राम मंदिरासाठी लोकसभा निवडणूक होईपर्यंत आंदोलन नाही - विश्व हिंदू परिषद #5मोठ्याबातम्या

फोटो स्रोत, Getty Images
आज सकाळी वृत्तपत्रं आणि वेबसाइट्सवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी 5 मोठ्या बातम्या थोडक्यात पाहूया.
1. निवडणूक होईपर्यंत राम मंदिरासाठी आंदोलन नाही - विश्व हिंदू परिषद
पुढील चार महिने म्हणजेच लोकसभा निवडणूक होईपर्यंत राम मंदिरासाठी आंदोलन करणार नाही, असं विश्व हिंदू परिषदेनं जाहीर केलं आहे. द इंडियन एक्स्प्रेसनं ही बातमी दिली आहे.
यापूर्वी राम मंदिराच्या बांधकामासाठी अध्यादेश काढावा यासाठी परिषदेनं देशभर धर्म सभांचं आयोजन केलं होतं. तसंच गेल्या आठवड्यात कुंभ मेळ्यामध्ये धर्म संसदेचं आयोजनंही केलं होतं.
"पुढील 4 महिने आम्ही कोणतंही आंदोलन करणार नाही. कारण निवडणुकीदरम्यान राम मंदिराचा मुद्दा हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो, असं सर्वांवा वाटतं. त्यामुळे पुढचे 4 महिने हा मुद्दा राजकारणापासून लांब ठेवायचा, असं ठरवण्यात आलं आहे," असं विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अलोक कुमार यांनी सांगितलं आहे.
2. संघ सर्वांत सेक्युलर संघटना - सी. विद्यासागर राव
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सर्वांत सेक्युलर आणि सर्वसमावेशक संघटना आहे, असं महाराष्ट्राचे राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिली आहे.
रामटेकमध्ये कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या गोळवलकर गुरुजी गुरुकुलाचे लोकार्पण मंगळवारी झालं. यावेळी ते बोलत होते.

फोटो स्रोत, Getty Images
"रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी जे बीज रोवलं होतं, त्याचं स्वरूप आज विशाल वटवृक्षाप्रमाणं झालं आहे. ते जगभर विस्तारलं आहे," असं राव यांनी म्हटलं आहे.
"संघाची वाटचाल जेवढी नेत्रदीपक, तेवढीच खडतर आहे. महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर आलेली बंदी हा संघाच्या वाटचालीतील सर्वांत खडतर टप्पा होता. विरोधक काहीही म्हणत असले तरी प्रत्यक्षात संघ ही कमालीची धर्मनिरपेक्ष आणि समावेशक संघटना आहे. प्रत्येकाला त्याच्या मताप्रमाणे धर्माचरणाचा, श्रद्धाचरणाचा अधिकार आहे, असं संघ मानतो," असंही राव यांनी म्हटलं आहे.
3. प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा?, राष्ट्रवादीचा पूनम महाजन यांना सवाल
'अहो चिऊ ताई, देश की जनता यह जानना चाहती है? प्रवीण ने प्रमोद को क्यों मारा?', असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजप नेत्या पूनम महाजन यांना विचारला आहे. मुंबईत ठिकठिकाणी अशा आशयाचे पोस्टर लावण्यात आले आहेत. लोकसत्तानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Poonam Mahajan/Facebook
भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्ष पूनम महाजन यांनी चुनाभट्टी येथील सोमय्या मैदानावर आयोजित केलल्या जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली होती.
पूनम महाजन यांनी विरोधकांच्या महागठबंधनला 'महाठगबंधन' असं संबोधून शरद पवार यांना 'शकुनी मामा' म्हणून त्यांच्यावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसही पूनम महाजन यांच्याविरोधात आक्रमक झाली आहे.
4. दुष्काळग्रस्तांसाठी 1450 कोटींचा पहिला हप्ता वितरित
दुष्काळग्रस्त भागात नुकसान भरपाईपोटी मदतनिधीचा 1450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आला आहे. लाभार्थी शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात हा निधी तातडीने जमा करण्याचे निर्देश मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांनी दिले आहेत. एबीपी माझानं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, Getty Images
राज्यात दुष्काळग्रस्त भागामध्ये मदत निधीचं वाटप सुरू करण्यात आलं आहे. त्यासाठी 1 हजार 450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता सर्व विभागीय आयुक्तांना वितरित करण्यात आला आहे. त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना आणि तिथून संबंधित तालुक्यांच्या तहसिलदारांना हा निधी वर्ग केला जाणार आहे.
दरम्यान, देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेण्यासाठी केंद्र सरकार देशपातळीवर सर्वेक्षण करणार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न, कर्जबाजारीपणा यासह विविध मुद्द्यांवर सध्याच्या पीक वर्षात (जुलै-जून) हे सर्वेक्षण केलं जाणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी लोकसभेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे.
5. शबरीमलात प्रवेश करणाऱ्या महिलेला घरात प्रवेश द्या - न्यायालय
शबरीमला मंदिरात प्रवेश केलेल्या कनकदुर्गा यांना घरात प्रवेश द्या, असा आदेश केरळमधील मलप्पुरम न्यायालयानं दिला आहे. द हिंदुस्तान टाइम्सनं ही बातमी दिली आहे.

फोटो स्रोत, AFP/Getty images
यासाठी कनकदुर्गा यांच्याबरोबर 6 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
शबरीमला मंदिरात प्रवेश केल्यामुळे कनकदुर्गा यांना त्यांच्या पतीनं घराबाहेर काढलं होतं. याविरोधात त्यांनी स्थानिक न्यायालयात धाव घेतली होती.
न्यायालयाच्या या निर्णयामुळे मला आनंद झाला आहे. मी कोणतंही पाप केलेलं नाही, हे मी माझ्या नातेवाईंना समजावून सांगेन, असं कनकदुर्गा यांनी म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)



















