#5मोठ्याबातम्या : मराठा समाजाला असं आरक्षण द्यायचंय जे कोर्टात अडकणार नाही - चंद्रकात पाटील
आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :

1. मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचंय-चंद्रकात पाटील
मराठा समाजाला टिकणारं आरक्षण द्यायचं, असून कोर्टात अडकणारं आरक्षण नको, असं महाराष्ट्राचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. 'एबीपी माझा'ने ही बातमी दिली आहे.
आरक्षणाची ही मागणी आताची नसून, 1968 पासून आरक्षणाची चळवळ सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात समिती स्थापन केली असून, सोयी सुविधा देण्याबाबत आढावा घेतला जात आहे, असंही ते पुढे म्हणाले.
नाशिकमध्ये डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृहाच्या इमारतीचं उद्घाटनावेळी ते बोलत होते. "मराठा समाजाच्या संस्था असून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना फीमध्ये 50 टक्के सवलत का दिली नाही? इतकी वर्षं सत्तेत असूनही आरक्षण का दिलं गेलं नाही," असा सवाल पाटील यांनी केला.
"गेल्या चार वर्षात 20 हजार नोकऱ्या निर्माण झाल्या. त्यातील 16 टक्के मराठा समाजाला मिळणार आहेत. मात्र तेवढ्यात सर्व समाजाला काही मिळणार आहे का?" असं पाटील म्हणाले.
व्यवसाय केला तर रोजगारनिर्मिती होते. व्यवसायासाठी बँका कर्ज देतील. विद्यार्थ्यांनी कर्ज थकवलं तर सरकार 75 टक्के कर्ज फेडेल. ज्या बँका कर्ज देणार नाहीत त्या बँकेच्या बाहेर मराठा समाजातील तरुणांनी आंदोलन करावं, असं आवाहनही पाटील यांनी केलं.
मराठा समाजाला आरक्षण हे मतं मिळवण्यासाठी नसून ती आमची बांधिलकी आहे, असं सांगायला पाटील विसरले नाहीत.
2. हरियाणातील मशीद लष्कर-ए-तय्यबाच्या आशीर्वादाने?
राजधानी दिल्लीजवळच्या हरियाणामधल्या पलवलमध्ये एक मशीद लष्कर-ए-तय्यबाच्या कथित आशीर्वादाने बांधण्यात आली, अशी माहिती नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी अर्थात NIAने दिली आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने याबाबत बातमी दिली आहे.
लष्कर-ए-तय्यबा या दहशतवादी गटाचा म्होरक्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि पाकिस्तानातील कट्टरतावादी नेता हाफीझ सईद आहे.
पलवलमधील खुलफा-ए-रशीदीन या मशिदीची 3 ऑक्टोबर रोजी NIAने तपासणी केली होती. मशिदीच्या इमामासह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. हफीझ सईदच्या जमात उल दावा पक्षातर्फे स्थापना करण्यात आलेल्या फलाह-ए-इन्सानियत या स्वयंसेवी संस्थेकडून कथित आर्थिक मदत घेतल्याप्रकरणी सलमान, मोहम्मद सलीम आणि साज्जद अब्दुल वाणी यांना 26 सप्टेंबरला अटक करण्यात आली, असं NIAने सांगितलं.
3. अलाहाबादचं नाव होणार प्रयागराज
गंगा, यमुना आणि सरस्वती अशा तीन नद्यांच्या संगमावर वसलेल्या अलाहाबाद शहराचं नाव बदलून आता प्रयागराज होणार आहे, अशी घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. 'द हिंदू'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.
दसऱ्यापूर्वी नामांतराची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 1,553 पूर्वी या शहराचं नाव प्रयाग होतं, जिथे आजही दर 12 वर्षांनी महाकुंभाचं आयोजन होतं.

फोटो स्रोत, Getty Images
अकबराने या शहराचं नाव अलाहाबाद ठेवलं होतं. अलाहाबाद म्हणजे ईश्वराने वसवलेलं गाव. तेव्हा अलाह या शब्दाचा अर्थ अकबराने सुरू केलेल्या दानधर्माशी संबंधित आहे.
मायावती सत्तेत असताना उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांचं नामांतर झालं. नोएडाचं गौतमबुद्ध नगर झालं. भदोईचं संत रविदास नगर झालं, फैजाबाद जिल्ह्याचं विभाजन होऊन एक नवा जिल्हा आंबेडकर नगर तयार झाला तर खलिलाबादचं संत कबीर नगर असं नाव ठेवण्यात आलं.
योगींच्या राज्यातही मुघलसराय शहराचं नामकरण पंडित दीनदयाळ उपाध्याय असं करण्यात आलं. तर देशाची राजधानी दिल्लीतल्या औरंगझेब रोडचं नाव बदलून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मार्ग असं करण्यात आलं आहे.
4. मनोहर पर्रिकर गोव्यात परतले
स्वादुपिंडाच्या आजारावर उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना रविवारी दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आलं. त्यानंतर ते गोव्यात परतले आहेत, मात्र त्यांच्या प्रकृतीत सुधारणा नसल्याचे सांगण्यात येत आहे. 'लोकसत्ता'ने याबाबत बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
पर्रिकर यांना 15 सप्टेंबरला दिल्लीतल्या एम्समध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यापूर्वी ते काही काळ अमेरिकेत उपचार घेत होते. रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पर्रिकर यांना हवाई रुग्णवाहिकेने पणजीत आणण्यात आलं.
एम्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पर्रीकर यांची प्रकृती खालावल्यामुळे रविवारी सकाळी त्यांना अतिदक्षता विभागात काही वेळासाठी हलवण्यात आलं. मात्र नंतर रुग्णालय प्रशासनाने त्यांना घरी सोडण्याचा निर्णय घेतला.
5. पृथ्वी शॉचा विक्रम - पदार्पणातच मॅन ऑफ द सीरिज
अठराव्या वर्षी टेस्ट क्रिकेटमध्ये शतकी पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉ याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारावरही नाव कोरलं. करिअरमधल्या पहिल्याच मालिकेत मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारावर नाव कोरणारा पृथ्वी केवळ दहावा क्रिकेटपटू आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
याआधी भारताचे सौरव गांगुली, रविचंद्रन अश्विन, रोहित शर्मा, साऊथ आफ्रिकेचे जॅक रुडॉल्फ आणि व्हरनॉन फिलँडर, ऑस्ट्रेलियाचे स्टुअर्ट क्लार्क आणि जेम्स पॅटिन्सन, श्रीलंकेच्या अजंथा मेंडिस आणि बांगलादेशच्या मेहदी हसन यांनी पहिल्याच मालिकेत मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारावर नाव कोरलं होतं.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन सामन्यात पृथ्वीने 118.5च्या सरासरीने 237 धावा केल्या. त्यात पहिल्या सामन्यात 134, तर दुसऱ्या सामन्यात 70 आणि 33 नाबाद अशा खेळींचा समावेश आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















