#5मोठ्याबातम्या : 'सर्जिकल स्ट्राइक डे' साजरा करण्याचे विद्यापीठांना निर्देश

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. 'सर्जिकल स्ट्राइक डे' साजरा करण्याचे विद्यापीठांना निर्देश
विद्यापीठ अनुदान आयोगानं (यूजीसी) देशभरातली विद्यापीठं आणि उच्च शिक्षण संस्थांना 29 सप्टेंबर हा दिवस 'सर्जिकल स्ट्राइक दिन' म्हणून पाळण्याचे आदेश दिले आहेत. लोकमतनं ही बातमी दिली आहे.
तसंच या दिवशी जवानांच्या बलिदानाबाबत माजी सैनिकांचं संवाद सत्र, विशेष परेड, प्रदर्शनांचं आयोजन तसंच सशस्त्र दलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना शुभेच्छापत्र पाठवण्यात यावीत, असंही यूजीसीनं आदेशात म्हटलं आहे.
29 सप्टेंबर 2016ला भारत-पाकिस्तान सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपलीकडे जाऊन दहशतवाद्यांच्या सात तळांवर हल्ले करत सर्जिकल स्ट्राइक करण्यात आलं होतं.
भारतीय जवानांच्या या यशाची आठवण म्हणून विद्यापीठांत हा दिवस साजरा करण्याच्या सूचना विद्यापीठांना देण्यात आल्या आहेत.
2. अनधिकृत बांधकाम केल्यास लोकप्रतिनिधीचं सदस्यत्व रद्द
ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकांच्या कुटुंबातील सदस्यानं अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण केल्यास त्यांचं सदस्यत्व रद्द होणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं हा निर्णय दिला आहे. झी 24 तास च्या वेबसाईटनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
नगरसेवकाच्या मुलांनी किंवा वडिलांनी अनधिकृत बांधकाम केलं तरी त्यांचं नगरसेवक पद रद्द होणार आहे. यापूर्वी केवळ नगरसेवकालाच हा नियम लागू होता. यात नगरसेवकाच्या कुटुंबीयांचा समावेश नव्हता.
मात्र आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार ग्रामपंचायत सदस्य किंवा नगरसेवकाच्या कुटुंबातल्या नातेवाईकांचाही समावेश झाला आहे.
3. विराट कोहलीला 'राजीव गांधी खेलरत्न' तर राही सरनोबतला अर्जुन पुरस्कार
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं यंदाचा 'राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार' जाहीर केला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
खेलरत्न हा देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मानधाना, एशियन गेम्समधील सुवर्णपदक विजेती नेमबाज राही सरनोबत, थाळीफेकपटू नीरज चोप्रा यांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे.
दादा चौगुले यांना कुस्ती प्रशिक्षक म्हणून ध्यानचंद पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 25 सप्टेंबरला या पुरस्कारांचं वितरण होणार आहे.
4. विदर्भ-मराठवाड्यात दोन दिवस पावसाचा अंदाज
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे 21 सप्टेंबरला महाराष्ट्रात पाउस पडेल असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. दिव्य मराठीनं ही बातमी दिली आहे.
विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागात 21 आणि 22 सप्टेंबर या दोन दिवशी पाऊस पडेल, असं हवामान तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, हिंगोली, परभणी आणि जालना जिल्ह्यांसह आसपासच्या भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या या स्थितीमुळे नदी-नाल्यांना पूर येण्यासारखी स्थिती उद्भवू शकते, पुरामुळे काही गावांचा संपर्कदेखील तुटू शकतो, असं सांगण्यात आलं आहे.
म्हणून नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्या लोकांनी सावध राहावं, असा इशारा स्थानिक प्रशासनानं दिला आहे.
उर्वरित विदर्भ, मराठवाडा, मध्य-महाराष्ट्र आणि खान्देशात हलका ते मध्यम स्वरूपाच्या पाऊस पडेल. मुंबई आणि कोकणातदेखील या दरम्यान पावसाच्या काही सरी कोसळतील.
5. लैंगिक गुन्हेगारांचा ऑनलाईन डेटाबेस
लैंगिक गुन्हेगारांची सविस्तर माहिती असणारा डेटाबेस ( National Database on Sexual Offenders) सरकारनं गुरुवारी लाँच केला आहे. हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
या डेटाबेसमध्ये गुन्हेगाराचं नाव, पत्ता, फोटो आणि फिंगरप्रिटंचा समावेश असणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बलात्कार, सामूहिक बलात्कार, Protection of Children from Sexual Offences Act अंतर्गत केले गुन्हे आणि पाळत ठेवण्यात दोषी ठरलेल्या व्यक्तींचा यात समावेश असणार आहे.
या डेबाटेसमुळे व्यक्तींच्या प्रायव्हसीचं उल्लंघन होणार नाही, असंही सरकारनं म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















