रोहित शर्माचा झंझावात, भारताचा मालिका विजय - #5मोठ्याबातम्या

रोहित शर्मा

फोटो स्रोत, LAKRUWAN WANNIARACHCHI/AFP/Getty Image

फोटो कॅप्शन, रोहित शर्मा
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात :

1. रोहित शर्माचा झंझावात, भारताचा मालिका विजय

विंडीजविरुद्धचा दुसरा टी20 सामना भारताने 71 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली. भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाबाद 111 धावा करून भारताला 195 धावांपर्यंत मजल मारून दिली. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजच्या संघाची दाणादाण उडाली.

महाराष्ट्र टाइम्सच्या बातमीत म्हटल्याप्रमाणे, डॅरेन ब्राव्होने सर्वाधिक 23 धावा केल्या. विंडीजचा संघ केवळ 124 धावा करू शकला. विंडीजचे इतर फलंदाज चमक दाखवण्यात पुन्हा एकदा अपयशी ठरले. रोहितला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले.

टी20 सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके असा दुहेरी विक्रम रोहित शर्माच्या नावावर जमा झाला आहे.

2. 'नोटा'ला अधिक मते मिळाल्यास निवडणूक रद्द

ग्रामपंचायतींपासून महापालिकेपर्यंत कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उमेदवारांपेक्षा 'नोटा'ला (नन ऑफ द अबाव्ह- वरीलपैकी कुणीही नाही) जास्त मते मिळाली तर ती निवडणूक रद्द ठरविली जाईल, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने काढला आहे. या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ केली जाणार आहे. याबद्दलचं वृत्त लोकसत्तानं दिलं आहे.

मतदान

फोटो स्रोत, BIJU BORO/AFP/Getty Images

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणत्याही उमेदवारापेक्षा मतदारांनी 'नोटा'ला अधिक पसंती दिली असेल, तर त्या ठिकाणी नव्याने निवडणूक घेतली जाईल आणि उमेदवारी अर्ज भरण्यापासूनची संपूर्ण प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार आहे. अर्थात ही फेरनिवडणूक केवळ त्या प्रभाग, वॉर्ड वा गणापुरती मर्यादित असेल. मात्र, नोटा आणि कुठल्याही एका उमेदवारास समसमान मते मिळाली तर त्या उमेदवाराला विजयी घोषित करण्यात येणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मतदानात 'नोटा'ची सुरुवात नोव्हेंबर २०१३ पासून करण्यात आली होती.

3. अवैध दारु भरलेल्या वाहनाखाली पोलिसाला चिरडलं

चंद्रपूरमध्ये अवैध दारू भरलेल्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षकाला चिरडलं. उपचारादरम्यान पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किडेंचा मृत्यू झाला. ते नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते. ही बातमी ZEE २४ तासनं दिली आहे.

मंगळवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. छत्रपती किडे मौशी चोरगावजवळ गस्तीला गेले होते. एका वाहनात अवैध दारू भरली असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस या मार्गावर तैनात होते.

गस्तीवर असतानाच भरधाव आलेल्या वाहनानं त्यांना उडवलं. जखमी अवस्थेत उपनिरीक्ष किडे यांना ब्रम्हपुरी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. असं या बातमीत म्हटलं आहे.

4. 'माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा बालमृत्यूंकडे लक्ष द्या'

केंद्रीय महिला आणि बालविकासमंत्री मनेका गांधी यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी करण्याऐवजी त्यांनी कुपोषण आणि बालमृत्यूंचे प्रमाण कमी करण्याकडे लक्ष द्यावे, असा खोचक सल्ला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मनेका गांधी यांना दिला आहे. हे वृत्त सामनानं दिलं आहे.

सुधीर मुनगंटीवार

फोटो स्रोत, FACEBOOK/SUDHIR MUNGANTIWAR

अवनी वाघिणीच्या हत्येप्रकरणी मनेका गांधी यांनी रविवारी ट्विटरवरून मुनगंटीवारांवर हल्ला चढवला होता. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुनगंटीवार यांना पदावरून हटवावे अशी मागणी केली आहे. त्यानंतर मुनगंटीवार यांनी प्रथमच मनेका गांधी यांच्यावर पलटवार करत त्यांना खोचक सल्ला दिला आहे.

5. दुष्काळावर मात करण्यासाठी 7 हजार कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री

राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत. याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे. तो आजच केंद्राकडे पाठवीत असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होवू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली. लोकमतनं हे वृत्त दिलं आहे.

फडणवीस म्हणाले, "आतापर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली गेली नाहीत. आम्ही ऑक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर केला. आता मदतीचा प्रस्ताव पाठवत आहोत. डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल व जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल. पाणीटंचाई निवारणासाठीही आराखडे तयार झाले आहेत. यासाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणत्याही भागात अन्न-धान्याची टंचाई भासल्यास तेथे पुरवठ्यासाठी सरकारची तयारी पूर्ण झाली आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)