भाजपचा '5YearChallenge' मधील विकासाचा दावा असा ठरला खोटा

ट्वीटर पोस्ट

फोटो स्रोत, TWITTER

    • Author, फॅक्ट चेक टीम
    • Role, बीबीसी न्यूज
  • Published

सध्या #10yearchallenge या हॅशटॅगप्रमाणं #5yearchallenge वापरून भाजप सोशल मीडियावर मोदी सरकारनं केलेल्या कामाचा प्रचार करत आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळात किती झपाट्यानं काम झालंय, हे दाखवण्याचा भाजप प्रयत्न करत आहे. पण त्यांनी यासाठी पोस्ट केलेले फोटो चुकीचे असल्याचं बीबीसीच्या पडताळणीत आढळून आलं आहे.

विकासाचा दावा पटवून दाखवण्यासाठी त्यांनी काही कार्टून आणि फोटो शेअर केले. गेल्या गुरुवारी आणि शुक्रवारी (17 आणि 18 जानेवारी) भारतातल्या अनेक शहरात यामुळं #5yearchallenge हा ट्रेंड राहिला.

झारखंड, नागालँड, त्रिपुरा, ओडिशा, चंडीगढ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, लक्षद्वीपसह भाजपच्या 20 हून अधिक सोशल मीडिया हँडल्सवर हे फोटो गुरुवारी रात्री 7 ते 10 वाजताच्या दरम्यान पोस्ट करण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत हजारो लोकांनी ते फेसबुक आणि ट्विटरवर शेअर, रिट्वीट केलं आहे.

भाजपनं अधिकृतरीत्या पोस्ट केलेल्या फोटोंची बीबीसीनं पडताळणी केली. यामध्ये दिल्लीच्या बाहेरचा 'पेरिफेरल एक्सप्रेस वे' दाखवण्यासाठी वापरलेले फोटो हे नेमके त्याच प्रकल्पाचे नसल्याचं आढळलं.

ट्विटर पोस्ट

फोटो स्रोत, AFP

या पोस्टमध्ये दोन फोटो आहेत. एकामध्ये कामगार काम करत आहेत. तर दुसरीकडं त्या ठिकाणी वाहनं धावताना दिसत आहेत. फोटोवर "तेव्हा आणि आता," असं लिहिलं आहे.

मुदतीआधीच काम पूर्ण केल्याचा दावा पक्षानं यामध्ये केला आहे. पण फोटोंची पडताळणी केली तर दोन्ही फोटो हे दिल्ली पेरिफेरी एक्सप्रेस-वे' नसल्याचं आढळलं.

पहिला फोटो - यामध्ये कच्चा रस्ता दाखवला आहे. प्रत्यक्षात तो फोटो हा समाजवादी पक्षाच्या काळात उत्तर प्रदेशात तयार झालेल्या 'आग्रा-लखनऊ यमुना एक्सप्रेस-वे'चा आहे. तो फोटो 17 मार्च 2015 रोजी मनीष अग्निहोत्री या फोटोग्राफारनं काढला आहे.

हा फोटो जरा उंचावरून घेण्यात आला आहे. रस्ता बांधण्यासाठी किती मोठ्या यंत्रतंत्र लागतात, आणि कसे कामगार काम करतात, हे यातून दाखवण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी त्यांच्या कार्यकाळाच्या अखेरीस या ए्क्सप्रेसवेचं उद्घाटन केलं होतं. एका वृत्तानुसार या महामार्गाचं काम 24 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पूर्ण केलं होतं.

भारतीय वायूदलानं या हायवेवर एका लष्करी विमानाचं लँडिंग आणि टेक-ऑफही केलं होतं.

ट्विटर पोस्ट

फोटो स्रोत, TWITTER

दुसरा फोटो - उजवीकडचा फोटो हा दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेचा आहे. त्याचे उद्घाटन 23 मे 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं.

दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे हा तीन टप्प्यात तयार होत आहे. भाजपनं पोस्ट केलेला हा फोटो या महामार्गाचा दिल्लीमधील भाग आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवशी मोदींनी या महामार्गाचं उद्घाटन करून रोड शो केला होता.

मोदींच्या रोड शो आणि उद्घाटनाचे फोटो ट्विटरवर शेअर करताना केंद्रीय मंत्री विजय गोयल यांनी हा फोटो ट्वीट केला होता. #SaafNiyatSahiVikas या हॅशटॅगसहित त्यांनी 26 मे 2018 रोजी ट्वीट केला होता.

दिल्ली मेरठ एक्सप्रेसवेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी पूर्ण रस्ता मार्च 2019 पर्यंत तयार होईल, अशी घोषणा केली होती.

ट्विटर पोस्ट

फोटो स्रोत, TWITTER

चुकीचा दावा

Internet archives नुसार हे दोन फोटो भाजपच्या @BJP4India या मुख्य हँडलवरून गुरुवारी रात्री उशिरा ट्वीट केले आहेत.

शुक्रवारी मात्र हे फोटो @BJP4India वरून काढण्यात आले. पण पक्षाच्या इतर हँडलवर अजूनही हे फोटो शेअर केले जात आहेत.

बीबीसीच्या पडताळणीनंतर आग्रा-लखनऊ आणि दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेचे फोटो दाखवून दिल्लीच्या पेरिफेरल एक्सप्रेसवेचं काम झपाट्यानं होत आहे, हा भाजपचा दावा चुकीचा असल्याचं आढळलं आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)