2019 लोकसभा निवडणुकांदरम्यान बीबीसी करणार रिअॅलिटी चेक - बीबीसी महासंचालक टोनी हॉल

बीबीसी, फेक न्यूज, रिअॅलिटी चेक
फोटो कॅप्शन, टोनी हॉल
Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

भारतात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. बीबीसी या निवडणुकांदरम्यान रिअलिटी चेक करणार आहे. तसं वचन आम्ही वाचकांना आणि प्रेक्षकांना दिलं आहे, असं बीबीसीचे महासंचालक टोनी हॉल यांनी सांगितलं.

फेक न्यूजबाबत केलेल्या संशोधनाचा उहापोह करण्यासाठी बीबीसीनं देशभरात सात ठिकाणी परिषदांचे आयोजन केलं होतं. या परिषदांना टोनी हॉल यांनी लंडनहून व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले.

"बीबीसीला ज्या गोष्टी विशेष ठरवतात, त्यापैकी ही एक आहे. वाचकांचा बीबीसीवर विश्वास आहे. हा विश्वास आम्हाला कायम राखायचा आहे. दिल्लीत आमच्या पत्रकारांनी या विश्वासाला सार्थ ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. फेक न्यूजसंदर्भात केलेल्या संशोधनातही हीच गोष्ट अधोरेखित झाली आहे. कल्लोळरुपी वातावरणात वाचकांना विश्वासार्ह बातम्या देऊ शकेल असं व्यासपीठ आम्ही होऊ इच्छित आहोत. पत्रकारिता विश्वासाठी फेक न्यूज ही सगळ्यांत मोठी समस्या आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी बातम्या देण्याची प्रक्रिया पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे," असं त्यांनी सांगितलं.

भारतात फेक न्यूजविरोधात बीबीसीने हाती घेतलेल्या मोहिमेची त्यांनी प्रशंसा केली.

ते म्हणाले, "फेक न्यूजबाबत भारतात बीबीसीने जे अभियान सुरू केले आहे, त्यामुळे या प्रकाराविषयी जागरुकता वाढते आहे. तरुण मंडळींना फेक न्यूज म्हणजे काय याबद्दल अधिक माहिती मिळत आहे. तरुण मंडळी आपल्या आईबाबांना, नातेवाईकांना आणि ओळखीत फेक न्यूजबद्दल ठोस असं काही सांगू शकतील. हे आपल्यासाठी आणि लोकशाहीसाठी महत्त्वाचं आहे."

तज्ज्ञ पत्रकारांची भूमिका निर्णायक

कार्यक्रमादरम्यान टोनी हॉल यांनी शाळकरी मुलांच्या फेक न्यूजसंदर्भातील प्रश्नांची उत्तरं दिली. लंडन तसंच वैश्विक पातळीवर बीबीसी, फेक न्यूजचा सामना कसा करते, असा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारला.

"पत्रकारांनी वेगवेगळ्या विषयांचं सखोल ज्ञान कमवावं अशी आमची अपेक्षा आहे. अर्थव्यवस्था, व्यापार, परिवहन, राजकारण तसंच अन्य विषयांची पत्रकारांना तपशीलवार माहिती हवी. अधिकारवाणीने त्यांना बोलता, लिहिता यायला हवं. या विषयांच्या अनुषंगाने कोणाशी बोलायला हवं, कुठून अधिकृत माहिती मिळवता येईल याची पत्रकारांना माहिती हवी. हे पत्रकारितेचं जुनं तत्व आहे. पण ते महत्त्वाचं आहे. जगात अनेकविध ठिकाणी असलेली प्रतिनिधींची उपस्थिती बीबीसीला वेगळं आणि विश्वासार्ह ठरवते," असं त्यांनी सांगितलं.

बीबीसी, फेक न्यूज, रिअॅलिटी चेक
फोटो कॅप्शन, टोनी हॉल व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधताना

लोकांना सत्य काय, असत्य काय हे सांगणं हेही पत्रकारांचं काम आहे. यासंदर्भात लंडनमध्ये रिअलिटी चेक नावाचा उपक्रम आम्ही हाती घेतला आहे. जगभरात अन्य ठिकाणी हा उपक्रम राबवण्याचा आमचा मानस आहे. एखादी व्यक्ती किंवा संस्था काही दावा करत असेल, तर त्यात तथ्य किती याची रिअलटी चेकद्वारे पडताळणी केली जाते.

यासंदर्भात त्यांनी एक उदाहरण दिलं. आफ्रिका आय कार्यक्रमाद्वारे कॅमेरूनमधल्या एका घटनेची वैधता तपासण्यात आली. कॅमेरूनच्या सैनिकांनी दोन ग्रामीण महिला आणि मुलांची गोळी मारून हत्या केली. कॅमेरून सरकारनं सुरुवातीला याचा इन्कार केला. मात्र सातत्याने माहितीवर काम करून त्या हत्या असल्याचं आम्ही सिद्ध केलं. कॅमेरूनच्या सैनिकांचा त्यात सहभाग असल्याचे पुरावे देखील आम्ही सादर केले. अशा प्रकारची पत्रकारिता महत्त्वाची आहे.

याव्यतिरिक्त फेक न्यूजसंदर्भात शाळा तसंच महाविद्यालयांमध्ये चर्चा तसंच कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहेत. जेणेकरून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवण्याआधी ते मजकुराची पडताळणी करतील.

बीबीसी, फेक न्यूज, रिअॅलिटी चेक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, फेक न्यूज

पत्रकारांचा आवाज दडपून टाकण्याचे प्रकार सुरू आहेत. म्हणूनच पत्रकारितेचं महत्त्व वाढलं आहे. विश्वासार्ह बातम्यांची आवश्यकता वाढली आहे.

मूल्याधिष्ठित पत्रकारितेची आवश्यकता अधोरेखित होते आहे. अधिकाअधिक ध्रुवीकरण होत चाललेल्या जगात गोंधळ-कल्लोळाचं वातावरण असताना तथ्यआधारित बातम्यांची आवश्यकता आहे.

भारतात फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासंदर्भात सुरू असलेल्या कामातून आम्हाला नव्या काही गोष्टी हाती लागतील. हे काम वाढवण्याची गरज आहे. विश्वासार्ह बातम्यांची प्रक्रिया कशी चालते हे लोकांना समजावून देणं गरजेचं आहे.

बीबीसी, फेक न्यूज, रिअॅलिटी चेक

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, सोशल मीडियाच्या माध्यमातून फेक न्यूज पसरतात

गंमतीशीर गोष्टी आपल्याला शेअर करायच्या असतात. हलकेफुलके क्षण प्रत्येकाला हवे असतात. मात्र समाजात तेढ पसरवणाऱ्या, आक्षेपार्ह भाषेतल्या फेक न्यूज शेअर करण्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. याने एखाद्याचा जीवही जाऊ शकतो.

सोशल मीडिया फेक न्यूजने भरलेलं असताना कोणावर विश्वास ठेवावा असं एका विद्यार्थ्याने विचारलं. त्यावर टोनी हॉल म्हणाले, अमेरिकेतही याविषयावर चर्चा होते आहे. दोन प्रकारचे दावे आपल्यासमोर येतात. यात सत्य कुठे आहे ते आपण शोधून काढायला हवं. त्यासाठी लोकांची मदत करायला हवी. आम्ही लोकांसाठी काम करत आहोत. सत्य काय हे सांगणं हे आमचं काम आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)