#5मोठ्याबातम्या : नोटाबंदीनंतर 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत

फोटो स्रोत, AFP
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत
मोदी सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या 99.3 टक्के नोटा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे (RBI) परत आल्या आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.
RBIच्या वार्षिक अहवालातून ही बाब समोर आली आहे.
नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर 500 आणि 1,000 रुपयांच्या सुमारे 15 लाख 41 हजार कोटी रुपये मुल्याच्या नोटा चलनातून बाद झाल्या होत्या. त्यापैकी 15 लाख 31 हजार कोटी रुपये किमतीच्या नोटा परत बँकेकडे जमा झाल्या आहेत.
13 हजार कोटी रुपयांच्या नोटा बँकेत आलेल्या नाहीत. ही आकडेवारी अत्यल्प असल्यानं नोटाबंदी फसल्याची चर्चा आहे, असा बातमीत उल्लेख आहे.
2. गोव्यात पर्यायी नेतृत्वाची चर्चा
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत गोव्याचं प्रशासन सक्रीय करण्याच्या हेतूनं गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदल केला जाण्याची शक्यता आहे. दैनिक लोकमतनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Reuters
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि गोवा भाजपची कोअर टीम गरुवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे आजारी असून त्यांना तिसऱ्यांदा उपचारांसाठी अमेरिकेला जावं लागत आहे.
"गुरुवारी दिल्लीत भाजपच्या पक्षश्रेष्ठींना भेटून गोव्याची राजकीय स्थिती मांडली जाईल. काही तरी पर्यायी व्यवस्था करायला हवी. आम्ही स्थिती भाजपच्या अध्यक्षांसमोर मांडू. शेवटी निर्णय घेणं हे श्रेष्ठींच्या हाती आहे. जो काही निर्णय होईल तो आम्ही गोव्यातल्या सत्ताधारी आघाडीमधल्या घटक पक्षांना कळवू," असं श्रीपाद नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे.
3. '...हा तर सनातनवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न'
"पुणे पोलिसांनी डाव्या विचारांच्या ज्यांना अटक केली, त्यापैकी अनेकांना मी ओळखतो. त्यांची कोणतीही विचारसरणी असली तरी ते नक्षलवादी नक्कीच नाहीत, याची मला खात्री आहे," असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ज्यांना अटक झाली त्यांच्या घरी जाऊन मी सारे तपशील समजावून घेणार आहे, असंही पवार यांनी म्हटलं आहे.
"कर्नाटक आणि महाराष्ट्रात सनातन संस्थेच्या काही सदस्यांना अटक झाल्यानंतर जनतेचं लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं बहुदा हे अटकसत्र केलं असावं," असंही ते म्हणाले आहेत.
4. सोशल मीडियामुळे लिंचिंगच्या घटना - सरकारी अहवाल
मॉब लिंचिंगच्या घटना या सोशल मीडियावर पसरवल्या जाणाऱ्या आक्षेपार्ह मजकुरामुळे होत आहे, असं सरकारी सचिवांच्या समितीनं गृह मंत्रालयाला सांगितलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
"सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर हा लहान मुलं, महिला आणि अल्पसंख्याकांसाठी असुरक्षित आहे आणि पोलिसांनी सायबरविश्वातील आपलं स्थान अधिक बळकट करायला हवं," असं या अहवालात नमुद करण्यात आलं आहे.
या समितीचा अहवाल बुधवारी गृह मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे.
या अहवालावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह अंतिम निर्णय घेतील आणि त्यासंबंधीच्या सुधारणांविषयी पंतप्रधानांशी बोलतील, असं बातमीत म्हटलं आहे.
5. आंबेनळी अपघात : प्रकाश सावंत-देसाई सक्तीच्या रजेवर
आंबेनळी घाटात बस दुर्घटनेत वाचलेले अधिकारी प्रकाश सावंत-देसाई यांच्याविरोधात मृतांचे नातेवाईक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी दापोली कोकण कृषी विद्यापीठावर मोर्चा काढला होता. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

प्रकाश सावंत देसाई यांची नार्को टेस्ट करावी आणि सीआयडी चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. चौकशी सुरू होईपर्यंत प्रकाश सावंत यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे.
28 जुलैच्या सकाळी साडेदहाच्या सुमारास आंबेनळी घाटात दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला. यावेळी बसमधील 30 जणांचा मृत्यू झाला होता.
या घटनेत प्रकाश सावंत-देसाई हे कृषी अधिकारी वाचले आणि आता त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















