचं शिक्षण आणि रोजगार यांच्या कुटुंबाच्या लेखी कमी महत्त्वाचं असतं. त्यांना बाहेर पाठवणं म्हणजे हिंसाचाराची शक्यता आणि आपली जबाबदारी वाढवणं आहे, असं त्यांना वाटतं.

विकलांग

विकलांग स्त्रियांशी चर्चा केली तर असं लक्षात येतं की लैंगिक हिंसेचा धोका त्यांच्यासाठी सगळ्यांत जास्त आहे. पण संपूर्ण जग त्यांना वखवखलेल्या नजरेनं पाहतं असंही नाही.

जवाहरलाल नेहरू विद्यापिठात शिकणाऱ्या श्वेता मंडल सांगतात की सुदृढ व्यक्ती सगळ्यांत जास्त संवेदनशील असतात. विकलांग लोकांसाठी ते सगळ्यांत जास्त गरजेचं आहे.

श्वेता म्हणाल्या, "आम्हाला मदत हवी याबद्दल काहीही दुमत नाही. ती मिळतेही. इतर लोकांवरचा विश्वास हा आमच्या आयुष्याचा सगळ्यांत मोठा भाग आहे."

NIVH मध्ये सुद्धा याच विश्वासाच्या आधारावर विद्यार्थ्यांना खिडक्या आणि दरवाजे उघडे ठेवण्याचा सल्ला दिला जात होता.

मात्र लैंगिक अत्याचाराची प्रकरणं समोर येताच National Platform for the Rights of Disabled (NPRD) च्या दोन सदस्यांनी जेव्हा संस्थेचा दौरा केला तेव्हा विद्यार्थिनींनी सांगितलं की त्यांना संस्थेत असुरक्षित वाटतं.

संस्थेत काम करणारे पुरुष न सांगताच हॉस्टेलमध्ये येतात. बाथरुमच्या दारावरही पाट्या लागलेल्या नाहीत.

जेव्हा विद्यार्थिनींनी लैंगिक हिंसाचाराची तक्रार केली तेव्हा त्यांनाच उलट व्यवस्थित कपडे घालण्याचा सल्ला दिला गेला.

संस्थेत हा मुद्दा पहिल्यांदाच समोर आलाय असंही नाही. विद्यार्थ्यांनी एप्रिलमध्ये याच शिक्षकासह संगीत शिकवणाऱ्या दुसऱ्या एका शिक्षकाच्या विरुद्ध लैंगिक हिंसाचाराचा आरोप लावला होता.

तेव्हाही संप झाला होता. त्यांनंतर दुसऱ्या एका अध्यापकाला अटक करण्यात आली होती. मात्र हे अध्यापक तेव्हा शिकवत होते.

POCSO कायद्याअंतर्गत किशोरवयीन किंवा लैंगिक हिंसाचाराची घटना एखाद्या अधिकाऱ्याला सांगितली आणि त्या व्यक्तीनं याची दखल घेतली नाही तर त्याच्यावरसुद्धा कारवाई होते.

त्यामुळे संस्थेच्या मोठ्या पदावर बसलेल्या संचालक आणि मुख्याध्यापकांविरुद्ध कारवाई होणार का?

लैंगिक अत्याचार

"Rights of Persons with Disablities Act" च्या अंतर्गत पद आणि सत्ता यांचा चुकीचा वापर करून विकलांग व्यक्तींबरोबर लैंगिक हिंसाचार करणं शिक्षेस पात्र आहे.

या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. लवकरच कळेल की या प्रकरणात विश्वास किती मर्यादेपर्यंत कमी झाला आहे.

मला पुन्हा त्या पीडितेची आठवण झाली. विश्वासू लोकांनी केलेले अत्याचार तर जास्त वेदनादायी असतात.

असं झालं आणि विश्वासू लोकांचं सहकार्य मिळालं नाही तर त्या वेदना आणखीच वाढतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)