मनोहर पर्रिकरांनी केली मांडवी नदीवरच्या पुलाची पाहणी #पाचमोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Twitter
आजची विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील पाच महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे :
1. मनोहर पर्रिकरांनी केली मांडवी नदीवरच्या पुलाची पाहणी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. अशा अवस्थेतही त्यांनी रविवारी गेव्यातील मांडवी नदीवरच्या पुलाच्या बांधकामाची पाहणी केल्याची बातमी NDTV इंडियाने दिली आहे. दिल्लीतील एम्समधून स्वादूपिंडासंबंधित आजारावर उपचार घेतल्यानंतर पर्रिकर गोव्याला परतले होते.
14 ऑक्टोबरनंतर पहिल्यांदाच घराबाहेर पडलेल्या पर्रिकरांची तब्येत चांगलीच खंगलेली दिसल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.
2. संभाजी भिडेंच्या कार्यक्रमात भीम आर्मी, दलित पँथरचा गोंधळ
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या मुंबईतील कार्यक्रमात भीम आर्मी आणि दलित पँथरच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. एबीपी माझाने ही बातमी दिली आहे. पोलीस सुरक्षेत हा कार्यक्रम पार पडला. गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

फोटो स्रोत, Raju Sanadi
संभाजी भिडे कार्यक्रमातून मार्गस्थ होत असताना भीम आर्मी आणि दलित पँथरच्या लोकांनी जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये महिलांचाही समावेश होता.
3. मला भावी मुख्यमंत्री म्हणून नका- अजित पवार
"मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका आणि पवारसाहेबांचा पण भावी पंतप्रधान म्हणून उल्लेख करू नका. भावी मुख्यमंत्री म्हटल्याने कोणाच्या भावना दुखावल्या जातात किंवा कोणाला पसंत पडत नाही. त्यातून पाडापाडी होऊ शकते. पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे," असे मत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आधी बहुमत मिळावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केलं. ही बातमी प्रहारने दिली आहे.

फोटो स्रोत, Facebook
बारामती तालुक्यातील पणदरे येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
एका स्थानिक कार्यकर्त्याने भाषणात अजित पवार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. तोच धागा पकडून अजित पवार यांनी उपस्थितांना हा सल्ला दिला, असं या बातमीत म्हटलं आहे.
4. आंतरराष्ट्रीय शाळांना मिळणार अटलबिहारी वाजपेयी यांचं नाव
महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाशी (एमआयईबी) संलग्नित होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांना माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा असे संबोधण्यात येणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या १०० शाळा निर्माण केल्या जाणार आहेत. लोकमतने ही बातमी दिली आहे.
राज्यातील मुलांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देण्यासाठी या शाळा स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मागील वर्षी निकषही निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार राज्यात या शाळांच्या संलग्नतेसाठी महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ स्थापन करण्यात आले आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.
5. भारतात 2018 मध्ये 95 वाघांचा मृत्यू
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) आकडेवारीनुसार 2018 मध्ये देशात एकूण 95 वाघांचा मृत्यू झाला आहे. त्यातील 41 वाघांचा मृत्यू व्याघ्र प्रकल्पांच्या बाहेर झाला. द हिंदूने ही बातमी दिली असून यातील 14 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. म्हणजे एकूण मृत्यूपैकी 34% टक्के मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत, असं या बातमीत म्हटलं आहे.

फोटो स्रोत, FOREST DEPARTMENT
जंगलक्षेत्रातून मानवी वस्तीत शिरल्याने माणूस आणि वाघांमधला संघर्ष वाढतो आणि वाघांच्या मृत्यूत वाढ होते, असंही या संस्थेतर्फे सांगण्यात आलं.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















