'तुला पाहते रे'च्या ईशा निमकरला मीम्सबद्दल काय वाटतं?

फोटो स्रोत, Facebook
- Author, रोहन नामजोशी
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
- Published
- वाचन वेळ: 4 मिनिटे
ईशा निमकर आणि विक्रांत सरंजामे हे दोघंही सध्या घरोघरी आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले आहेत. 'तुला पाहते रे' या झी मराठीवरील मालिकेतून ही जोडी रोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. विक्रांत सरंजामे (सुबोध भावे) आणि ईशा निमकर (गायत्री दातार) यांची प्रेमकहाणी मालिकेच्या केंद्रस्थानी आहे.
मुंबईच्या एका चाळीत राहणाऱ्या ईशाने सरंजामेंच्या भव्य महालात सून म्हणून प्रवेश केला. छोटया चणीची, अगदी नाकासमोर चालणारी, आपल्या आईवडिलांची काळजी घेणारी, नोकरी करून त्यांना सुखात ठेवण्याचे स्वप्न पाहणारी ईशा आता प्रसिद्ध उद्योगपती सरंजामेंच्या घरात सून म्हणून कशी वावरेल ही तमाम प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
या पार्श्वभूमीवर ईशाशी म्हणजेच गायत्री दातारने बीबीसीला खास मुलाखत दिली आणि गप्पा मारल्या.
मालिकेला मिळणाऱ्या प्रचंड प्रतिसादाबद्दल ती सध्या फार आनंदात आहे. ती म्हणते, "ही माझी पहिलीच मालिका आहे. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. एक नवीन व्यक्ती म्हणून मला स्वीकारलंच नाही तर माझ्यावर भरभरून प्रेमही केलं. मालिकेवरही लोक प्रेम करत आहेत. आता परवा जो महाएपिसोड झाला त्याबद्दल फार उत्सुकता होती. ते लग्न पाहून आम्हालाही
अशा प्रकारचं लग्न हवंय अशा आशयाचे अनेक मेसेज, प्रतिक्रिया लोकांकडून ऐकायला मिळत आहेत."

फोटो स्रोत, Instagram/Gayatri Datar
सुबोध भावेंबद्दल आदरयुक्त भीती
ही मालिका सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला होता. सुबोध भावे त्यात लहानग्या गायत्रीला बक्षीस देताना दिसत आहेत. त्या प्रसंगाबद्दल बोलताना गायत्री भूतकाळात हरवते. तेव्हा गायत्री चौथीत होती. सुबोध भावे तिच्या शाळेत आले होते. त्यांच्या हस्ते तिला दोन बक्षीसं मिळाली होती. तेव्हा गायत्रीने मला तुमच्याबरोबर काम करायचंय असं भाबडेपणाने सांगितलं होतं.

फोटो स्रोत, Instagram/Gayatri Datar
तेव्हा गायत्रीला अपेक्षा नव्हती की पुढे जाऊन तिला सुबोध भावेंबरोबर काम करायला मिळेल. जेव्हा तिला तुला पाहते रे मालिकेबद्दल कळलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिला शब्द सुचेनासे झाले.
प्रेमाला वयाचं बंधन नाही
वयाचं अंतर हा या मालिकेचा गाभा आहे. विक्रांत सरंजामे ईशापेक्षा जवळजवळ वीस वर्षांनी मोठे आहेत. याविषयी बोलताना गायत्री म्हणते, "प्रेमात पडताना कोणीही वय, पैसा अशा गोष्टींचा विचार करत नाही. याबाबतीत माझे विचार इशासारखेच आहेत. असं असलं तरी अशा परिस्थितीत एखादी व्यक्ती कसा विचार करेल, एखाद्या घटनेवर तिची काय प्रतिक्रिया असेल, अशा छोट्या छोट्या गोष्टींचा मी विचार करत असते. तसंच या भूमिकेत शिरण्यासाठी मला मालिकेच्या दिग्दर्शकांची खूप मदत झाली.

फोटो स्रोत, Instagram/Gayatri Datar
वयात अंतर असलेली अनेक जोडपी गायत्रीच्या आईच्या ओळखीचे आहेत. त्यांच्याबद्दलही गायत्रीने तिच्या आईशी वेळोवेळी चर्चा केल्याचं ती सांगते. या सगळ्या चर्चेतून या भूमिकेसाठी तिला बरीच मदत झाल्याचं गायत्री सांगते.
मालिकेत ईशा निमकर ही चाळीत राहते. प्रत्यक्षात गायत्री कधीच चाळीत राहिलेली नाही. त्यामुळे तिथे वागण्याबोलण्याचे काय नियम असतात, हे तिच्यासाठी फार कठीण होतं. त्यासाठी तिने विशेष परिश्रम घेतल्याचा ती आवर्जून उल्लेख करते. चाळीत मुली कशा राहतात, कसे कपडे घालतात, वागतात, कशा बोलतात याचं नीट निरीक्षण केल्याचं ती सांगते.
त्याचवेळी प्रत्यक्ष आयुष्यात ती ईशासारखी लाजरी-बुजरी नसल्याची, अरे ला कारे न करणारी नाही, हे सांगायलाही गायत्री विसरत नाही.
मीम्सविषयी बोलताना..
ईशा आणि विक्रांत निमकर यांचे मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. त्याविषयी बोलताना गायत्री मनापासून हसते. ती म्हणते, "लोक इतकं मन लावून ही सिरीयल बघतात त्याविषयी मला कमाल वाटते. मालिकेतल्या पात्रांविषयी इतक्या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवतात. त्यातून असं काहीतरी क्रिएटिव्ह काहीतरी करतात हे पाहून छान वाटतं. त्यापैकी एकही मीम्स पाहून मला कधी वाईट वाटलं नाही की मनाला लागलं नाही."

फोटो स्रोत, Instagram/Gayatri Datar
कॉलेजच्या एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आलेले विक्रांत सरंजामेंबरोबर ईशा वैवाहिक आयुष्यातील आव्हानं स्वीकारायला तयार झाली आहे. ईशाचं आयुष्य आता काय वळण घेईल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
मीम्सचा पाऊस
रविवारी मालिकेतील विवाहसोहळा महाराष्ट्राने दोन तास झी मराठी वाहिनीवर अनुभवला. त्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया, मीम्स आणि उखाण्यांचा पाऊस पडला. विकिशा (म्हणजे विक्रांत आणि इशा) या नावाने ही जोडी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यातील निवडक प्रतिक्रिया पाहूया.
विक्रांत आणि इशा यांच्या वयातील फरक हा सगळ्यात मोठा चर्चेचा विषय आहे. त्यावर मंगेश अशोक देशपांडे लिहितात, "तुपारे (तुला पाहते रे) मध्ये बालविवाह झालाय खरा पण इशा आता माहेरीच रहायला जाईल ना? 18 वर्ष पूर्ण व्हायला अजून सात- आठ वर्षं आहेत त्यामुळे तिला पुन्हा निमकरांच्या घरीच जावं लागणार अशी चर्चा मायरा आणि झेंडे यांच्यात सुरू आहे."

फोटो स्रोत, FACEBOOK
लग्नाच्या आधी विक्रांतच्या वयाबरोबरच त्याच्या पांढऱ्या दाढीमिशांचीही सोशल मीडियावर चर्चा होती. तेव्हा केस आणि दाढी रंगवायचा सल्लाही अनेकांनी दिला. प्रथमेश शिरवडकर म्हणतात की, "सरंजामेंनी केस काळे केले तर दाढीचेही करायचे ना काहीतरी."

फोटो स्रोत, Facebook
विक्रांत आणि ईशाच्या लग्नात काही दुकानांनी मोफत पेढेही वाटले. हे फोटोही व्हायरल झाले होते.

फोटो स्रोत, Twitter

फोटो स्रोत, Facebook

फोटो स्रोत, Facebook
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















