#5 मोठ्या बातम्या : पुढच्या वर्षी सत्ता परिवर्तन, मोदींची खुर्ची जाणार- शरद पवार

शरद पवार, नरेंद्र मोदी, भाजप, काँग्रेस, निवडणुका

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, शरद पवार
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. 2019 मध्ये पंतप्रधान मोदींची खुर्ची जाणार-शरद पवार

2019 निवडणुकांमध्ये राज्यात आणि केंद्रात सत्ता परिवर्तन होणार असून, ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांच्या हाती राहणार नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं. 2019 मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळेल असं वाटत नाही असं सूचक विधानही त्यांनी केलं. नरेंद्र मोदींना समर्थन देणार नाही असंही स्पष्ट केलं. एका खाजगी वाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना पवार यांनी हे उद्गार काढले. 'लोकसत्ता'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

2004मध्ये ज्या प्रकारे कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं तीच परिस्थिती 2019मध्येही असणार आहे. नरेंद्र मोदींचं व्यक्तिमत्व अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे नाही. देशात बदल होत असून, आगामी निवडणुकीत देशातील जनतेला बदल पाहायचा आहे. देशात महायुतीचं सरकार येईल, अशी शक्यता आहे. सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्यात माझी महत्त्वाची भूमिका असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची गरज असून, राज्यातही महायुती झाली पाहिजे, असं ते म्हणाले.

रफालच्या किमतीवरून लोकांच्या मनात संशय आहे. हा संवेदनशील विषय असल्याने या विषयावर अधिक बोलू शकत नाही. मात्र किमतीत इतका फरक पडू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. राहुल गांधी रफाल करारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत असल्याच्या प्रश्नावर त्यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी, 'राहुल गांधींचा संपर्क जास्त चांगला असेल,' असं सांगत या प्रश्नाला बगल दिली.

2. वंदे मातरम म्हणावेच लागेल- शिवसेना

वंदे मातरम म्हणणे हे इस्लामविरोधी आहे, असं ओवेसी यांचं म्हणणं आहे. ओवेसी यांच्या मताला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नातवाने आंधळ्यासारखा पाठिंबा द्यावा हे क्लेशदायक आहे, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.

प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे समाजाचे मालक नाहीत. वंदे मातरम म्हणजे मातृभूमीला वंदन. लाखो मुसलमान ओवेसींचे राजकारण ठोकरून लावतील त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू काय करणार? अर्थात वंदे मातरमला आंधळा विरोध करणाऱ्यांच्या डोक्यात हा प्रकाश पडेल का हा प्रश्नच आहे. या देशात वंदे मातरम म्हणावेच लागेल, अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.

एमआयएम, भारिप

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एमआयएमचे खासदार असाउद्दीन ओवेसी आणि भारिपचे प्रकाश आंबेडकर

3. रात्री 10 नंतर फटाके फोडणारच, तुरुंगात गेलो तरी चालेल-भाजप खासदार

दिवाळीत पूजा झाल्यावरच फटाके फोडणार. सणासुदीत वेळेची मर्यादा घालता येणार नाही. हिंदू परंपरेत आम्ही कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही अशा शब्दांत भाजप खासदार चिंतामणी मालवीय यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा विरोध केला. हिंदू परंपरेचं पालन केल्याने मला तुरुंगात जावं लागलं तरी चालेल असंही त्यांनी म्हटलं आहे. 'नेटवर्क 18' ही बातमी दिली आहे. हे.

"दिवाळीचा सण परंपरेनुसार साजरा करणार आणि लक्ष्मीपूजन केल्यानंतर रात्री 10 नंतर फटाके फोडणार. मुघलांच्या काळातही असे निर्बंध नव्हते. हा निर्णय मला मान्य नाही," असं त्यांनी म्हटलं आहे.

4. कवी दिनकर मनवर यांचा माफीनामा

'पाणी कसं अस्तं,' या कवितेवरून वादंग निर्माण झाल्यानंतर ही कविता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला. दरम्यान या कवितेचे कवी दिनकर मनवर यांनी राज्य महिला आयोगाची माफी मागितली आहे. 'सकाळ'ने यासंदर्भात बातमी दिली आहे. याच कवितेवरून वादग्रस्त लेखन करणारे औरंगाबादचे पत्रकार सुरेश पाटील यांनीही आयोगामार्फत समस्त महिलांची माफी मागितली आहे. 'पाणी कसं अस्तं,' या कवितेत मनवर यांनी स्त्रियांबाबत जातीवाचक टिप्पणी केली असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याविरुद्ध काही संघटनांनी आयोगाकडे तक्रार केली होती. त्याआधारे आयोगाने कवी मनवर, मुंबई विद्यापीठ आणि सुरेश पाटील यांना नोटिसा बजावल्या होत्या.

5. सेल्फी काढण्याचं हेच वय-देवेंद्र फडणवीस

सेल्फी काढण्याची हौस सर्वांनाच आहे. मात्र केवळ हलक्या विचारांची माणसं माझ्या पत्नीला ट्रोल करतात. माझी पत्नी बांधील नाही, तिला स्वातंत्र्य आहे. ती तिचं काम करते. तुम्ही 38-40 वर्षांच्या तरुण वयात करता, ते 56 वर्षांच्या वयात करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 'लोकमत'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

भाजप, महाराष्ट्र

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आंग्रिया कुझवर काढलेला सेल्फी चांगलाच गाजला होता.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)