कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी HALने काढलं 1,000 कोटींचं कर्ज - #5मोठ्याबातम्या

रफाल

फोटो स्रोत, DASSAULT RAFALE

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच मोठ्या बातम्या:

1. कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी HALने काढलं कर्ज

वायू दलासाठी अद्ययावत विमानं तसंच शस्त्रनिर्मिती करणारी सरकारी कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड (HAL)ने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी कंपनीला 1,000 कोटी रुपयांचं कर्ज घ्यावं लागलं आहे.

एप्रिल महिन्यापासून कंपनीचा एक प्रकल्प ठप्प झाला असून कारण नवीन खरेदीसाठी तसंच वेंडर्स चुकतं करण्यासाठी कंपनीकडे पुरेसा पैसा नाही, अशी 'नवभारत टाईम्स'ने अशी बातमी दिली आहे.

"29,000 कर्मचाऱ्यांच्या सॅलरीसाठी आम्हाला ओव्हरड्राफ्ट पद्धतीने कर्ज घ्यावं लागलं. 31 मार्चपर्यंत आमच्या नुकसानीची रक्कम 6000 कोटी रुपये असेल, ती कठीण परिस्थिती असेल," असं कंपनीचे CMD आर. माधवन यांनी सांगितलं.

वायू दलाने सप्टेंबर 2017 नंतर एअरोनॉटिक्स कंपनीला कोणतंही मानधन दिलेलं नाही. अनिल अंबानींच्या कंपनीऐवजी रफाल विमानांचं कंत्राट याच कंपनीला का देण्यात आलं नाही, या प्रश्नावरून काँग्रेसने सध्या मोदी सरकारला घेरलं आहे.

2. झेपत नसेल तर शिकू नका- विनोद तावडे

आर्थिकदृष्ट्या झेपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा असं वक्तव्य शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केल्याची बातमी 'न्यूज 18 लोकमत'ने दिली आहे.

अमरावती येथे आयोजित एका विद्यार्थी संवाद कार्यक्रमात, "गरीब विद्यार्थ्यांना तुम्ही मोफत शिक्षण देणार का?" असा प्रश्न विचारला असता त्यांनी हे उद्गार काढल्याचं या बातमीत म्हटलं आहे.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेनं तावडे यांच्या पोस्टरला काळं फासून, त्याकडे चपलाही भिरकावल्या.

तावडेंच्या या वादग्रस्त उद्गाराचे मोबाईलवर शूटिंग करणाऱ्या विद्यार्थ्याला त्यांनी ते रेकॉर्डिंग आधी डिलीट करायला सांगितलं. त्यावर या विद्यार्थ्यांना अटक करा आणि त्यांचे मोबाईल काढून घ्या, असे आदेशही तावडेंनी पोलिसांना दिल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. या आदेशानंतर विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि मोबाईलमधलं रेकॉर्डिंग डिलीट केल्याचं या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, अमरावतीतच शैक्षणिक संस्था चालकांच्या एका बैठकीत बोलताना तावडेंनी "उर्मटपणाची वागणूक" केल्याचं दिव्य मराठीच्या एका बातमीत म्हटलं आहे.

'दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती का मिळाली नाही, प्राध्यापकांची भरती का नाही, असे विद्यार्थी हिताचे प्रश्न प्राचार्य डॉ. संतोष ठाकरे यांनी उपस्थित केले होते. अडचणीत आणणारे प्रश्न उपस्थित केल्याने शिक्षणमंत्र्यांनी डॉ. ठाकरे यांना गेट आऊट म्हटल्याने सर्वंच अचंबित झाले,' असं या बातमीत म्हटलं आहे.

3. महाराष्ट्राचा रौनक मुजुमदार कॅटमध्ये देशात पहिला

देशभरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधील (IIM) व्यवस्थापन प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेत महाराष्ट्राच्या उमेदवारांनी राष्ट्रीय पातळीवर आघाडी घेतली. 100 पर्सेंटाइल मिळवलेले सर्वाधिक म्हणजेच सात उमेदवार महाराष्ट्राचे आहेत.

IIT कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या ठाण्यच्या 22 वर्षीय रौनक मुजुमदारने देशात पहिला क्रमांक पटकावल्याची बातमी 'लोकसत्ता'ने बातमी दिली आहे.

देशभरातील 2 लाख 9 हजार 405 उमेदवारांनी 147 शहरातील केंद्रांवर परीक्षा दिली. त्यात 1 लाख 36 हजार मुलं आणि 73 हजार 326 मुलींचा समावेश होता. यावर्षी चार तृतीयपंथी उमेदवारही उत्तीर्ण झाले.

"माझा सर्वाधिक भर सराव परीक्षेवर होता. वर्षभरात मी जवळपास चाळीस परीक्षा दिल्या. सराव परीक्षा दिल्यानंतर त्याचं विश्लेषण करायचो. परीक्षा देण्यापेक्षा त्याचं विश्लेषण महत्वाचं. त्यामुळे माझ्यातील उणिवा मला कळल्या आणि मी नेमकेपणाने नियोजन करू शकलो. कॅट ही स्मरणावर आधारित परीक्षा नाही तर कल, हुशारी आणि माहितीच्या उपयोगावर आधारित आहे. वेळेचं नियोजनही महत्वाचं आहे," असं रौनकने सांगितलं.

4. पाच वर्षात 27 उद्योगपती कर्ज बुडवून फरार

विजय माल्ल्या, नीरव मोदी यांच्याप्रमाणे बँकांची कर्जे बुडवून देशातील 27 उद्योगपती विदेशात फरार झाले आहेत. या 27 आरोपांपैकी 20 जणांविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी भारताने इंटरपोलशी संपर्क केला होता, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला यांनी लोकसभेत दिली.

'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, आठ जणांना रेड कॉर्नर नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत, तर सहा जणांच्या प्रत्यर्पणाची मागणीही करण्यात आली आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या माहितीप्रमाणे आर्थिक गुन्हेगार कायदा 2018 नुसार सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असं शुक्ला यांनी सांगितलं.

आर्थिक घोटाळा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विजय माल्ल्या

50 कोटींपेक्षा अधिक कर्ज घेणाऱ्या प्रमोटर्स आणि संचालकांच्या पासपोर्टच्या प्रमाणित प्रती जमा करण्याचे आदेश सरकारने बँकांना दिले आहेत. लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट न्यायालयानेही विजय मल्याच्या प्रत्यर्पणाचे आदेश युनायटेड किंग्डमला दिले आहेत, अशी माहितीही शुक्ला यांनी दिली.

दरम्यान, विजय माल्ल्यांना विशेष न्यायालयाने शनिवारी फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित केलं आहे. त्यामुळे नव्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत फरार गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आलेले माल्ल्या हे पहिलेच आरोपी आहे. नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून मल्या 2 मार्च 2016ला लंडनला पळून गेले होते.

5. सात जहाल नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

"नक्षल चळवळीला कंटाळून" सात जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. यामध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या सातही जणांवर 31 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस होतं, अशी 'लोकमत'ने बातमी दिली आहे.

विकास उर्फ साधू पोदाळी, वैशाली बाबुराव वेलादी, सूरज उर्फ आकाश धनातू तानू हर्रा, मोहन उर्फ दुलसा केसा कोवसी, नवीन उर्फ अशोक पेका, जन्नी उर्फ कविता हेवडा धुर्वा, रत्तो उर्फ जनीला उर्फ दुर्गी गेबा पुंगाटी अशी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावं आहेत.

या सातही जणांवर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. या सातजणांच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)