'भाजपवर टीका केली म्हणून माझ्या नवऱ्यावर रासुका लावला'

भाजप, मणिपूर, मीडिया, सोशल मीडिया

फोटो स्रोत, Facebook

फोटो कॅप्शन, पत्रकार किशोरचंद वांगखेम यांना NSA अंतर्गत अटक करण्यात आली आहे.
    • Author, दिलीप कुमार शर्मा
    • Role, गुवाहाटीहून बीबीसी हिंदीसाठी
  • Published
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

मणिपूरचे स्थानिक पत्रकार किशोरचंद्र वांगखेम यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा (NSA)च्या अंतर्गत अटक करण्याचं एक प्रकरण समोर आलं आहे. ही घटना गेल्या मंगळवारची आहे.

पत्रकार किशोरचंद्र यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यावर अपमानकारक शब्दात टीका केल्याचा आरोप आहे. सध्या मणिपूरमध्येही भाजपचं सरकार आहे.

मणिपूरच्या साजीवा सेंट्रल जेलमध्ये अटकेत असलेले पत्रकार किशोरचंद यांची पत्नी रंजीत किशोर यांनी बीबीसीशी बातचीत केली.

त्या म्हणाल्या, "माझ्या नवऱ्यानं झाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या मणिपूरमधल्या योगदानाचा विषय छेडला होता. आता त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत. मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी हे केलं जात आहे. त्यांनी सोशल मीडियावर कोणतीही अपमानजनक पोस्ट टाकली नाही. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. आता तिथल्या न्यायालयानं जामीन दिला आहे आणि आदेश दिला आहे की माझ्या नवऱ्यानं सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट राजद्रोहाच्या अंतर्गत येत नाही. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर NSA लावला आणि त्यांना अटक केली."

19 नोव्हेंबरला मणिपूरमध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त मणिपूरच्या भाजपच्या महिला मोर्चातर्फे एका बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बाईक रॅलीमध्ये सहभाग घेत मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी लक्ष्मीबाईंचं योगदान लक्षात घ्यायला हवं असं म्हटलं. त्यांनी दिलेल्या योगदानाबाबत जागृती पसरवण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं.

राणी लक्ष्मीबाईंवर प्रश्न

39 वर्षीय पत्रकार किशोरचंद यांनी आपल्या फेसबुकवर एक व्हीडिओ पोस्ट करत मणिपूरच्या इतिहासात लक्ष्मी बाईंच्या योगदानाबाबत प्रश्न उपस्थित केले होते.

किशोरचंद यांनी फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली आणि लक्ष्मीबाईंचं काय योगदान होतं यावर प्रश्न उपस्थित केले. अशा गोष्टी सांगून लोकांचा विश्वासघात करू नये असंही ते पुढे म्हणाले. मणिपूरच्या स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करून नये असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं.

भाजप, मणिपूर, मीडिया, सोशल मीडिया
फोटो कॅप्शन, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्यावर टीका केल्यामुळे पत्रकाराला अटक करण्यात आली आहे.

मात्र या व्हीडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांविरोधात अपमानकारक भाषा वापरल्याचा आरोप लावला जात आहे. या व्हीडिओत त्यांनी मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारच्या हातातलं बाहुलं असं संबोधलं. फेसबुकवर टाकल्यावर हा व्हीडिओ संपूर्ण राज्यात व्हायरल झाला.

याचदरम्यान 20 नोव्हेंबरला भारतीय दंड संहितेच्या 124-ए / 294/500 या कलमाअंतर्गत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकण्याच्या आरोपाखाली पत्रकाराला तुरुंगात पाठवलं गेलं. दुसऱ्या दिवशी स्थानिक न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

राजद्रोहाचा गुन्हा

पश्चिम इंफाळच्या कोर्टानं जामीन देताना म्हटलं की, 'आपल्या देशाचे पंतप्रधान आणि मणिपूरचे मुख्यमंत्री यांच्याविरोधात मत व्यक्त करणं हा राजद्रोह ठरू शकत नाही'.

मात्र या आदेशानंतर सहा दिवसात मंगळवारी पत्रकार किशोरचंद यांना NSA म्हणजेच रासुकाअंतर्गत अटक करण्यात आली. इंफाळ पोलीस स्टेशनहून सकाळी 9 वाजता कॉल आला. पोलीस स्टेशनमध्ये हजर व्हावं असं पलीकडून सांगण्यात आलं, किशोरचंद यांच्या पत्नी रंजिता यांनी सांगितलं.

भाजप, मणिपूर, मीडिया, सोशल मीडिया
फोटो कॅप्शन, किशोरचंद्र यांच्या अटकेचा विरोध करताना त्यांच्या पत्नी

"माझे पती दुपारी बारा वाजता एका नातेवाईकाबरोबर पोलीस स्टेशनला जाण्याची तयारी करत होते. त्यावेळी साध्या वर्दीतले पोलीस घरी आले आणि त्यांना घेऊन निघून गेले. पोलिसांना आम्ही अनेकदा विचारलं. पण पुन्हा अटक का केली याचं त्यांनी आम्हाला कारण दिलं नाही."

त्या पुढे सांगतात, "माझे पती नशापाणी केल्यानंतर अशा स्वरुपाच्या पोस्ट सोशल मीडियावर टाकतात असा आरोप काही माणसं करत आहेत. या गोष्टीचा फायदा उठवत माझ्या पतीची विश्वासार्हता मोडीत काढण्याचा काहीजणांचा प्रयत्न आहे. जेणेकरून गंभीर मुद्याला बगल देता येईल. माझा प्रश्न हाच आहे-मणिपूरच्या इतिहासात राणी लक्ष्मीबाई यांचं योगदान काय?"

चॅनेलने नोकरीवरून काढलं

पतीची सुटका कधी होणार याबाबत विचारलं असता रंजीता म्हणाल्या, "सरकार माझ्या पतीची कधी सुटका करेल ठाऊक नाही. पण स्थानिकांचा आम्हाला पाठिंबा आहे. माझ्या पतीने योग्य प्रश्न विचारला आहे याची सगळ्यांना जाणीव आहे. माझ्या पतीवरील सर्व आरोप हटेपर्यंत मी लढा देईन."

विशेष बाब म्हणजे किशोरचंद एका स्थानिक चॅनेलमध्ये काम करत होते. त्या चॅनेलने त्यांना कामावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूरमध्ये पत्रकारांसाठी काम करणाऱ्या ऑल मणिपूर वर्किंग जर्नलिस्ट युनियनने या प्रकरणी तूर्तास कोणतंही पाऊल उचललेलं नाही.

भाजप, मणिपूर, मीडिया, सोशल मीडिया
फोटो कॅप्शन, किशोरचंद्र यांच्या अटकेचा विरोध करणारी मंडळी

"भाजप सरकारविरुद्ध सोशल मीडियावरील वादग्रस्त लिखाणासाठी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळी युनियनने या अटकेविरोधात इंफाळमध्ये रॅलीचं आयोजन केलं होतं. आम्ही सत्ताधारी भाजप पक्षाशी चर्चा केली आणि पत्रकाराची सुटका झाली. किशोरचंद यांनी आक्षेपार्ह भाषेत पंतप्रधान आणि मणिपूरचे मुख्यमंत्री यांच्याबाबत लिखाण केलं आहे," असं ऑल मणिपूर वर्किंग जर्नलिस्ट युनियनचे सरचिटणीस सुखम नंदा यांनी सांगितलं.

प्रसारमाध्यमांवर वाढता दबाव

"राज्य सरकारच्या आदेशानुसार किशोरचंद यांना एनएसएअंतर्गत अटक करण्यात आली आहे. आमच्या युनियनचे पत्रकार किशोरचंद यांना पाठिंबा देत आहेत. मात्र ते सातत्याने आक्षेपार्ह आणि वादग्रस्त पोस्ट टाकत आहेत.

दारुच्या नशेत किशोरचंद अशा स्वरुपाचं लिखाण सोशल मीडियावर करत आहेत. आम्ही त्यांना याविषयी समजावलं आहे. त्यांना पहिल्यांदा अटक झाली तेव्हा ते आमच्या युनियनचे सदस्य नसूनही आम्ही सगळी ताकद त्यांच्यामागे एकवटली. मात्र सातत्याने वादांची राळ उडवणाऱ्या पोस्ट्स ते लिहित आहेत," असं नंदा यांनी सांगितलं.

ऑल मणिपूर वर्किंग जर्नलिस्ट युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. जर्नलिस्ट युनियनचे अध्यक्ष ब्रोजेंद्र निओंग्बा हे किशोरचंद अँकर म्हणून काम करत असलेल्या चॅनेलचे मुख्य संपादक आहेत.

भाजप, मणिपूर, मीडिया, सोशल मीडिया
फोटो कॅप्शन, मणिपूरमधील इंग्रजी वर्तमानपत्र 'इंफाळ फ्री प्रेस'चे संपादक प्रदीप फंजोबम

मणिपूरहून प्रकाशित होणारं इंग्रजी वर्तमानपत्र 'इंफाळ फ्री प्रेस'चे संपादक प्रदीप फंजोबम सांगतात, "ऑल मणिपूर वर्किंग जर्नलिस्ट युनियनचे अध्यक्ष ब्रोजेंद्र निओंग्बा हे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे किशोरचंद यांच्या सोशल मीडियावरील लिखाणाबद्दल युनियनच्या पाठिंब्याच्या निमित्ताने वाद आहे."

किशोरचंद यांना अटक करण्यासाठी सरकारने एनएसएचा आधार घेतला आहे. कोणावर टीका करणं हा अपराध नाही. त्यामुळे सरकार एनएसए लावू शकत नाही. स्थानिक न्यायालयानेही हा राजद्रोह नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

एका ज्येष्ठ पत्रकारांनी याप्रकरणी आपली भूमिका मांडली. मणिपूरमध्ये प्रसारमाध्यमांवर दबाव वाढत चालला आहे. इथली परिस्थिती दिवसेंदिवस संवेदनशील होत चालली आहे. तुम्ही सरकार विरोधात काहीही लिहू शकत नाही. भाजप सरकारने आमच्या वर्तमानपत्रावर अब्रूनुकसानीचा दावा ठोकला आहे. कारण आम्ही सरकारच्या कामकाजाविरोधात काही बातम्या दिल्या होत्या. अशाप्रकारे सरकार प्रसारमाध्यमांना त्रास देत आहे.

मणिपूरमध्ये कार्यरत स्थानिक पत्रकार धनबंता सांगतात, "सरकारवर टीका करणे हा अपराध नाही. मात्र टीका करण्यालाही काही मर्यादा असते. मांडणी करताना भाषेबद्दल विचार करायला हवा."

याप्रकरणाबाबत बोलण्यास पोलीस तयार नाहीत. भाजपचे प्रादेशिक नेतेही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. मात्र पत्रकार किशोरचंद यांच्या अटकेनंतर सोशल मीडियावर राज्य सरकारवर टीका करण्यात येत आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)