भाजप जाहीरनामा समितीत नारायण राणेंचा समावेश #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Twitter
आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच मोठ्या बातम्या:
1. भाजपच्या जाहीरनामा समितीमध्ये नारायण राणे
लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढवण्याची घोषणा करणाऱ्या नारायण राणे यांचा भाजपच्या जाहीरनामा समितीत समावेश करण्यात आला आहे. भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी लोकसभा निवडणुकांसाठी रविवारी विविध समितींची घोषणा केली, त्यात राणेंचं नाव असल्याची 'झी 24 तास'ने बातमी दिली.
भाजप खासदारांची 2 जानेवारीला बैठक झाली होती. त्यावेळी नारायण राणे उपस्थित होते. राजनाथ सिंह या जाहीरनामा समितीचे अध्यक्ष असतील. विशेष म्हणजे जाहीरनामा समितीत महाराष्ट्रातून राणे हे एकमेव आहेत.
राणे यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणुका लढवेल, अशी घोषणा केली होती. मात्र दिल्लीत खासदारांच्या बैठकीनंतर समीकरणं बदलली आहेत. राणे हे भाजपसोबत राहणार, हे आता पक्कं झालं आहे.
याआधी राणे भाजपसोबत न जाता राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करतील आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा लढवतील, अशी चर्चा होती. पण जाहीरनामा समितीतील राणेंच्या समावेशाने या सगळ्या शक्यता मावळल्या आहेत.
2. आता ट्रेन पकडायला रेल्वे स्टेशनवर 20 मिनिटं आधी पोहोचावं लागेल
देशभरातील महत्त्वाच्या 200 रेल्वे स्थानकांवर आता विमानतळांसारखाच कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, प्रवाशांचीदेखील कसून तपासणी केली जाणार आहे. यामुळे प्रवाशांना आता सगळ्या तपास प्रक्रियांना सामोरं जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं आधीच रेल्वे स्थानकावर यावं लागेल, अशी बातमी 'इकॉनॉमिक टाईम्स'ने दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सध्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये (पूर्वीचे अलाहाबाद) रेल्वे स्थानकावर आणि कर्नाटकातील हुबळी रेल्वे स्थानका प्रायोगिक तत्त्वावर आधुनिक तपास यंत्रणा बसवण्यात आली आहे.
देशाच्या विविध भागातील दोनशे स्थानकांवर अशाच प्रकारची यंत्रणा तैनात करण्याचा सुरक्षादलांचा विचार आहे. त्यासाठीची ब्ल्यूप्रिंट तयार करण्यात आल्याचं रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितलं.
रेल्वे स्थानकाचा पूर्ण परिसरच सील करण्यात येणार असून, काही ठिकाणी कायमस्वरूपी भिंती उभारल्या जातील. लोखंडी गेटबरोबरच रेल्वे सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात येतील. आणि या सर्व सुरक्षा तपासण्यांमुळे विलंब होऊ नये म्हणून प्रवाशांनी पंधरा ते वीस मिनिटं आधीच येणं अपेक्षित आहे.
3. HAL कंत्राटांची कागदपत्रं दाखवा, अन्यथा राजीनामा द्या-राहुल गांधी
हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडला (HAL) एक लाख कोटींची कामं दिल्याचा दावा संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत केला. त्यांनी या कंत्राटाबाबत कागदपत्रं सादर करावीत किंवा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे.
'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
आतापर्यंत HAL या सरकारी कंपनीला एक लाख कोटी रुपयांची कामं दिल्याचं सीतारामन यांनी म्हटलं असलं तरी त्यातील एक रुपयाचं काम त्यांना मिळालेलं नाही, असा आरोप राहुल गांधींनी केला.
आपल्या उद्योजकमित्रांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी HALचा पैसा उधळला. त्यामुळे ही कंपनी कमकुवत झाली असून, त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांना वेतन देण्यासाठी पैसे नसल्याने कोट्यवधींचे कर्ज घेण्याची वेळ आली, असं गांधी म्हणाले.
दरम्यान, राहुल हे देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप सीतारामन यांनी केला.
4. याल अंगावर तर घेऊ शिंगावर - शिवसेना
लोकसभेच्या 40 जागा जिंकण्याची वल्गना करून भाजपनं EVM सोबतची युती जाहीर केली आहे, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
लातूरमधील कार्यकर्ता मेळाव्यात भाजप अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला शिवसेना कायम तयार असतेच. त्यामुळे येऊ द्या अंगावर, होऊ द्या सामना. हा महाराष्ट्र तुम्हाला अस्मान दाखवल्याशिवाय राहणार नाही, असं थेट आव्हान शिवसेनेकडून भाजपला देण्यात आल्याची 'लोकमत'ने बातमी दिली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
"पाच राज्यांमधील पराभवामुळे भाजपचं अवसान गळाल्याची टीका शिवसेनेनं केली आहे. जनतेनं भाजपला त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली आहे. अनिल गोटे नावाच्या आमदारानं धुळे महानगरपालिकेत त्यांचं भांडं फोडलं आहे. त्यामुळे आता होऊन जाऊ द्या," असं खुलं आव्हान शिवसेनेनं भाजपला दिलं आहे.
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप सर्व 48 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देईल. मित्रपक्षांच्या जागेवरही भाजपचेच उमेदवार असतील. त्यामुळे 48 पैकी 40 जागांवर भाजप विजयी झाला पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्ता मेळाव्यात मांडली.
5. फुटबॉल: भारताचा थायलंडवर ऐतिहासिक विजय
आशियाई करंडक फुटबॉल (AFC) स्पर्धेत भारताने थायलंडवर 4-1, असा ऐतिहासिक विजय मिळवला. 1964 नंतर पहिल्यांदाच, म्हणजेच 55 वर्षांनंतर या स्पर्धेत भारताने हा विजय साकारला.
भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने दोन गोल करत या विजयात निर्णायक भूमिका बजावली. अनिरुद्ध थापा आणि जेजे लालपेखलुआ यांनी प्रत्येकी एक गोल केला. थायलंडतर्फे एकमेव गोल तिरासील डांग्डाने केला. 'महाराष्ट्र टाईम्स'ने ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, facebook
दोन गोलसह सुनील छेत्रीच्या नावावर आता 66 गोल आहेत. सर्वाधिक गोल करणाऱ्यांच्या यादीत सुनील आता दुसऱ्या स्थानी आहे. सुनीलने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला (65 गोल) मागे टाकलं.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















