#5मोठ्याबातम्या : पोलिओच्या 1.5लाख लसींत टाईप 2चा व्हायरस : कंपनीचा अधिकारी अटकेत

फोटो स्रोत, Getty Images
विविध वृत्तपत्र आणि वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे:
1)पोलिओच्या 1.5लाख लसींमध्ये टाईप 2चा व्हायरस
पोलिओच्या 1.5लाख लसींमध्ये पोलिओचा टाईप 2 प्रकारचा व्हायरस आढळून आला आहे. यामुळे 'पोलिओ मुक्त भारत' संकटात असल्याची बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे. या लसी गाझियाबादमधील 'बायोमेड' कंपनीत तयार करण्यात आल्या आहेत. एप्रिल 2016नंतर जन्मलेल्या बाळांना या लसी देण्यात आल्या आहेत. विशेषत: उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि तेलंगणा या राज्यांत या लसी देण्यात आल्या होत्या. या घटनेनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि जागतिक आरोग्य संघटनेने दक्षतेचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात चौकशीसाठी केंद्रीय मंत्रायलयाने 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. तर 'बायोमेड'च्या व्यवस्थापकीय संचालकांना अटक करण्यात आली असून 4 संचालक फरार आहेत.
भारत आणि जगभरातच पोलिओच्या टाईप 2 प्रकारचा व्हायरस नष्ट करण्यात आला होता.
पूर्वी सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या पोलिओच्या लसींमध्ये 1, 2 आणि 3 प्रकारचे व्हायरस असायचे. 2016 नंतर यातून टाइप-2चा व्हायरस हटवण्यात आला. त्यानंतर तिन्ही प्रकारचे व्हायरस असलेल्या सर्व लसी 2016ला नष्ट करण्यात येऊन फक्त टाईप 1 आणि टाईप 3चे व्हायरस असलेल्य लसी ठेवण्यात आल्या. आता ज्या मुलांना दूषित लसी दिल्या गेल्या आहेत, त्यांच्या विष्ठेतून, सांडपाणी आणि पाण्यातून हा टाईप 2चा व्हायरस पसरू शकतो, त्यातून पुन्हा एकदा पोलिओचा धोका उभा राहू शकतो, असं या बातमीत म्हटलं आहे.
2) भाजप-शिवसेना एकत्र लढणार - चंद्रकांत पाटील
भाजप आणि शिवसेना आगामी निवडणुका एकत्र लढवणार आहेत. हिंमत असेल तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुका स्वतंत्र लढवून दाखवाव्यात, असे प्रतिपादन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ही बातमी सरकारनामाने दिली आहे.
खटाव येथील लक्ष्मणराव इनामदार जन्मशताब्दी कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार संजय पाटील आदी उपस्थित होते. कार्यक्रमात महाजन यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली, असं या बातमीत म्हटलं आहे.
3) 'पाकिस्तानचे हेलिकॉप्टर भारताच्या हवाई हद्दीत'
पाकिस्तानच्या हेलिकॉप्टरने भारताच्या हवाई हद्दीत प्रवेश केला होता, अशी बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पुंच इथं हा प्रकार घडला. भारतीय लष्कराने गोळीबार केल्यानंतर हे हेलिकॉप्टर परत फिरले, असं या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, EPA
पाक प्रशासित काश्मीरचे पंतप्रधान राजा फारूक हैदर खान या हेलिकॉप्टरमध्ये होते, असं ही बातमीत म्हटलं आहे. "हे हेलिकॉप्टर नागरी वापराचे होते. आमच्यावर गोळीबार झाला तेव्हा आम्ही आमच्या हद्दीतच होतो," असा खुलास खान यांच्या कार्यालयाने केल्याचं या बातमीत म्हटलं आहे.
4) तर बलात्कार प्रकरणात पीडितेवरही गुन्हा
''बलात्कार प्रकरणात पीडित महिलेकडून आरोपीला वाचविण्याचा प्रयत्न झाला आणि त्यासाठी जबाब बदलला तर संबंधित महिलेवरही खटला चालवण्यात येईल'', असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याची बातमी सकाळने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आरोपीविरोधात आवश्यक पुरावे असूनही पीडित व्यक्ती आपला जबाब बदलून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे दिसल्यास त्यानुसार ही कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी अशा प्रकरणात आरोपीकडून तडजोडीचा प्रयत्न केला जात असल्याचं समोर आलं आहे. एका बलात्कार प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून यावर मत नोंदवण्यात आलं आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.
5) पेट्रोल दरांनी शतक गाठल्यास पेट्रोल पंप बंद?
इंधनाचे दर प्रति लिटर १०० रुपयांपर्यंत पोहोचले तर, पेट्रोल पंपावरील 'डिस्पेन्सिंग युनिट' अर्थात 'पेट्रोल मीटर' काम करण्यास असमर्थ ठरण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्र टाइम्सने हे वृत्त दिलं आहे.
सध्या देशभरातील पेट्रोल पंपावर कार्यरत 'डिस्पेन्सिंग युनिट'ची केवळ दोन आकड्यांपर्यंतच काम करण्याची क्षमता आहे. त्यामुळे सध्या अस्तित्वात असणारी यंत्रणा जास्तीत जास्त ९९.९९ रुपयांपर्यंतचं इंधन देऊ शकते. त्यामुळे इंधनाच्या किंमतींनी शंभरी गाठली तर, 'डिस्पेन्सिंग युनिट'मध्ये ०.०० रुपये अशी किंमत दिसण्यास सुरुवात होईल.

फोटो स्रोत, MAKRAND SAWANT
"इंधनाचे दर तीन आकडी होतील असा कोणी विचारही केला नव्हता. आता मात्र कंपन्यांना जाग येत आहे. याचा फटका सामान्य नागरिकांना आणि वितरकांना बसण्याची शक्यता आहे".असं 'ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन'चे अध्यक्ष एम. प्रभाकर रेड्डी म्हणाले.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















