'सगळ्या अॅट्रॉसिटीचा राग आम्ही दलितांवर काढलाय आतापर्यंत'

फोटो स्रोत, Getty Images
बीड जिल्ह्यात एका महिला पोलीस अधिकाऱ्याचा एक आक्षेपार्ह व्हीडिओ व्हायरल झाला आहे. दलित समाजातील संशयितांना पोलिस कशी मारहाण करतात याची कबुली या व्हिडिओमध्ये ही अधिकारी देत असल्याचं दिसतं. या व्हीडिओचे सत्यता तपासण्याचे तसेच या संदर्भात सविस्तर चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
हा कथित व्हीडिओ सध्या बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यात पोलीस उपअधीक्षक असणाऱ्या भाग्यश्री नवटाके यांचा आहे. हा व्हिडिओ नेमका कोणी रेकॉर्ड केला आणि कधी केला याची नेमकी माहिती अद्याप समोर आली नाही आहे. काही महिन्यांपूर्वी तालुक्यातल्या काही कार्यकर्त्यांशी बोलतांना त्यांनी ही विधानं केल्याचं या व्हीडिओमध्ये दिसतं आहे. नवटाके यांनी सत्य समोर येईल, इतकीच प्रतिक्रिया दिली आहे.
हा प्रकार समोर आल्यानंतर भाग्यश्री नवटाके यांची औरंगाबादमध्ये बदली करण्यात आली आहे.
काही कार्यकर्त्यांवर दाखल झालेल्या गुन्ह्यासंबंधीचं एका प्रकारे स्पष्टीकरण देतांना नवटाके या व्हिडिओमध्ये दिसतात. त्यात त्या कथितरीत्या २१ दलितांना आपण फोडून काढलंय, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, सोबतच काही मुस्लिमांनाही फोडलंय आणि त्यामुळे परिसरात असा मेसेज गेलाय की 'मॅडम कोणाला सोडत नाहीत,' असा त्या करताना दिसतात.
"त्यांच्यासमक्ष सहा महिन्यात मी २१ दलितांना फोडलंय. फोडलंय ना? ज्यांनी दुकान फोडलंय त्यांना? मुस्लिमांना फोडलंय. ३०७ दाखल झालाय. म्हणजे सगळ्यांना स्ट्रॉन्ग मेसेज गेलाय की मॅडम कोणाला सोडत नाही. काल जर मी म्हटलं असतं की सोडा तर माझ्या ड्युटीवर प्रश्न निर्माण झाला असता," असं नवटाके या कथित व्हीडिओत बोलताना दिसतात.
अॅट्रॉसिटीच्या केसेसबद्दल त्या बोलतात. गुन्ह्यातील दलित संशयितांना पाय बांधून कसं मारलं हेही या कथित व्हिडिओत त्या सांगतांना दिसतात."तुला माहिती का दलितांना कसे मारतो आम्ही? पाय बांधून आणि हात बांधून मारतो. सगळ्या अॅट्रोसिटीचा राग आम्ही त्यांच्यावर काढलाय आतापर्यंत," असंही त्या या व्हिडिओत म्हटल्याचं ऐकू येतं.

साधारण चार ते पाच व्यक्तींशी, जे ठिकाण पोलिस स्टेशनचा परिसर वाटत नाही अशा वर्दळ नसलेल्या ठिकाणी, खुर्च्या मांडून नवटाके या बोलत बसलेल्या या कथित व्हीडिओ क्लिपमध्ये दिसतात. त्या पोलिस युनिफॉर्मध्ये नाही आहेत. तिथे बसलेल्या एका व्यक्तीनंच हे संभाषण आणि व्हिडिओ रेकॉर्ड केलं असावं हे तो पाहतांना समजतं.
'बीबीसी मराठी'नं या व्हिडिओची सत्यता तपासलेली नाही. पण जर तो खरा असेल तर काही महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात:
१. ज्यांना हे स्पष्टीकरण दिलं जात आहे त्या व्यक्ती कोण आहेत आणि पोलिस अधिकारी असं स्पष्टीकरण देण्यास बांधील आहेत का?
२. संशयितांची जात पाहून पोलिस कारवाई केली जाते का? केवळ या अधिकारीच तशी कारवाई करतात की अन्य अधिकारीही ही पद्धत अवलंबतात?
३. केवळ दलित संशयितांना आणि आरोपींना अधिक कठोर शिक्षा देण्यात येते का?
४. ज्या दलित आरोपींना असं फोडून काढल्याचं या महिला अधिकारी कथितरीत्या म्हणत आहेत, त्या २१ आरोपींचं पुढे काय झालं? त्यांच्यावरील गुन्हे खरे होते का?
५. कारवाई करताना पोलीस अधिकाऱ्यांना स्वतःची जात महत्त्वाची वाटते का?
६. हा व्हीडिओ रेकॉर्ड केला ती व्यक्ती कोण आहे? सोबत असलेल्या अन्य व्यक्ती कुठे आहेत?
या व्हीडिओच्या आधारे नवटाके यांच्याविरुद्ध 'बहुजन विकास मोर्चा'चे बाबूराव पोटभरे यांनी तक्रार दाखल केली आहे. "मी यापूर्वीही या महिला अधिकाऱ्याचे वर्तन दलित आणि मुस्लीमविरोधी आहे, अशी तक्रार पोलीस अधीक्षकांकडे केली होती. या व्हीडिओत दिसणारे कार्यकर्ते मराठा समाजातील आहेत. या अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही करणार आहोत," असं पोटभरे म्हणाले.
बीडचे पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या प्रकरणाची चौकशी अतिरिक्त पोलीस अधिक्षक वैभव कलबर्गे यांना चौकशीचे आदेश दिले आहेत.
'बीबीसी मराठी'शी बोलतांना ते म्हणाले की, "सर्वप्रथम या व्हीडिओची सत्यता तपासली जाईल. त्यानंतरच त्याविषयी काही बोलता येईल. पण भाग्यश्री नवटाके यांचीही बाजू या चौकशीदरम्यान घेतली जाईल. ज्या व्यक्ती या व्हीडिओमध्ये दिसताहेत आणि ज्याने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहेत. त्यांचीही चौकशी केली जाईल."
'बीबीसी मराठी'ने भाग्यश्री नवटाके यांच्याशी बोलून त्यांची बाजू जाणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी एसएमएसद्वारे प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, "सत्य समोर येईल. आता प्रतिक्रिया देण्याची गरज नाही."
नवटाके माजलगाव इथे पोलीस उपअधीक्षक म्हणून कार्यरत होत्या. या प्रकरणानंतर त्यांची औरंगाबादमध्ये बदली करण्यात आली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















