डान्स बार बंदीसाठी गरज पडल्यास अध्यादेश #5मोठ्याबातम्या

डान्स बार

फोटो स्रोत, Getty Images

Published
वाचन वेळ: 2 मिनिटे

आजची वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.

1. डान्स बार : गरज पडल्यास सरकार अध्यादेश आणणार

"डान्स बारच्या नियमनासाठी गरज पडल्यास राज्य सरकार अध्यादेश आणेल," असं मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं आहे. हिंदुस्तान टाइम्सनं दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयानं काही अटी घालून राज्यात डान्स बार सुरू करण्याचा निर्णय दिला आहे.

त्यावर ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं की, "सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कायदा आणि सुव्यवस्था विभागाशी चर्चा करण्यात येईल. त्यासाठी मग गरज पडल्यास मुंबईतील डान्स बार बंद करण्यासाठी राज्य सरकार अध्यादेश आणेल."

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्यात तब्बल 14 वर्षानंतर पुन्हा डान्सबार सुरू होणार आहेत.

2005 साली काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने डान्सबार बंदीसाठी कायदा केला होता.

2. मालेगावमध्ये एकाच दिवशी 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यात एकाच दिवशी तीन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

कांदा

फोटो स्रोत, Getty Images

शेतमालाला भाव नसल्यानं कंधाणे गावच्या ज्ञानेश्वर शेवणकर (वय 35) या शेतकऱ्यानं कांद्याच्या राशीवरच विष प्राशन करून आत्महत्या केली आहे.

सायने येथील शेतकरी वसंत बंकट पाटील (वय 45) तर नांदगाव बु. येथील चेतन केदा बच्छाव (वय 23) या दोन शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पाटील यांच्यावर सोसायटीचं दीड लाख रुपये कर्ज होतं, तर बच्छाव यांच्यावर सोसायटीचं 65 हजार आणि एका खासगी कंपनीचं 5 लाख रुपये कर्ज होतं, असं या बातमीत म्हटलं आहे.

3. राम मंदिरासाठी संघाची 2025पर्यंत मुदत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं केंद्रातील भाजप आघाडी सरकारला राममंदिरासाठी 2025 ची मुदत दिली आहे. नवभारत टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

"2025 पर्यंत राममंदिराची उभारणी झाल्यास देशाच्या विकासाला वेग मिळेल," असं वक्तव्य संघाचे सरचिटणीस भय्याजी जोशी यांनी केलं आहे.

राम

फोटो स्रोत, Getty Images

कुंभमेळ्यात बोलताना त्यांनी म्हटलं की, "गुजरातच्या सोमनाथ मंदिराची उभारणी सन 1952मध्ये झाल्यानंतर देशाच्या विकासाने वेग घेतला होता. अयोध्येतील राममंदिर उभारणीनंतरही तसंच होईल. हे मंदिर पुढील दीडशे वर्षांसाठी भारतासाठी अमूल्य ठेवा असेल."

राममंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आहे म्हणून त्याविषयीचा निकाल येईपर्यंत सरकार प्रतीक्षा करेल, असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतंच केलं होतं.

4. मोहसीन शेख हत्या प्रकरणी धनंजय देसाईला जामीन

पुण्यातील मोहसीन शेख या तरुणाच्या हत्येप्रकरणाताल आरोपी हिंदू राष्ट्रसेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई यांना जामीन मिळाला आहे. एबीपी माझानं ही बातमी दिलीय.

50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे.

सोशल नेटवर्किंग साईटवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात 2014 साली तणाव निर्माण झालेला होता. त्याच वातावरणात 2 जून 2014ला आयटी क्षेत्रातील मोहसीनची हत्या करण्यात आली.

पोलिसांनी याप्रकरणी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईंसह 23 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल केलं होतं.

5. महागाई आणि बरोजगारीत वाढ - मोहन भागवत

देशात महागाई आणि बरोजगारी वाढली आहे आणि याचा परिणाम सगळ्यांवर होत आहे, असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दिली आहे.

मोहन भागवत

फोटो स्रोत, BIJU BORO

फोटो कॅप्शन, मोहन भागवत

"देशातील धोरणांचा प्रत्येकावर परिणाम होत आहे. तुम्ही अथवा मी धोरणं बनवू शकत नाही, मग आपल्यावर धोरणांचा परिणाम मात्र होतो. महागाई वाढलीय, महागाई तुम्ही अथवा मी नाही वाढवली, पण तिचा परिणाम आपल्यावर होत आहे. बेरोजगारी वाढली, तुम्ही अथवा मी नाही वाढवली पण त्याचा आपल्याला फटका बसत आहे. त्यामुळेच आपण देशासाठी जगायला शिकलं पाहिजे," असं भागवत यांनी म्हटलं आहे.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)