रफालवरुन निर्मला सीतारामन आणि राहुल यांच्यात शाब्दिक चकमक

निर्मला सीतारामन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निर्मला सीतारामन
Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

रफालच्या मुद्द्यावरुन संसदेत आपली भूमिका मांडताना काँग्रेसवर टीका करणाऱ्या संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्यासमोर राहुल गांधी यांनी पुन्हा नव्या प्रश्नांची जंत्री ठेवली आहे.

आपल्या अडीच तासाच्या भाषणात संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी एकदाही अनिल अंबानी यांचं नाव घेतलं नाही. शिवाय रफाल विमानं बनवण्याचं कंत्राट अनिल अंबानींना कसं मिळालं? हे सुद्धा सीतारामन यांनी सांगितलं नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय.

"मी संरक्षणमंत्री सीतारामन आणि माजी संरक्षणणंत्री मनोहर पर्रिकर यांच्यावर कुठलेही आरोप केलेले नाहीत. मी फक्त एवढेच म्हटलंय की तुम्ही एक खोटी गोष्ट लपवण्याशिवाय दुसरं काहीही केलेलं नाही. मात्र नरेंद्र मोदी या घोटाळ्यात सामील आहेत हे मी स्पष्टपणे सांगू इच्छितो" असं राहुल यांनी संसदेत बोलताना म्हटलंय.

राहुल गांधी

फोटो स्रोत, Getty Images

राहुल गांधी यांनी निर्मला सीतारामन यांना तीन प्रश्न विचारले आहेत.

1.अनिल अंबानींना रफालचं कंत्राट देण्याचा निर्णय कुणी घेतला आणि विमानाची किंमत कशी वाढली?

2.शेजारी देशांकडून आपल्याला इतका धोका आहे, तर मग खरेदी केल्या जाणाऱ्या विमानांची संख्या तुम्ही 126 वरुन 36 वर का आणली?

3.योग्य किंमतीतच आपल्याला विमानं मिळत होती तर मग आपण 126 विमानांची खरेदी का केली नाही?

सीतारामन यांनी काँग्रेसला घेरलं

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत रफाल डीलवर विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरं देताना काँग्रेसवर निशाणा साधला आहे

"आमच्या सरकारने HAL ला वायुसेनेसाठी 1 लाख कोटी रुपयांची विमानं बनवण्याचं कंत्राट दिलं आहे. दुसरीकडे काँग्रेस आमच्यावर HAL ची अवहेलना केल्याचा आरोप करते. पण काँग्रेसनं 10 वर्ष सत्ता असतानाही HALच्या प्रगतीसाठी काहीच का केलं नाही? काँग्रेसनं HALसाठी मगरीचे अश्रू ढाळणं बंद करावं."

'आम्ही सुरक्षेचा सौदा करत नाही'

निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय की "देशाच्या सुरक्षेचे सौदे करणं आणि सुरक्षेशी संबंधित गोष्टींचा सौदा करण्यात अंतर असतं. आम्ही राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊनच संरक्षण खात्याशी संबंधित सौदे अथवा व्यवहार करत असतो. सुरक्षेशी तडजोड करणारे सौदे आम्ही करत नाही."

निर्मला सीतारामन

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, निर्मला सीतारामन

याशिवाय पुढे त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. "माजी संरक्षणमंत्र्यांकडे विमान खरेदीसाठी पुरेसा वेळ होता. मात्र सरकारकडे विमानं खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यामुळे ही गोष्ट स्पष्ट आहे की यूपीए सरकार विमानं खरेदी करण्याच्या प्रक्रियेबाबत फारसं गंभीर नव्हतं"

HAL कडून हेलिकॉप्टरची निर्मिती का नाही?

निर्मला सीतारामन यांनी आपल्या भाषणात ऑगस्टा वेस्टलँडचा मुद्दाही आणला. "हेलिकॉप्टरची निर्मिती HAL सुद्धा करु शकत होतं. पण यूपीए सरकारनं तसं केलं नाही. कारण HAL कडून त्यांना फक्त हेलिकॉप्टर मिळालं असतं. दुसरं काहीही हातात आलं नसतं."

सुप्रीम कोर्टाने क्लीन चिट दिली

मोदी सरकारने सुप्रीम कोर्टाची दिशाभूल केल्याचा आरोपही काँग्रेसने केला होता. त्यालाही सीतारामन यांनी उत्तर दिलं आहे. 36 विमानांच्या खरेदी प्रक्रियेत सुप्रीम कोर्टाला अशी एकही गोष्ट दिसली नाही, की ज्यात हस्तक्षेप करण्याची गरज होती. त्यामुळे काही लोकांची धारणा किंवा आरोप कुठल्याही चौकशीचा आधार ठरत नसल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)