तेज प्रताप आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाला लालूंचा विरोध : मुलांच्या संसारात पालकांची ढवळाढवळ?

नववधू

फोटो स्रोत, Education Images/getty

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र
    • Author, तुषार कुलकर्णी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

"मुलगी एकदा सासरी गेली की तिथून तिने तिरडीवरूनच बाहेर पडावं, अशा मानसिकतेमुळे मला खूप काही भोगावं लागलं. मुलाचा संसार हा आपला संसार आहे असं समजून ते माझ्या संसारात ढवळाढवळ करत राहिले आणि शेवटी मला घटस्फोट घ्यावा लागला," तीस वर्षांची स्वरा (नाव बदललं आहे) जड अंतःकरणानं सांगत होती.

लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेज प्रताप याने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. तेज प्रताप यांनी आपला निर्णय बदलावा यासाठी लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यांची समजूत काढली अशा बातम्या समोर आल्या आहेत. आहे.

वडिलांनी समजूत काढल्यानंतरही तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम आहात की तुम्ही तुमच्या वडिलांच्या आज्ञेविरोधात पाऊल उचलणार? असा प्रश्न आता तेज प्रताप यांना विचारला जातोय.

मी ऐश्वर्यासोबतच संसार करावा अशी माझ्या वडिलांची इच्छा आहे पण मला तसं वाटत नाही, असं तेज प्रताप यांनी स्पष्ट केलं आहे.

मुलाचा संसार मोडत असलेला पाहून लालू प्रसाद यादव यांनी समजुतीचे चार शब्द सांगणं योग्यच आहे. पण वडिलांचा निर्णय मान्य नसल्यामुळे तेज प्रताप यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे.

मुलांच्या इच्छेऐवजी ज्येष्ठांच्या इच्छेचा मान राखावा असा सूरही सोशल मीडियावर उमटत आहे.

दुसऱ्या बाजूला लालू प्रसाद यादव मुलांच्या जीवनात हस्तक्षेप करत आहेत अशी चर्चा देखील सोशल मीडियावर चर्चा होत आहे. पण हा खरंच हस्तक्षेप आहे का? की पालक म्हणून त्यांनी त्यांचं कर्तव्य बजावलं? हे जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने रिलेशनशिप काउन्सिलरशी चर्चा केली.

तेज प्रताप यादव आणि ऐश्वर्या

फोटो स्रोत, Hindustan Times/getty

फोटो कॅप्शन, तेज प्रताप यादव आणि त्यांची पत्नी ऐश्वर्या त्यांच्या विवाहासमारंभावेळी पाहुण्यांना अभिवादन करताना.

मुलांच्या संसारात आई-वडिलांचा हस्तक्षेप असावा का? असं विचारला असता, समुपदेशक हेमांगी म्हाप्रोळकर सांगतात, "जेव्हा पालक आपल्या मुलांना काही सांगतात तो हस्तक्षेप नसतो. ते देखील मुलांच्या जीवनाचा भाग आहेत. त्यामुळे त्याला हस्तक्षेप म्हणणं तितकं योग्य नाही. पण पालकांनी काही गोष्टींचं भान जरूर बाळगायला हवं."

"काही बाबतीत आई-वडिलांनी मुलांना प्रश्न विचारणं टाळावेत. जसं की त्यांचं लैंगिक जीवन कसं आहे? किंवा कुटुंब नियोजनाबाबतीत त्यांचे काय विचार आहेत."

घटस्फोट

"आपल्याकडे असं बऱ्याचदा होतं की लोक विचारतात की गुड न्यूज कधी देणार? या सामाजिक दबावामुळे पालकही सतत विचारतात की बाळ केव्हा होणार आहे. या गोष्टी पालकांनी खरंतर टाळाव्यात. पण कधीकधी सासरचे आणि माहेरचे लोक थोडाफार हस्तक्षेप करतात आणि त्याने नाती बिघडायला सुरुवात होते," म्हाप्रोळकर सांगतात.

लग्नानंतर सासरच्या मंडळीनी संसारात ढवळाढवळ केली आणि जेव्हा हस्तक्षेप करणं अपेक्षित होतं तेव्हा मात्र न केल्यामुळे वेगळं राहण्याची वेळ आली अशी देखील काही उदाहरणं आहेत त्यापैकी स्वरा एक आहे.

'मुलगा सुनेच्या मुठीत जाऊ नये असं त्यांना वाटत होतं'

"आमचं लग्न होऊन दोन महिने झाले असतील नसतील आणि माझी सासू आम्हाला थोडाही मोकळा वेळ देत नव्हती. आम्ही दोघं बाहेर फिरायला जाणार म्हटलं तरी त्यांना देखील यावसं वाटायचं.

"सुरुवातीला वाटलं की एकुलता एक मुलगा आहे म्हणून काळजीपोटी त्या असं वागत आहेत. पण नंतर कळलं की मुलगा सुनेच्या मुठीत जाऊ नये असं त्यांना वाटत असल्यामुळे त्या आम्हाला एकांत देत नव्हत्या.

"त्यांचा हस्तक्षेप वाढत गेला. मी ते सहन केलं पण नंतर मला कळलं माझ्या पतीचं अफेअरदेखील आहे. ही गोष्ट मी जेव्हा त्यांना सांगितली तेव्हा त्या म्हणाल्या, 'कसाही असला तरी तो तुझा नवरा आहे. तू त्याला जसा आहे तसं स्वीकारायलाच हवं'. म्हणजे या ठिकाणी त्यांनी हस्तक्षेप करून मुलाला समज द्यायला हवी तर ती त्यांनी दिला नाही," स्वरा सांगते.

दांपत्य

"पुढे पुढे तो विचित्र वागायला लागला. घरच्यांनी त्याला योग्य वेळी समज दिली नाही म्हणजेच आपल्या कृत्यांना घरच्यांचा पाठिंबा आहे असाच त्याचा समज झाला.

"मग तो त्याच्या मनाप्रमाणे वागायला लागला. वाटेल तेव्हा घरी येणं, वाटेल तेव्हा बाहेर जाणं सुरू झालं. त्याच्या वागण्याचा त्रास मला होऊ लागला. त्यावेळी सासरचे लोक मलाच टोमणे मारत होते. काही दिवसांनी सर्व ठीक होईल असं समजून मी सगळं सहन करत होते पण ज्याच्यासाठी मी सहन करत होतं तोच माझ्याकडे सतत दुर्लक्ष करायला लागला," स्वरा सांगते.

हे सगळं घडत असताना तुला तुझ्या आई-वडिलांच्या कानावर ही गोष्ट घालावी वाटली नाही का? असं विचारलं असता स्वरा सांगते, "मी त्यांना सांगितलं पण त्यांनी पण मला सहन करण्याचा सल्ला दिला. घटस्फोटामुळे नातेवाईकांमध्ये उगीच चर्चा होईल अशी भीती त्यांना वाटायची.

"मुलीने एकदा माप ओलांडलं की तिथून तिनं तिरडीवरूनच बाहेर पडावं, अशीच माहेरच्या आणि सासरच्या मंडळीची मानसिकता होती.

"शेवटी माझा निर्णय घेतला. मला घटस्फोट हवा आहे असं मी माझ्या सासरच्या मंडळींना सांगितलं. घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी माझी साधी विचारपूस केली नाही.

"कोर्ट कचेरीत एक वर्ष दोन वर्षं गेली. त्यावेळेस जर सामोपचाराने काही तोडगा निघत असेल तर तो स्वीकारायची देखील माझी तयारी होती. पण ते मात्र त्यांच्या जागेवरून हलले नाहीत."

नववधू

फोटो स्रोत, Education Images/getty images

"शेवटी आम्ही दोघं वेगळे झालो. मी स्वावलंबी आहे, माझा स्वतःचा व्यवसाय आहे. मला कुणाच्या आधाराची गरज नाही. मुलीनं सासरी गेल्यावर खरंच तिने तिरडीवरूनच बाहेर पडावं का? तिला तिचा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नाही का? रोज रोज मरण्यापेक्षा आणि आहे तो नवरा स्वीकारण्याऐवजी मी माझं वेगळं राहणं पसंत केलं," स्वरा सांगते.

हे टाळण्यासाठी काय करावं?

"ज्या मुलांचं आई-वडिलांशी सुरुवातीपासून पटतं त्यांना असं वाटतच नाही की आई-वडील ढवळाढवळ करत आहेत. म्हणजे लग्नापूर्वी आई-वडिलांशी आपलं कशाप्रकारचं होतं त्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत," समुपदेशक म्हाप्रोळकर सांगतात.

"बऱ्याचदा असं होतं की पालक त्यांच्या मुलांबदद्ल ओव्हर प्रोटेक्टिव्ह असतात. त्यामुळे देखील प्रश्न उद्भवू शकतात. सासू-सुनांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. मुख्य म्हणजे संवाद साधायला हवा. असं देखील होतं की प्रश्न साधा असू शकतो पण संवादाअभावी तो किचकट होतो."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)