राजेश्वर उदानी हत्या प्रकरणात अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्यला अटक

फोटो स्रोत, Instagram@Devoleena
रायगड जिल्ह्याला लागून असलेल्या जंगलात पाच डिसेंबरला एक मृतदेह सापडला. मुंबईतल्या एका हिरे व्यापाराचा तो मृतदेह होता. या प्रकरणात एक पोलीस अधिकारी, मंत्र्यांचा एक माजी सचिव आणि एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. हे संपूर्ण प्रकरण एका चित्रपटाच्या पटकथेसारखं आहे.
मुंबईचे हिरे व्यापारी राजेश्वर उदानी यांच्या हत्येचं प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचं होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन लोकांना अटक केली आहे. त्यात सगळ्यांत चर्चेतलं नाव आहे ते देवोलिना भट्टाचार्य यांचं.
या सगळ्या प्रकरणात देवोलिना यांच्याबरोबर सचिन पवार यांनाही गुवाहाटीतल्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्यात एक निलंबित हवालदार दिनेश पवार यांचंही नाव समोर आलं आहे.
मुंबई पोलिसांतील अतिरिक्त पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की हवालदार दिनेश पवार यांना 2014 मध्ये बलात्काराच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ते म्हणाले की प्रथमदर्शनी हे सगळं प्रकरण उदानी यांच्याबरोबर असलेला पैशाचा वाद आणि सचिन यांच्या गर्लफ्रेंड यांच्याशी निगडीत आहे.
पोलिसांच्या मते देवोलिना यांनी या हिरे व्यापाऱ्याशी हत्येच्या काही वेळापूर्वी फोनवर चर्चा केली होती.
देवोलिना भट्टाचार्य कोण आहे?
देवोलिना भट्टाचार्या मूळच्या आसामच्या आहेत. त्यांनी 'साथ निभाना साथिया' या मालिकेत सूनेची भूमिका केली होती.
त्याशिवाय 'संवारे सबके सपने प्रीतो' या मालिकेतसुद्धा काम केलं आहे.
गुवाहाटीमध्ये 22 ऑगस्ट 1990 मध्ये जन्म झालेल्या देवोलिना भट्टाचार्य एक प्रशिक्षित भरतनाट्यम डान्सर आहेत.

फोटो स्रोत, Instagram@Devoleena
2011 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या देवोलिना डान्स इंडिया डान्सच्या दुसऱ्या पर्वात पहिल्यांदा दिसल्या होत्या.
त्यानंतर त्या टीव्हीतील 'संवारे सबके सपने प्रीतो'मध्ये बानीच्या भूमिकेत पहिल्यांदा दिसल्या.
त्यानंतर जिया माणिक यांनी 'साथ निभाना साथिया' ही मालिका सोडल्यानंतर देवोलिनाने त्यांची जागा घेतली.
गोपी बहू नावाने त्यांनी सर्वदूर आपली ओळख निर्माण केली.
काही दिवसांआधी कलर्स वाहिनीवरील 'कुछ नये रिश्ते' या मालिकेतही त्यांना भूमिका मिळाल्याची चर्चा होती.

फोटो स्रोत, Instagram@Devoleena
देवोलिना लोकप्रिय सून म्हणून टीव्हीच्या क्षेत्रात ओळखल्या जातात. त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत.
देवोलिना यांना 2013मध्ये 'ITA अवॉर्ड फॉर देश की धडकन', 2014 मध्ये 'स्टार परिवार अवॉर्डमध्ये फेव्हरेट बहू', 2015 मध्ये 'इंडियन टेली अवॉर्डमध्ये बेस्ट एक्ट्रेस', 'बिग स्टार अवॉर्ड्स मध्ये मोस्ट एन्टरटेनिंग टेलिव्हिजन अँकर-फिमेल', स्टार परिवार अवॉर्डमध्ये 'फेव्हरेट पत्नी' आणि 'फेव्हरेट बहू', 2016 मध्ये झी गोल्ड अवॉर्डमध्ये 'पॉप्युलर बहू ऑन इंडियन टेलिव्हिजन' आणि 2017 मध्ये स्टार परिवार अवॉर्डमध्ये 'फेव्हरेट बहू'चा पुरस्कार मिळाला आहे.
गेल्या काही दिवसांत बिकीनी आणि तत्सम बोल्ड छायाचित्रांमुळे त्या इंटरनेटवर लोकप्रिय आहेत.
उदानी खून खटल्यातील उलगडणारे गुंते
देवोलिना यांच्यासह सचिन पवार यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. सचिन पवार महाराष्ट्रातील गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचे माजी खासगी सचिव आहेत.
प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी प्रसारमाध्यमांना सांगितलं की, 2004 ते 2009 या काळात पवार हे त्यांचे खासगी सचिव होते. मात्र जेव्हा त्यांनी अपक्ष म्हणून मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली तेव्हा त्यांनी सगळे संबंध तोडले आणि भाजपामधून त्यांना काढून टाकलं.

फोटो स्रोत, Reuters
उदानी काही प्रसिद्ध बारमध्ये जात होते आणि सचिन पवार यांच्या माध्यमातून ग्लॅमरच्या दुनियेतल्या अनेक महिलांच्या संपर्कात होते, असं पोलीस तपासात उघड झालं आहे.
बेपत्ता झाले होते उदानी
राजेश्वर उदानी (वय 57) 28 नोव्हेंबरला त्यांच्या ऑफिसमधून बेपत्ता झाले होते. पोलिसांत ते बेपत्ता झाल्याची तक्रार झाली होती. त्यांच्या मोबाईलचं लोकेशन नवी मुंबईतल्या रबाळे जवळ असल्याचं पोलिसांना कळलं होतं. पण त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता.
त्यानंतर पोलिसांनी अपहरणाच्या प्रकरणाची नोंद केली. त्यांच्या ड्रायव्हरने पोलिसांना सांगितलं की उदानी गाडीने पंत नगरच्याजवळ उतरले. त्यानंतर एक दुसरी गाडी आली आणि त्यात ते बसले.
बुधवारी उदानींचा मृतदेह मिळाला. त्यांच्या मुलांनी मृतदेहाची ओळख पटवली.
उदानी यांच्या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत दोन डझन लोकांची चौकशी झाली आहे. बेपत्ता होण्याआधी ज्या गाडीत ते बसले त्या गाडीचाही पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस अधिकाऱ्यांनी देवोलिना भट्टाचार्य यांचा उदानी यांच्या मृत्यूशी काय संबंध आहे याबद्दल काहीही सांगितलेलं नाही. मात्र मनोरंजन विश्वातल्या आणखी काही लोकांची चौकशी होण्याची शक्यता आहे, असं सांगण्यात आलं आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















