#5मोठ्याबातम्या : नरेंद्र मोदी, इमॅन्युअल मॅक्रॉन यांना Champions of the Earth पुरस्कार

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया
1. नरेंद्र मोदी यांना Champions of the Earth पुरस्कार
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांची यंदाच्या Champions of the Earth या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.
Champions of the Earth हा संयुक्त राष्ट्रांतर्फे दिला जाणारा सर्वांत मोठा पर्यावरणीय पुरस्कार आहे. पॉलिसी लीडरशिप या प्रवर्गाअंतर्गत या दोघांची निवड करण्यात आली आहे.
International Solar Alliance (ISA) साठी केलेलं काम आणि पर्यावरणासाठी हाती घेतलेले विविध प्रकल्प यासाठी या दोघांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
2015मध्ये भारत आणि फ्रान्स यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान परिषदेत एकत्रितरीत्या ISA मोहिमेला सुरुवात केली होती. जगभरात सौरउर्जेचा प्रचार आणि प्रसार करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे. दिल्लीजवळच्या गुडगावमध्ये ISAचं मुख्यालय आहे.
त्याबरोबरच कोची आंतरराष्ट्रीय विमानतळाला शाश्वत ऊर्जेच्या वापरासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारं हे विमानतळ उत्तम उद्योग करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं उदाहरण आहे, असं संयुक्त राष्ट्राने हा पुरस्कार जाहीर करताना म्हटलं.
याशिवाय, अगदी मटणासारखा दिसणारा आणि चवीलाही तसाच लागणारा पण शुद्ध शाकाहारी असा पदार्थ बनवणारे 'इंपॉसिबल बर्गर्स' आणि 'बियाँड मीट' या कंपन्यांनाही हा पुरस्कार संयुक्तरीत्या जाहीर करण्यात आला आहे. नेमका कसा आहे हा पदार्थ? वाचा इथे
2. आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण
उभ्या पिकांच्या शेतात तिची शेळी गेल्यामुळे आदिवासी समाजातील एका महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
अहमदनगर जिल्हयातल्या श्रीगोंदा तालुक्यातील भानगाव येथे 15 दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

"आमच्या शेतात शेळी गेल्यानं शेतमालक जयसिंग वागस्कर, संतोष वागस्कर, मनोहर वागस्कर आणि एक अनोळखी व्यक्ती यांनी मला आणि पतीला लाकडी दांडक्याने मारहाण केली आणि जातीवाचक शिवीगाळ दिली. तसंच अंगावरील कपडे ओढले," अशी तक्रार या महिलेनं पोलिस स्टेशनमध्ये केली होती.
"महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला होता. त्यात विवस्त्र करून मारहाण करत व्हिडिओ काढल्याचं म्हटलं नव्हतं. आता हा मुद्दा समोर आला आहे," अशी माहिती पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांनी दिल्याचं बातमीत म्हटलं आहे.
3. सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज आता 'लाइव्ह'
सुप्रीम कोर्टातील कामकाजाचं थेट प्रक्षेपण आता सर्वांना पाहता येणार आहे. बुधवारी त्यासंदर्भातील परवानगी कोर्टानं दिल्याचं वृत्त सर्वच माध्यमांनी दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"थेट प्रक्षेपणामुळे न्यायालयाच्या कामकाजात पारदर्शकता येईल, लोकहिताच्या दृष्टीनं ते महत्त्वाचं आहे," असं न्यायालयानं यावेळी नमूद केल्याचं सकाळच्या बातमीत म्हटलं आहे.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. अजय खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
"न्यायालयीन कामकाजाच्या थेट प्रेक्षपणाची सुरुवात सर्वोच्च न्यायालयापासूनच होणार आहे आणि त्यासाठी काही नियमांचं पालन करावं लागणार आहे. या थेट प्रेक्षपणासाठी न्यायिक यंत्रणा जबाबदार असणार आहे," असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.
4. वायुदलाच्या उपप्रमुखाकडून चुकून स्वत:वरच गोळीबार
भारतीय वायुदलाचे उपप्रमुख शिरीष बबन देव यांनी चुकून स्वत:च्याच मांडीवर गोळी झाडल्याचं समोर आलं आहे. NDTV या वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली आहे.
या घटनेनंतर दिल्लीतल्या RR Hospitalमध्ये देव यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आली आहे आणि त्यांच्या मांडीचं हाड बसवण्यात आलं आहे, असं बातमीत म्हटलं आहे.
जुलै महिन्यात वायुदलाचे उपप्रमुख म्हणून देव यांची नियुक्ती झाली होती.
5. FTIIच्या संचालकपदी अनुप जलोटा
Film and Television Institute of India (FTII)च्या संचालकपदी गझल आणि भजन गायक अनुप जलोटा यांची नियुक्ती झाली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सुचनेनुसार जलोटा यांची नियुक्ती करण्यात आल्याची बातमी लोकसत्तानं दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
यासोबतच FTII सोसायटीच्या सदस्यपदी अभिनेत्री कंगना रणौत, दिव्या दत्ता, ज्येष्ठ अभिनेते डॅनी डॅन्झोप्पा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
FTIIच्या अध्यक्षपदी अनुपम खेर यांची नियक्ती झाल्यानंतर 11 महिन्यांनी या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















