मुंबईतील आग : काचेच्या इमारती मृत्यूचे सापळे ठरत आहेत?

मुंबई इमारत

फोटो स्रोत, INDRANIL MUKHERJEE

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
  • Published
  • वाचन वेळ: 2 मिनिटे

निळसर झाक असलेली तावदानं, त्यात पडणारं आकाशाचं प्रतिबिंब आणि त्यावरून चमकणारा सूर्यप्रकाश. आधुनिकतेचा असा चेहरा मिरवणाऱ्या अनेक इमारती मुंबईत दिमाखात उभ्या राहात आहेत.

अशा इमारतीत राहायला मिळावं किंवा तिथं आपलं ऑफिस असावं असं स्वप्नही अनेकजण पाहात असतील. पण सुरक्षिततेचे नियम पाळले नाही, तर हे काचेचे महाल मृत्यूचे सापळे बनू शकतात, याची झलक १७ डिसेंबर २०१८च्या संध्याकाळी पुन्हा पाहायला मिळाली.

मुंबईच्या मरोळमधील ESIC कामगार रुग्णालयाच्या इमारतीला लागलेल्या आगीत सहा जणांचा मृत्यू झाला तर १७०हून अधिक जण जखमी झाले.

आग लागल्यावर या रुग्णालयाच्या नव्यानं बांधण्यात आलेल्या भागात अनेकजण अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीच्या दर्शनी भागावरील काचा फोडाव्या लागल्या.

अर्थातच या घटनेनंतर अशी काचेची आच्छादनं असलेल्या इमारतींच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मुंबई अग्निशमन विभागाचे उपप्रमुख अग्निशमन अधिकारी व्ही. एन. पाणिग्रही यांनी दिलेल्या माहितीनुसार "ESCI रुग्णालयाच्या केवळ दर्शनी भागात ग्लास पॅनल होतं. पण त्यात काही ओपनिंग नव्हतं. काही जणांना तिथून वाचवताना आम्हाला काचा तोडाव्या लागल्या."

याआधीच्या दुर्घटना

मरोळच्या या घटनेनं सुमारे सात महिन्यांपूर्वीच्या आणखी एका दुर्घटनेची आठवण करून दिली. २८ मे २०१८ रोजी मुंबईतच गोरेगावच्या टेक्निप्लेक्स कॉम्प्लेक्समधील काचेचं आच्छादन असलेल्या एका इमारतीत सातव्या आणि आठव्या मजल्यावर आग लागली होती. त्यावेळी इमारतीत धूर कोंडल्यामुळं पाच जणांचा मृत्यू झाला होता.

त्याआधी १८ जुलै २०१४ रोजी अंधेरीच्या लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कित्येक तास लागले. त्या इमारतीत सेंट्रलाईज्ड एसी सिस्टिम असल्यानं हवा बाहेर जाण्यास कोणताच मार्ग नव्हता. त्यामुळे अग्निशमन अधिकाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला होता.

मुंबई आग

फोटो स्रोत, PUNIT PARANJPE

फोटो कॅप्शन, 13 जून 2018 रोजी मुंबईतील एका इमारतीला आग लागली होती.

२०१२ साली वांद्रे-कुर्ला संकुलातील फर्स्ट इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर आणि २०१३ साली अंधेरीतील आयबीएल सेंटरच्या इमारतींमधली आग विझवणं काचेच्या आच्छादनांमुळे जिकीरीचं बनलं होतं.

काचेच्या इमारतींसाठी नियमावली

मुंबईत सध्या वापरात असलेल्या आणि निर्माणाधिन अशा मिळून एकूण किती इमारतींवर काचेची आच्छादनं आहेत याची नेमकी आकडेवारी मिळू शकलेली नाही.

पण अगदी दाटीवाटीनं वसलेल्या दूरच्या उपनगरांतही गेल्या दशकात काचेची आच्छादनं असलेल्या इमारती उभ्या राहू लागल्या. आधी अशा इमारतीच्या सुरक्षेसंदर्भात वेगळे नियम नव्हते.

मात्र २०१२ सालच्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेनं काचेच्या इमारतींसाठी नियमावली तयार केली. त्यानंतर दोन वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ ला अग्निशमन दलानंही सुधारीत परिपत्रक काढलं होतं.

त्यानुसार काचेची आच्छादनं असलेल्या इमारतीतून धूर लवकर बाहेर पडण्यासाठी हवा खेळती राहील अशी व्यवस्था असणं गरजेचं असतं.

त्यामुळे या इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर काचेच्या आच्छादनाचा किमान २.५ टक्के भाग हा मोकळा असायला हवा. प्रत्येक मजल्यावर किमान पाच बाय पाच फूटांची खिडकी रस्त्याच्या दिशेनं असावी आणि ती आतून तसंच बाहेरूनही उघडता येईल अशी असायला हवी.

प्रत्येक मजल्यावरचा येण्याजाण्याचा मार्ग म्हणजे जिने, लिफ्ट, कॉरिडॉर इथल्या काचा सहज उघडता येतील अशा असायला हव्या, म्हणजे तिथून लोकांना बाहेर काढता येईल आणि धूरही कोंडून राहाणार नाही.

२०१२ सालापूर्वी बांधलेल्या इमारतींनाही हे नियम लागू करण्यात आले असून, अशा इमारतींमध्ये आवश्यक बदल करण्याचा सल्ला फायर ब्रिगेडनं दिला आहे. त्यासाठीच इमारतीचं फायर ऑडिटही बंधनकारक आहे.

अग्निशमन दलानं आखलेले नियम आणि अटी पाळल्या गेल्या असतील तरच काचेचं आच्छादन असलेल्या इमारतींना परवानगी दिली जाते अशी माहिती व्ही. एन. पाणिग्रही यांनी दिली आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)