तृप्ती देसाई कोचीमध्ये दाखल, शबरीमाला मंदिरात प्रवेशाच्या तयारीत : #5मोठ्याबातम्या

facebook/TruptiDesai

फोटो स्रोत, facebook/TruptiDesai

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आजची विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या

1. तृप्ती देसाई शबरीमाला मंदिरात प्रवेश करणार

शबरीमाला मंदिरात महिलांवर असलेली प्रवेशबंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली तरी अद्याप एकाही महिलेला मंदिर प्रवेश करता आला नाही. याविरोधात भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई आंदोलन करणार आहेत. 17 नोव्हेंबर रोजी त्या मंदिर प्रवेश करणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे, असं वृत्त महाराष्ट्र टाइम्सनं दिलं आहे.

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

शनिशिंगणापूरच्या मंदिरात, कोल्हापूरच्या मंदिरात आणि हाजी अलीच्या दर्ग्यामध्ये महिलांना प्रवेश मिळण्यासाठी मोहीम उभी करणाऱ्या तृप्ती देसाई आता शबरीमालाच्या मंदिरात आपल्या सात महिला सहकाऱ्यांसह प्रवेश करणार आहेत. या सगळ्या महिला २९ ते ४६ वयोगटातल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, तृप्ती देसाई कोची विमानतळावर दाखल झाल्या आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी अनेकांनी विमानतळाबाहेर गर्दी केली आहे. देसाई यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांकडे सुरक्षेची मागणी केली आहे.

2. गाजा चक्रीवादळ धडकले, 26,000 जणांचं स्थलांतर

बंगालच्या उपसागरातील गाजा चक्रीवादळ गुरुवारी रात्री उशिरा तमिळनाडूमधील नागपट्टणमजवळ किनाऱ्याला धडकलं. ताशी ८० ते ९० किलोमीटरच्या वेगानं वाहणारे वारे आणि तुफान पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या वादळाचा सामना करण्यासाठी NDRFच्या एकूण 8 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. असं वृत्त द हिंदूनं दिलं आहे.

चक्रीवादळामुळे किनारपट्टीचं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी भूस्खलन झाले आहे. नागपट्टणम आणि वेदरान्यम या किनारी भागात रात्री 1.40 वाजता वादळ धडकलं. 30,000 हून अधिक कर्मचारी बचावासाठी तैनात करण्यात आले होते. आतापर्यंत 26,000 हून अधिक लोकांना हलवण्यात आलं आहे.

3. टी-2- महिला विश्वचषक:भारताची उपांत्य फेरीत धडक

मिताली राजचं अर्धशतक आणि भारतीय गोलंदाजांनी केलेला अचूक मारा यांच्या जोरावर भारतीय महिला संघानं टी-२० वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत आयर्लंड संघाला ५२ धावांनी नमवलं. भारतीय महिला संघानं सलग तिसरा विजय नोंदवून उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं, असं वृत्त एनडीटीव्ही स्पोर्ट्सनं दिलं आहे.

याआधीच्या दोन लढतींत भारतानं न्यूझिलंड आणि पाकिस्तानवर मात केली होती. भारताचा साखळीतील शेवटचा सामना शनिवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होत असून हे दोन्ही संघ गटातील अव्वल स्थानासाठी झुंजणार आहेत.

4. DUSU अध्यक्ष अंकिव बैसोया बनावट पदवी प्रकरणात राजीनामा देणार

बनावट पदवी प्रकरणी DUSUचे अध्यक्ष अंकिव बैसोया यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी सूचना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (ABVP) केली आहे. त्यानंतर आपण या पदाचा राजीनामा देणार आहे, असं बैसोया यांनी स्पष्ट केलं. असं वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

सप्टेंबर 2018मध्ये झालेल्या निवडणुकीत बैसोया विजयी झाले होते. त्यानंतर त्यांची पदवी बनावट आहे अशी ओरड NSUIने केली होती. या प्रकारामुळे दिल्ली विद्यापीठाची प्रतिमा मलीन होत असल्याचं ABVPचे सचिव भारत खताना यांनी म्हटलं आहे. बैसोया यांची पूर्ण चौकशी व्हावी आणि जर ते दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई व्हावी असं देखील ते म्हणाले.

5. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटात सामील झाल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल

प्रातिनिधिक छायाचित्र
फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे पोलिसांनी एल्गार परिषदेचे आयोजक सुरेंद्र गडलिंग आणि अन्य पाच जणांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येच्या कटात सामील झाल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलं आहे असं वृत्त झी 24 तासनं दिलं आहे.

आरोपपत्र वेळेत दाखल न केल्यानं सुरेंद्र गडलिंग यांनी पोलिसांविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली. आरोपपत्र दाखल केल्यानं अटक करण्यात आलेले आरोपी जामिनासाठी अर्ज करू शकतात.

६ जून रोजी अटक करण्यात आलेले रोना विल्सन, सुधीर ढवळे, शोमा सेन, सुरेंद्र गडलिंग, महेश राऊत यांच्यासह १० जणांविरुद्ध पुणे सत्र न्यायलायात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. आरोपपत्र दाखल करण्यात आलेले उर्वरित ५ जण फरार आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)