#5मोठ्याबातम्या : भित्रेपणा लपवण्यासाठी शिवसेनेनं फक्त अग्रलेखच लिहावेत - असदुद्दीन ओवेसी

ओवेसी

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. भित्रेपणा लपवण्यासाठी शिवसेनेनं फक्त अग्रलेखच लिहावेत : असदुद्दीन ओवेसी

"शिवसेना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरून आहे. हा भित्रेपणा लपवण्यासाठी मग शिवसेनेचे नेते फक्त वृत्तपत्रात अग्रलेख लिहित बसतात," असं वक्तव्य 'एमआयएम'चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. सकाळनं ही बातमी दिली आहे.

"शिवसेना मोदी यांना घाबरते. त्यामुळे केवळ अग्रलेखच लिहिले जातात. आता अग्रलेख लिहिणे सोडून त्यांनी मोदी सरकार आणि फडणवीस सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा. माझे पूर्वजही भारतीयच होते, हे मी सिद्ध करू शकतो," असं ओवेसी यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी ओवेसी यांच्यावर टीका केली होती.

"ओवेसी यांनी स्वत:ला हैदराबादपुरतेच मर्यादित ठेवावं. राम मंदिर अयोध्येमध्ये होणार आहे; हैदराबाद, पाकिस्तान किंवा इराणमध्ये नाही! ओवेसी यांच्यासारखे नेते राजकारणाच्या नावाखाली मुस्लीम समुदायाला चुकीच्या दिशेने नेत आहेत. भविष्यात त्यांना याचा फटका बसेल," असे विधान राऊत यांनी केले होते.

राम मंदिराच्या मुद्यावरून शिवसेना नेते संजय राऊत आणि ओवेसी यांच्यात वाकयुद्ध रंगलं आहे.

2. जलयुक्त शिवारचा बोजवारा

गेल्या 4 वर्षांत जलयुक्त शिवार योजनेवर हजारो कोटी रुपये खर्च करुनही भूजलपातळी वाढण्याऐवजी 14 हजार गावांतील भूजल पातळीत एक मीटरनं घट झाल्याची बाब उघडकीस आली आहे. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

जलयुक्त शिवार

फोटो स्रोत, CMO MAHARASHTRA

जलयुक्त शिवार योजनेवर आतापर्यंत 7 हजार 459 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

जलसंपदा विभागांतर्गत येणाऱ्या भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालानुसार, गेल्या 5 वर्षांची तुलना केल्यास राज्यातील एकूण 353 तालुक्यांपैकी 252 तालुक्यांमधील 13 हजार 984 गावांमधील भूजल पातळीमध्ये एक मीटरपेक्षा जास्त घट झाल्याचं आढळलं आहे.

3. जम्मू नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपची मुसंडी

जम्मू पालिकेच्या निवडणुकीत 75 जागांपैकी 43 जागांवर भाजपनं विजय मिळवला आहे. यापूर्वी भाजपचा 25 जागांवर ताबा होता. NDTV इंडिया या वृत्तवाहिनीनं ही बातमी दिली आहे.

भाजप

फोटो स्रोत, GETTY IMAGES/DIBYANGSHU SARKAR

फोटो कॅप्शन, प्रतिकात्मक

2005मध्ये काँग्रेसकडे 26 जागा होत्या पण यंदा मात्र पक्षाला 14 जागांवर विजय मिळवता आला आहे.

नॅशनल कॉन्फरन्स, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, माकपा आणि बसपा यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.

जम्मूमधील ही निवडणूक 13 वर्षांनी होत आहे.

4. साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान

साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळ्यादरम्यान साईंच्या झोळीत 5 कोटी 97 लाखांचं दान प्राप्त झालं आहे. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

यावर्षी समाधी शताब्दीचं वर्षं असल्यानं 3 लाखांहून अधिक भक्तांनी साईंच्या समाधीचं दर्शन घेतलं आहे. 16 ते 19 ऑक्टोबरदरम्यान हा उत्सव साजरा करण्यात आला.

साईबाबा

फोटो स्रोत, www.sai.org.in/

भाविकांनी दानपेटीत 2 कोटी 52 लाख रुपये, ऑनलाईन पद्धतीनं 1 कोटी 41 लाख रुपये, देणगी काऊंटरवर 1 कोटी 46 लाख रुपये तर 28 लाख रुपयांचं सोनं आणि चांदी अर्पण केली आहे.

याशिवाय 21 देशांचे 25 लाख रुपये किंमतीचं परकीय चलनंही दानपेटीत मिळाले आहे.

5. आशिया चॅम्पियन ट्रॉफी : भारताचा पाकिस्तानवर 3-1नं विजय

मस्कत येथे सुरू असलेल्या आशियाई पुरुष चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारतानं पाकिस्तानवर 3-1नं विजय मिळवला आहे. टाइम्स ऑफ इंडियानं ही बातमी दिली आहे.

या ट्रॉफीमधील हा भारताचा सलग दुसरा विजय आहे.

या विजयात मनप्रीत सिंग, मनदीप सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी मोलाची भूमिका निभावली आहे.

भारताचा पुढील सामना जपानसोबत होणार आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)