शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करणं विकृतपणा : उद्धव - #5मोठ्या बातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आजची विविध वृत्तपत्रं आणि वेबसाइटवर प्रसिद्ध झालेल्या 5 महत्त्वाच्या बातम्या
1. पटेलांचा पुतळा उंच ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची कमी करणे हे विकृत मनाचे लक्षण-सामना
जगातील सर्वांत उंच पुतळा सरदार पटेलांचा ठरावा, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा असेलही पण त्यासाठी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करणे हे कोत्या, विकृत मनाचे लक्षण आहे अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखात करण्यात आली आहे.
त्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेत युनिटीचे दर्शन झाले पाहिजे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ज्या हिमतीने मराठी आरक्षणाची घोषणा केली त्याच हिमतीने शिवरायांच्या जगातील सगळ्यात उंच पुतळ्याच्या उभारणीची घोषणा करायला हवी, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
पटेलांचा पुतळा जगात 'लय भारी' ठरावा म्हणून अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या नियोजित पुतळ्याची उंची कमी केली, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. हा आरोप खरा ठरावा अशा घटना घडत आहेत. महाराष्ट्रात शिवरायांच्या भव्य स्मारकाची अद्याप पायाभरणी झाली नाही, याची खंत कोणाला वाटते का? असा सवाल अग्रलेखात करण्यात आला आहे.
2.'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' हा पोरकटपणा-मुख्यमंत्री
हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला 'ठगबाजीची चार वर्ष' अशा बॅनरखाली विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना हा पोरकटपणा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. राज्यातील महत्त्वाच्या मुद्यांवर विरोधकांनी गंभीर होण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 'एबीपी माझा'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, cmo/facebok
विरोधकांनी 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाच्या पोस्टरच्या धर्तीवर 'ठग्ज ऑफ महाराष्ट्र' असं पोस्टर तयार केलं. याला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "विरोधकांकडे मुद्दे उरले नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून अशाप्रकारे फिल्मी डायलॉगबाजी सुरू आहेत."
3. दिग्विजय सिंह यांची पुणे पोलीस चौकशी करणार
पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेसंदर्भात तपासादरम्यान उल्लेख झालेला मोबाईल क्रमांक काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांचा आहे का, यासंदर्भात पुणे पोलीस तपास करत आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
एल्गार परिषदप्रकरणी सुरू असलेल्या तपासात एका संशयित नक्षलवाद्याने सुरेंद्र गडलिंग यांना पाठवलेल्या पत्रातील मोबाइल क्रमांकाच्या अनुषंगाने हा तपास सुरू आहे. या क्रमांकावरून नक्षलवाद्यांशी काही बोलणे झाले का याचीही चौकशी सुरू आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.
4. वायुदलात 123 तेजस
भारतीय वायुदलात 123 तेजस विमानं दाखल होणार आहेत. त्यासाठी ओझर येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स कारखान्याला (एचएएल) एक लाख कोटींचं काम देण्यात आलं आहे. देशातील बंगळुरूसह नाशिकलाच ही कामे होणार असल्याचा दावा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी रविवारी केला. 'सकाळ'ने ही बातमी दिली आहे.
काही दिवसांपासून एचएएलकडे कोणत्याही प्रकारची कामे शिल्लक राहणार नसल्याची चुकीची माहिती पसरवली जात आहे असे भामरे म्हणाले. अग्रवाल समाजाच्या राज्यव्यापी महिला अधिवेशनाच्या निमित्ताने भामरे बोलत होते. कोणत्याही परिस्थितीत डिफेन्स इनोव्हेटिव्ह हब नाशिकमध्येच होणार आहे. संरक्षण आणि हवाई दल क्षेत्रातील संशोधनाला चालना देण्यासाठी कोइंबतूरला डिफेन्स हब आहे. त्यापाठोपाठ दुसरे हब नाशिकमध्ये होणार असल्याचा दावा त्यांनी केला, असं या बातमीत म्हटलं आहे.
5. रेल्वे 3000 किमीची भिंत उभारणार
गेल्या महिन्यात अमृतसर येथे झालेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने निवासी भागांमध्ये 3000 किलोमीटरची संरक्षक भिंत उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'ने यासंदर्भात बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, EPA
दसऱ्याच्या निमित्ताने रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रावण पुतळ्याचे दहन बघण्यासाठी हजारो लोक जमले होते. कार्यक्रम पाहताना गर्दी जवळच्या रेल्वे मार्गाच्या दिशेने सरकली. फटाक्यांच्या आवाजामुळे समोरून येणाऱ्या ट्रेनचा आवाज लोकांना ऐकू आला नाही. भरधाव ट्रेनने अनेकांना चिरडले. या अपघातात 60 लोकांनी प्राण गमावले तर अनेकजण जखमी झाले.
भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी रेल्वे मार्ग निवासी भागातून जातो त्याठिकाणी संरक्षक भिंत उभारण्यात येणार आहे. 2.7 मीटर उंचीची आरसीसी भिंत उभारण्यात येईल. उपनगरीय तसेच बिगरउपनगरी अशा दोन्ही क्षेत्रात संरक्षक भिंत उभारली जाईल असं केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी सांगितलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















