ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Kishor Pradhan / Facebook
आज वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या या आहेत पाच महत्त्वाच्या बातम्या :
1. ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन
मराठी तसेच हिंदी चित्रपटांमधून आपल्या दर्जेदार अभिनयामुळे प्रसिद्ध असणारे ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचं निधन झालं आहे. महाराष्ट्र टाइम्सने त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. त्यांनी अनेक मराठी, इंग्रजी नाटकं, चित्रपट, दूरदर्शन मालिका आणि जाहिरातींमध्ये काम केलं होतं.
'शिक्षणाच्या आयचा घो,' 'लालबाग परळ,' 'भिंगरी,' 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या.
लगे रहो मुन्नाभाई, जब वुई मेट या हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं. दूरदर्शन वाहिनीवर गजरा हा कार्यक्रम त्यांनी पत्नी शोभा यांच्यासह सादर केला होता.
2. छत्तीसगडचीही CBIवर बंदी
CBIचे माजी संचालक आलोक वर्मा आणि विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्यातील वादानंतर छत्तीसगड राज्याने CBIवर बंदी घातली आहे. लोकसत्ताने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी CBIला छापे टाकण्यास तसेच एखाद्या प्रकरणाचा तपास करण्यास बंदी घातली होती. त्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असाच निर्णय घेतला होता.
CBIचा वापर केवळ राजकारणासाठी वापर केला जात आहे असा आरोप ममता बॅनर्जी यांनी त्यावेळी केला होता.
आता छत्तीसगडनेही CIBला कारवाईसाठी परवानगी नाकारली आहे. देशातील 3 राज्यांमध्ये आता CIBला परवानगी नाकारल्यामुळे तसेच वर्मा-अस्थाना वादामुळे CBI सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.
3. बेस्टचा संप कायम
राज्य सरकारने नेमलेल्या उच्चस्तरीय समितीबरोबरही चर्चा फिसकटल्यामुळे बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप कायम राहिला आहे. कामगारांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आणि तसे लेखी आश्वासन मिळेपर्यंत संप सुरूच ठेवून चर्चा करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. लोकमतने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

फोटो स्रोत, Getty Images
बेस्ट संपाच्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहेत. तत्पूर्वी हा संप मिटवण्याच्या हालचाली केल्या जात आहेत. 'हा संप लवकर मिटावा,' अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमधून प्रतिक्रिया व्यक्त करताना केली. चार दिवस बस नसल्यामुळे मुंबईकरांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे, असं या बातमीत म्हटलं आहे.
शनिवारी सकाळी संपावर तोडगा काढण्यासाठी पुन्हा बैठक होणार होणार आहे. बेस्ट कामगारांच्या संपामुळे गेले चार दिवस हाल होत असलेल्या मुंबईकरांवर आता भाडेवाढ लादली जाणार आहे.
बेस्ट प्रशासनाने ५४० कोटी रूपयांची तूट भरून काढण्यासाठी भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार चार रुपये ते २३ रुपये अशी प्रस्तावित भाडेवाढ असेल.
4. एप्रिलमध्ये चंद्रयान - 2 मोहीम
भारताची चंद्रावरील दुसरी मोहीम म्हणजेच चंद्रयान-2 मोहीम एप्रिल महिन्याच्या मध्यात सुरू होईल असे इस्रोतर्फे सांगण्यात आलं आहे. इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.

फोटो स्रोत, Getty Images
या मोहिमेसाठी 800 कोटी रुपयांचा खर्च येणार असून चंद्रयान-1 मोहिमेपेक्षा ती अधिक प्रगत असणार आहे. या मोहिमुळे अंतराळ विज्ञान क्षेत्रात भारताचे आणखी एक पाऊल पुढे पडणार आहे.
"चंद्रयान मोहीम 25 मार्च ते एप्रिल अखेरपर्यंत सुरू होईल, एप्रिलच्या मध्यापर्यंत ती सुरू होईल," असे लक्ष्य असल्याचे सिवन यांनी बंगळुरु येथे वार्ताहरांशी बोलताना सांगितले.
यापूर्वी जानेवारी-फेब्रुवारी यांच्यामध्ये ही मोहीम सुरु होणार होती मात्र काही चाचण्या घेणे बाकी होते असेही त्यांनी स्पष्ट केले. द टेलिग्राफने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
5. मीरा सन्याल यांचे निधन
प्रसिद्ध बँकर आणि राजकीय नेत्या मीरा सन्याल (57) यांचे निधन झालं आहे. मीरा सन्याल यांनी रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या 'कंट्री चिफ' पदाचा राजीनामा देऊन राजकारणामध्ये प्रवेश केला होता. 2014 साली त्यांनी आम आदमी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती.
त्यांचा जन्म कोची येथे झाला होता. बँकिंग क्षेत्रामध्ये त्यांनी 3 दशके योगदान दिले होते. त्यांनी एबीएन अम्रोच्या आशिया विभागासाठी 'चिफ ऑपरेटिंग ऑफिसर' पदावरती कार्य केले होते.
त्यांच्या निधनानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दुःख व्यक्त केले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















